मुंबई, 5 मार्च : अमेरिकेत (America) राहणाऱ्या अप्रवासी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्य लुसिल रॉयबल-एलार्ड यांनी अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अॅक्ट 2021 (American Dream and Promise Act 2021) सादर केले आहे. या कायद्यामुळे ज्या मुलांचे आई-वडील वैध पद्धतीनं H1-B कार्यक्रमाच्या अंतर्गत अमेरिकेत आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळणं सोपे होणार आहे. योग्य कायदेशीर कागदपत्र असलेल्या मुलांना याचा मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी या मुलांकडे (Legal Dreamers) दुर्लक्ष केले जात होते. कोण आहेत लीगल ड्रीमर्स? इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ‘ज्या मुलांचे आई-वडील कायदेशीर पद्धतीनं H1B कार्यक्रमाच्या अंतर्गत अमेरिकेत आलेले आहेत, त्या मुलांना लीगल ड्रीमर्स असे म्हंटले जाते.’ अमेरिकेतील केटो इन्सिट्यूटचे डेव्हिड बायर यांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. ‘ही या कायद्यामधील चांगली सुधारणा आहे. याची जवळपास 2 लाख अप्रवासी नागरिकांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्यास मदत होणार आहे,’ अशी आशा बायर यांनी व्यक्त केली आहे. ‘हे विधेयक ईबी ग्रीन कार्डमधील बॅकलॉक भरुन काढण्यासाठी तसंच अनेक एल आणि H-1B व्हिसा धारकांना देखाल मदत करणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या एप्रिल 2020 मध्ये 7.41 लाख इतकी आहे. या परिवारातील 1.36 लाख मुलांना सध्या नागरिकत्वाची प्रतीक्षा आहे. यापैकी जवळपास 84 हजार 675 मुलं ग्रीन कार्ड न मिळताच त्यांच्यासाठी असलेली वयोमर्यादेची अट पूर्ण करतील असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. (वाचा : ‘देशात सर्वांना लस मिळालेली नाही आणि विदेशात दान करत आहोत,’ हायकोर्टाचे कडक ताशेरे ) अमेरिकेतील तरुण प्रवासी नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं देखील वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याची तरतूद रद्द करण्यास विरोध केला आहे. ‘आम्ही साधारण 5 वर्षांचे होते तेंव्हा पालकांसोबत अमेरिकेत आलो. आमचं येथील सरासरी वास्तव्य 12 वर्ष आहे. तरीही देखील इमिग्रेशन सिस्टिममधील अनेक अडथळ्यांचा आम्हाला सामना करावा लागतो. नागरिकत्व मिळवण्यासाठी एक स्पष्ट मार्ग आमच्याकडे नाही,’ अशी तक्रार या संस्थेनं केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.