
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार दोन वेळच्या अन्नासाठी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी नागरिक आपल्याकडील मौल्यवान वस्तू कवडीमोल किंमतीत विकत आहेत.

अनेक नागरिकांना तर वस्तू विकूनही उपयोग होत नाही. नागरिकांकडे वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील पैसे नसल्यामुळे महागड्या वस्तू कोण विकत घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधादेखील मिळत नसल्याचं चित्र आहे.

राजधानी काबुलच्या मुख्य बाजारपेठेत नागरिक त्यांच्या घरातील वर्षानुवर्ष असणाऱ्या मौल्यवान वस्तू विकण्यासाठी आणत आहेत. अन्न मिळावं आणि देश सोडून बाहेर पडण्यासाठी पुरेसे पैसे मिळावेत, हाच नागरिकांचं प्रयत्न आहे.

काबुलच्या डोंगराळ भागात राहणारे मोहम्मद अहसान हे त्यांच्याकडे असणाऱ्या दोन चादरी विकण्यासाठी घेऊन आले आहेत. आपल्याकडे खायला काहीच नसल्यामुळे या चादरी विकून कुटुंबीयांसाठी अन्नधान्य खरेदी करण्यासाठी ते इथं आले आहेत.

काबुलमध्ये जागोजागी मांडलेल्या टेबलांवर चमचे, प्लेट, ग्लास, काचेच्या वस्तू, स्वयंपाकघरातील साहित्य, शिवणकामाचं मशीन अशा वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

अफगाणिस्तानातील नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. तर अमेरिकेनंही अफगाणि नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली आहे.




