घाटातील एक-दोन वळण गेल्यानंतर अचानक एका वळणावर अंदाज न आल्याने मी चुकीच्या पद्धतीने ब्रेक दाबला अन् धाडकन पडलो. पुढची दोन मिनिट मला काहीच कळत नव्हतं. ताबडतोब माझ्या मागच्या रायडरनं प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मागून येणाऱ्या इतर गाड्या थांबवल्या. त्यांच्यातील एका रायडरने माझी बाईक उचलून बाजूला घेतली आणि मला आधार देऊन शांत केलं. शांत होताच माझ्या मनात पहिला प्रश्न आला, तो म्हणजे आता आपण रिजेक्ट होणार.. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. मला शाळेपासूनच बाईक्स आणि गाड्यांची आवड होती. त्यात बाईक्सची खूपच. माझ्या मित्राच्या बाबांकडे पल्सर 150 बाईक होती. मला त्या गाडीचं फार आकर्षण होतं. ते काका मला कधीकधी त्यावरून घरी सोडायचे, त्यावेळी त्या बाईकवरून घरी जाताना खूप भारी वाटायचं. तेव्हापासून मला बाईकबद्दल जास्त आकर्षण वाटू लागलं. घरात तेव्हा कोणाकडेच वाहन नव्हतं. जेव्हा एखादी वस्तू आपल्याकडे नसते तेव्हा तिच्याबद्दलची उत्सुकता अजून वाढते. माझंही तसच काहीसं होतं. गाडीवरुन जमिनीवर पाय पोहोचू लागल्यानंतर जशी संधी मिळेल तशी इकडून तिकडून बाईक मागून मी ती शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी मित्रांची तर कधी नातेवाइकांच्या बाईक मी चालवू लागलो. लायसन्स मिळण्याचं योग्य वय नसतानाही मी गाडी चालवत होतो. मी चूक करतोय हे समजत होतं. पण, बाईकविषयीच प्रेम मला गप्प बसू देत नव्हतं.
पहिली बाईक घरी आली वयाची 18 वर्ष पूर्ण होताच मी घरच्यांसमोर बाईकचा हट्ट धरला. घरात बाईक आणि कार चालवता येत नसल्या कारणाने वडिलांचा बाईक घ्यायला नकार होता. अखेर आईला खूप विनवण्या करून घरात पहिली बाईक आली. माझ्या आईला देखील माझ्यासोबत बाईक वरून फिरायला फार आवडायचं. माझं बाईकवरच प्रेम, चालवण्याची पद्धत आणि तिची जशी मी काळजी घ्यायचो ते पाहून घरच्यांनी मला 2015 साली 500 CC ची बुलेट घेऊन दिली. बुलेट हातात येताच तिच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव मला ती वेळोवेळी तिच्या पॉवर आणि पिकअप वरून येऊ लागली. त्यावेळी “बुलेट चालवणारा म्हणजे रायडर” अशी सगळीकडेच प्रतिमा होती. मला बुलेटवरून राईड करायची फार इच्छा होती. तेव्हा बुलेटचे खूप मोठे मोठे आणि प्रसिद्ध असे ग्रुप्स आणि क्लबस् पण होते. पण, कळत नव्हत की मी कुठून सुरुवात करू.
माझी पहिली टेस्ट राईड एके दिवशी मी पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर गेलो असता मला काही रायडर्स तिकडे दिसले. त्यांचे रायडिंग गिअर्स आणि सुरक्षा पाहून मला पण असेच रायडिंग गिअर्स घालून राईड करायची आहे, असं मनोमन ठरवलं. तेव्हा त्यातल्याच एकासोबत माझं बोलणं झालं. मी त्याला माझी राईड करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनंतर काही दिवसांनी मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सर्व नियम समजून घेतले. त्यानुसार मला जर क्लबमध्ये सामील व्हायचं असेल तर एक ‘टेस्ट राईड’ द्यावी लागणार होती. हे सर्वच माझ्यासाठी नवीन असल्या कारणाने मी या संदर्भात इंटरनेट वर अभ्यास केला; की टेस्ट राईड म्हणजे नक्की काय, कसं आणि बरच काही. एखादी परीक्षा देताना जस दडपण यावं तस मला दडपण आल होत.
टेस्ट राईडलाच अपघात टेस्ट राईडचा दिवस उजाडला. दिलेल्या वेळेनुसार मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. तिथे पोहोचताच मी पाहिलं की सर्वजण त्यांच्या रायडिंग गिअर्समध्ये तयार होते. मी फक्त माझं हेल्मेट घालून तिथे होतो. त्या सर्वांना पाहून अगोदर आलेलं दडपण अजूनच वाढलं. माझी टेस्ट राईड इगतपुरीपर्यंत होती. मी याआधी कधीच इगतपुरीला गेलो नसल्याने मला रस्ता माहित नव्हता. कसारा येईपर्यंत मी त्यांच्या सोबत बाईक चालवत होतो. आधी मला वाटले की रायडर्स म्हणजे सुसाट बाईक पळवतील. पण, तसे काहीच होत नसल्यामुळे नक्की टेस्ट राईड कसली? याचा विचार मी करू लागलो. आधीच आलेलं दडपण, त्यात मनात येणारे नको नको ते विचार या सगळ्यातून मी कसाबसा राईड करतच होतो. अशातच घाट रस्ता चालू झाला. घाटातील एक-दोन वळण गेल्यानंतर अचानक एका वळणावर अंदाज न आल्याने मी चुकीच्या पद्धतीने ब्रेक दाबला आणि धाडकन पडलो. पुढची दोन मिनिट मला काहीच कळत नव्हते. ताबडतोब माझ्या मागच्या रायडरने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागून येणाऱ्या इतर गाड्या थांबवल्या. त्यांच्यातील एका रायडरने माझी बाईक उचलून बाजूला घेतली आणि मला आधार देऊन शांत केलं. शांत होताच माझ्या मनात आलं की आता मला ह्या ग्रुपमध्ये घेतील की नाही? मी राईड करू शकेन की नाही? एक रायडर बनणं इतकं अवघड असतं? या सर्व प्रश्नानी मी पूर्ण ब्लँक झालो होतो.
अपघातानंतर मला माझं दुसरं कुटुंब मिळालं तेव्हा प्रथमच मला मी जो ग्रुप जॉईन करतोय तो किती योग्य आहे याची जाणीव झाली. “तू एवढ्या डिप्रेशन मध्ये बाईक का चालवत होतास?” असा प्रश्न अचानक माझा कानांवर पडला, “तू जशी नेहमी बाईक चालवतोस तशीच बाईक चालव” असे ऐकताच मी थोडा रिलॅक्स झालो. कदाचीत पहिल्याच राईडला पडणारा मी एकमेव होतो. माझ्यावर हसतील किंवा मला रिजेक्ट करतील अशी भीती असतानाच या उलट सगळ्या रायडर्सनी मिळून मला नीट समजावलं आणि धीर दिला. त्यानंतर मी ती राईड खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केली. सुखरूप घरी पोहोचलो आणि सर्वप्रथम रायडिंग गिअर्स घालूनच राईड करायची असं मनाशी पक्कं केलं. अशा वेगळ्याच प्रकारे मी “डोंबिवली रायडर्स क्लब"चा सदस्य झालो. त्या एका अपघातानंतर मला माझं दुसरं कुटुंब मिळालं. पुढे हळूहळू रायडिंग जॅकेट, ग्लोव्ह्ज, रायडिंग पँट असे एक एक रायडिंग गिअर्स टप्प्याप्प्याने घेत गेलो, यात मला ग्रुप मधील सर्वांनी खूप मदत केली. हंपी-बदामी, गोवा, राजस्थान, गोकर्ण, मुरुडेश्वर, कूर्ग अशा विविध राज्यांतील शहरांमध्ये मी राईड करू लागलो.
माझी पहिलीच मोठी राईड होती ती म्हणजे हंपी-बदामी. आम्ही पहिल्याच दिवशी 600 किमीचा प्रवास करून बदामीला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करायला गेलो तेव्हा मेनूमध्ये इडली आणि मेदू वडा ऑर्डर केला. कारण, तिथली स्पेशालिटी म्हणून पण आम्हाला कुठे माहीत होतं की पुढचे 5 दिवस आम्हाला नाश्त्याला आणि जेवणाला हाच मेनू खायचा होता. आमचा नाईलाज होता आणि पुढचे 5 दिवस आम्ही फक्त इडली, मेदुवडा आणि डोसा एवढच खात होतो. अर्थात ते सर्व पदार्थ फार चविष्ठ आणि अस्सल पारंपरिक पद्धतीचे होते. पण, सतत तेच खावं लागतं असल्याने आम्ही कंटाळलो होतो. या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट समजली की जसा देश तसा वेश करावाच लागतो.
गोकर्णला कळालं वेळेचं महत्त्व कोणत्याही ठिकाणी जा, तिथे जाताना जर तुम्ही वेळेत पोहोचला नाहीत तर त्याचा नंतर फार त्रास होतो. असच काहीसं झालं आमचं गोकर्ण-कूर्ग राईड वेळेस. काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही ठरलेल्या वेळेत गोकर्णसाठी निघू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला गोकर्णला पोहोचायला उशीर झाला. जवळपास रात्रीचे 1.30 वाजले होते. आमचं हॉटेल ठरलेलं होतं, त्यामुळे राहण्यासाठी शोधाशोध करावी लागणार नव्हती. पण, जेवणासाठी मात्र आमची फारच तारांबळ उडाली. मुळात गोकर्ण हे एक मंदिरानी सजलेलं, समुद्र किनारा लाभलेलं एक छोटस गाव. इथं सर्व दुकाने जेमतेम 11 वाजेपर्यंत उघडी असतात. त्यात आम्ही एवढ्या उशिरा पोहोचलो की तिथे काही मिळणं अशक्यच. भुकेने सर्वच अस्वस्थ झालो होतो. खूप शोधकार्य केल्यानंतर आमच्यातील 2 रायडर्सनी एक दुकान शोधून काढलं ते सुद्धा बंदच करत होते. दुकानदाराकडून काही केळी आणि बिस्कीटचे पुडे विकत घेतले. त्यावेळी ते दुकान मिळणे हा आमच्यासाठी चमत्कारच होता आणि तो दुकानदार म्हणजे देवदूतच. केळी आणि बिस्कीट खाऊन आम्ही ती रात्र निभावून घेतली. या सगळ्यातून शिकलो वेळ कोणासाठीच थांबत नाही, जर आम्ही वेळेत निघालो असतो तर आमच्यावर ही नामुष्की ओढवली नसती. सर्वात शेवटी एकच सांगू इच्छितो, बुलेट चालवणारा किंवा एखादी विशिष्ठ ब्रँडची बाईक चालवणारा म्हणजे रायडर असं काहीही नसतं. रायडर तोच जो समोर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या साथीदारांच्या साथीने त्या परिस्थितीवर मात करून प्रवासाचा आनंद घेतो. - नितिश नितिन नेवगे, बाईक रायडर तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.