येथील काळ्या बाजारात नाईट व्हिजन गॉगल विकले जात आहेत, जे अमेरिकेने अफगाणिस्तानला भेट दिले होते. याशिवाय लेझर साईट्स आणि टॉर्चही विकले जात आहेत. स्थानिक सैनिकांमध्ये या गोष्टींना मोठी मागणी आहे.
काबूल, 05 सप्टेंबर : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदललेली नाही, तर तेथील बाजारपेठांमधील उपलब्ध वस्तू, साहित्य आणि वस्तूंचा साठाही बदलला आहे. आता येथील बाजारपेठांमध्ये व्रिक्री होणाऱ्या वस्तू बदलून गेल्या असून अमेरिकन सैन्याचे गणवेशदेखील विकले जात आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नावाने असलेला येथील बाजार अनेक वर्षांपासून बुश बाजार म्हणून प्रसिद्ध होता. आता या बाजाराचा पूर्ण चेहरा-मोहरा बदलून गेला आहे.
द सनच्या वृत्तानुसार, येथील काळ्या बाजारात नाईट व्हिजन गॉगल विकले जात आहेत, जे अमेरिकेने अफगाणिस्तानला भेट दिले होते. याशिवाय लेझर साईट्स आणि टॉर्चही विकले जात आहेत. स्थानिक सैनिकांमध्ये या गोष्टींना मोठी मागणी आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानला (Afghanistan) नाईट व्हिजन गॉगलच्या (Night Vision Goggles) 16,000 जोड्या आणि 5 लाख बंदूका दिल्या होत्या. यातील बहुतेक बंदुका आता तालिबान्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
बाजारात तालिबानींची भीती स्पष्ट दिसत आहे. दुकानदार प्रचंड घाबरलेले आहेत. दुकानदारांचे म्हणणे आहे की, पूर्वी मोठ्या संख्येने सैनिक बाजारात येत असत, जे आता देश सोडून गेले आहेत. आता तालिबानी इथे येतात, ज्यांना पाहून प्रत्येकजण घाबरतो.
तालिबानी त्यांना आवडत नसलेल्या गोष्टींची तोड-फोड करायला एक मिनिटही लावत नाहीत. यामध्ये संगीत वाद्यांचाही समावेश आहे, कारण त्यांना वाटते की संगीत इस्लामच्या विरोधात आहे. 2001 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठवले. त्यांच्या नावावरून येथील बाजारपेठेचे नाव बुश बाजार आहे, जे लष्करी शूजसाठी प्रसिद्ध आहे. आता तालिबान्यांनीही या बाजाराचे नाव बदलले आहे.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.