नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Corona Virus) जन्म नेमका कसा झाला, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. चीनमधील वुहान (Wuhan) शहरात या व्हायरसची निर्मिती झाली, असा दावा अऩेक शास्त्रज्ञांनी यापूर्वी केला आहे. तर अनेकांनी तो फेटाळूनही लावला आहे. कोरोना व्हायरस आणि वुहान (Corona virus and Wuhan) यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं सांगणाऱ्या 27 पैकी 26 शास्त्रज्ञ (Scientists) हे प्रत्यक्षात वुहान लॅबशी (Wuhan lab) संबंधित असल्याचा गौप्यस्फोट ‘द टेलिग्राफ’च्या (The Telegraph) रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
काय होता दावा?
‘द लँसेट’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 27 शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या निर्मितीबाबत आपलं मत नोंदवलं होतं. वुहानच्या प्रयोगशाळेला भेट देऊन त्यांनी हा निष्कर्ष काढला होता. कोरोना व्हायरसची निर्मिती ही वुहानच्या लॅबमधून झाली असण्याची कुठलीही शक्यता दिसत नसून या दाव्यात तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला होता. कोरोना व्हायरस हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, असा दावा करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांवर टीका करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा अहवाल तयार करणाऱ्या 27 पैकी 26 शास्त्रज्ञ हे चीनच्या वुहान लॅबशीच संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हे वाचा - उत्तर प्रदेश आणि गोव्यातही मविआचा प्रयोग, संजय राऊतांनी मांडलं आकड्यांचं गणित
काय आहे लॅब थिअरी?
कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण हा चीनच्या वुहानमध्ये सापडला होता. त्यामुळे वुहानच्या लॅबमधूनच हा व्हायरस बाहेर पडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा व्हायरस चुकून किंवा जाणीवपूर्वक बाहेर पडला असावा, असा अनेकांचा दावा आहे. अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम हा दावा करत चीनवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Wuhan