मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आपल्याच नवजात बाळाला पाहून घाबरली महिला; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

आपल्याच नवजात बाळाला पाहून घाबरली महिला; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Laura Woodward

Laura Woodward

जगभरात दुर्मिळ आजारांसह अनेक बाळांचा जन्म होतो. मात्र, वैद्यकशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळं त्यांचा जीव वाचवणं शक्य आहे, ही गोष्ट मिली वुडवर्डच्या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लंडन, 8 नोव्हेंबर:  प्रत्येक व्यक्तीचं शरीर वरून जरी एक सारखं दिसत असलं तरी आतमध्ये त्याच्यात अनेक बदल असू शकतात. अनेक व्यक्तींमध्ये जन्मजातचं शारीरिक गुंतागुंत (Physical complications) असते. कुणाचं हृदय लहान असतं तर कुणाची श्वासनलिका, कुणाच्या फुफ्फुसांमध्ये अडचण असते तर कुणाची अन्ननलिका नीट काम करत नसते. वैद्यकीय क्षेत्रातील अशी अनेक आश्चर्यकारक प्रकरणं आपल्यासमोर येतात. इंग्लंडमधील (England) लँकशायरमध्ये (Lancashire) असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

लँकशायरमध्ये लहान आणि मोठं आतडे पोटाच्या बाहेर असलेल्या एका मुलीचा जन्म झाला आहे. मिली वुडवर्ड (Millie Woodward) असं या बाळाचं नाव आहे. मुलीच्या जन्मानंतर तिची शारीरिक स्थिती पाहून तिची आई लॉरा वुडवर्डही (Laura Woodward) घाबरली होती. लॉराला अगोदर तीन मुलं असून मिली नावाची मुलगी तिचं चौथं अपत्य आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

24 वर्षीय लॉरा वुडवर्डनं दिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणाच्या 12व्या आठवड्यातच बाळामध्ये काहीतरी समस्या असल्याचं समजलं होतं. सुरुवातीला डॉक्टरांची प्रतिक्रिया ऐकून लॉरा घाबरली होती. मात्र, तरीही लॉरा आणि तिच्या पतीनं बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिच्या गरोदरपणातील बहुतांश काळ बाळाची काळजी करण्यातचं गेला. काही महिन्यांच्या तणावानंतर, 11 डिसेंबर 2020 रोजी सी-सेक्शनद्वारे लॉरानं मुलीला जन्म दिला. जन्माच्या वेळी बाळाचं वजन सुमारे 2. 57 किलोग्रॅम होतं. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला पाहून लॉरा घाबरली होती, कारण मुलीची दोन्ही आतडी पोटाच्या बाहेर होती. मिली वुडवर्डचा जन्म गॅस्ट्रोस्किसिस (Gastroschisis) नावाच्या अत्यंत दुर्मिळ आजारासह झाला होता. या आजारामध्ये बाळांची आतडी जन्माच्या वेळी शरीराबाहेर असतात. मिलीच्या आतड्यांची वाढ देखील शरीराबाहेरच झाली होती.

डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, लॉरा वुडवर्डच्या हातात तिचं बाळ देण्याअगोदर डॉक्टरांनी बाळाला क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलं होतं. पोटाबाहेर असलेल्या अवयवांना संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर अनेक तासांच्या शस्त्रक्रियेच्या (Surgery) मदतीनं डॉक्टरांनी बाळाचे बाहेर असलेले अवयव पोटामध्ये रोपीत केले आणि त्याचे प्राण वाचवले. मिली वुडवर्ड आता 11 महिन्यांची झाली असून शस्त्रक्रियेनंतर तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. तिची बेंबी (नाभी) वगळता ओटीपोटाचा बाह्यभाग पूर्णपणे सामान्य दिसतो. तिची बेंबी बटणासारखी दिसते. तुम्ही जर आता मिलीला पाहिलं तर तिला जन्मत:च दुर्मिळ आजार असल्याचं अजिबात वाटणार नाही, अस तिची आई लॉरा वुडवर्ड म्हणाली.

जगभरात दुर्मिळ आजारांसह अनेक बाळांचा जन्म होतो. मात्र, वैद्यकशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळं त्यांचा जीव वाचवणं शक्य आहे, ही गोष्ट मिली वुडवर्डच्या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

First published:

Tags: Small baby, Viral