जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / सामाजिक कार्याला वाहून घेतलेला बाईक रायडर! गडकिल्ले संवर्धन, सेवाभावी संस्थासाठी करतोय Riding

सामाजिक कार्याला वाहून घेतलेला बाईक रायडर! गडकिल्ले संवर्धन, सेवाभावी संस्थासाठी करतोय Riding

सामाजिक कार्याला वाहून घेतलेला बाईक रायडर! गडकिल्ले संवर्धन, सेवाभावी संस्थासाठी करतोय Riding

बाईक राईड करताना सामाजिक कार्य न करता सामाजिक कार्यासाठी बाईक राईड करणे आणि राईड करत गडकिल्ले संवर्धनापेक्षा गडकिल्ले संवर्धनासाठीच राईड करण्याचं उद्धिष्ट ठेऊन एकत्र राईड करण्याचं वेगळेपण आजही RBP नं जपलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोण आहेस तू? या प्रश्नाला उत्तर किंवा अंत नाही. पण, ते शोधण्याचे मार्ग अनेक आहेत. कोणाला लगेच उत्तर मिळतं तर कोणी ते आयुष्यभर शोधत राहतो. असेच काही मार्ग मी ही शोधात आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे बाईक रायडींग आणि ट्रेकिंग. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. नमस्कार मित्रानो, मी महेंद्र (सागर) नलगे, गेले 5 वर्ष बुलेट राईड आणि गडकिल्लेची सैर करण्याचा छंद जोपासत आहे. बाईकवरुन मी आतापर्यंत एक लाखांहुन अधिक किलोमीटर राईड पूर्ण केली आहे. अजूनही प्रवास सुरुच आहे. यात सोलो, ग्रुपसह छोट्या-मोठ्या अनेक राईडचा समावेश आहे. प्रत्येक राईडच्या मागे बाईक राईडचा छंद जोपासत मी सामाजिक कार्य अत्यंत जबाबदारी आणि जाणीवपूर्वक करत राहतो. या कामामुळे मी महाराष्ट्र मधील खूप साऱ्या छोट्या मोठ्या संस्था, आश्रमातील लोकांशी आणि तिथल्या गरजू मुलं-मुलींशी जोडलो गेलो आहे. प्रत्येक वेळी काहीतरी मदत करताना पुढच्या वेळेस अजून जास्त मदत कशी करता येईल हे ध्येय मला आयुष्यात एक पाऊल पुढे टाकायला मदत करतं. बाईक रायडींगची सुरुवात सामान्य घरातील मुलाला छोटं स्वप्न पूर्ण झालं असं वाटणारा एक क्षण म्हणजे स्वतःची बाईक घेणं. तोच क्षण मी अनुभवला 2016 ला, जेव्हा मी रॉयल एनफिल्डची बुलेट घेतली. तेव्हापासून सुरू झालेला माझा प्रवास आजतागायत सुरुच आहे. फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये मित्रांसोबत सिंहगडची सैर करत असताना, गडाच्या पायथ्याला 10-12 रायडर्सचा एक ग्रुप दिसला. त्यांना पाहून माझ्या रायडींगच्या सुप्त इच्छेला किक मिळाली. त्यांच्या मॉडीफाय केलेल्या बाइक्स आणि गिअर्स असलेल्या रायडर्सचा रुबाब पाहून मी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. तो ग्रुप होता Royal Bulleteers Pune. योगायोगाने ही लोकंही सामाजिक कार्यात हातभार लावणारी होती. बाईकचा छंद, ट्रेकिंग करणं या सगळ्या गोष्टी त्या ग्रुपसोबत तंतोतंत जुळून आल्या. काही हक्काची माणसं तर भेटलीच पण ग्रुपमधील विविध क्षेत्रातील रायडर्स, त्यांचे अनुभव, यश, शिस्त या सोबत राईड्स करण्याचा अनुभव ही माझ्यासाठी मोठी शिदोरीच होती. बाईक राईड करताना सामाजिक कार्य न करता सामाजिक कार्यासाठी बाईक राईड करणे आणि राईड करत गडकिल्ले संवर्धनापेक्षा गडकिल्ले संवर्धनासाठीच राईड करण्याचं उद्धिष्ट ठेऊन एकत्र राईड करण्याचं वेगळेपण आजही RBP नं जपलं आहे. राईड छोटी असो किंवा मोठी, त्या मागचं कारण आणि ध्येय ठरवतं की तुम्ही स्वतःला कुठं नेऊन ठेवता. कदाचित हीच एक गोष्ट आहे जी मला स्वतःला एक चांगला रायडर म्हणून घेण्यासाठी पुरेशी आहे. एक राईड सामाजिक कार्यासाठी या वर्षी 26 जानेवारी 2022 ला आमच्या बुलेट रायडींग पुणे ग्रुपकडुन ‘स्नेहालय/स्नेहांकुर, जि. अहमदनगर’ येथे सेवाभावी मदतीचा हात पुढे करण्यात आला. सकाळी 6 वाजता पुण्यातील गरवारे ब्रीज येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची आरती आणि मानवंदना देऊन आम्ही साडेसात वाजता स्नेहांकुरकडे जायला निघालो. या वर्षी संस्थेला मदत म्हणून बालकांचे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, नेस्ले मिल्क पावडर याची व्यवस्था ग्रुपतर्फे आधीच झाली होती. प्रवासादरम्यान ‘स्नेहांकुर’ मधील लहान बाळांचा विचार डोक्यात येतच होता. त्यात जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी जाणवत होती. क्षणात एक विचार डोक्यात आला. आपल्याला इतकी थंडी लागतेय तर लहान बाळांची काय अवस्था होईल. याच विचारातून अष्टविनायकातील चौथा महागणपती म्हणून ओळखला जाणारा रांजणगाव येथून लहान बाळांसाठी 35-40 उबदार कपडे घेतली. एक हात मदतीचा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही तिथं पोहचलो. संस्थेतील सेविकांनी आम्हाला कामाची माहिती दिली. नंतर आम्ही नवजात बालकांना ठेवलेल्या वॉर्ड मध्ये गेलो. त्या लहानग्यांना बघताच आम्हा सर्वांना अश्रू अनावर झाले. कोरोना प्रतिबंध नियमांमुळे आम्हाला वॉर्ड मध्ये जाता आलं नाही. तिथली परिस्थिती आजही शब्दात मांडणं माझ्यासाठी कठीण आहे. संस्थेसाठी आणलेल्या वस्तू आम्ही सेवकांच्या हाथी सुपूर्त करून सर्वांचा निरोप घेत परतीचा प्रवास सुरु केला. परतीच्या प्रवासात असलेली ती शांतता त्या नवजात बालकांना पाहून भावुक झालेली मनं दर्शवित होती. प्रत्येक जण हिच प्रार्थना करत होता की अशी वेळ कोणावरच येऊ नये. देशातून अनेक ठिकाणाहून समस्याग्रस्त कुमारी माता आणि बलात्कारित महिला ‘स्नेहांकुर’कडे धाव घेत असतात. अर्थात, असे काम वाढत चालल्याचा ‘स्नेहांकुर’ला आनंद नाहीच. कारण, ज्या दिवशी असे अनाथाश्रम बंद होतील तेव्हा खऱ्या अर्थाने समाज पुढारलेला, सुशीक्षित असेल. याआधी गडावर साफसफाई करून स्वच्छता विषयक फलक लावणे, अंध शाळेला संगीत साहित्य प्रदान करणे, गरजूंना फळविक्रीसाठी लागणारी हातगाडी देऊन त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वरत करण्याचा प्रयत्न, रायरेश्वर पठारावरील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि अशा अनेक अनाथ आश्रमांना पुरेशी मदत करत हा प्रवास आजही चालू आहे आणि पुढेही चालत राहील. एक अविस्मरणीय Solo Ride ग्रुप मध्ये राईड करण्याचे फायदे म्हणजे आपण नवीन नवीन लोकांना जोडले जातो, त्यांचे अनुभव, विचार, शिस्त याचा आपल्यात चांगला बदल होण्यास वाव मिळतो. सगळ्यांसोबत केलेल्या कामाचा कुठेतरी एक सुखःद अनुभव आपल्या आठवणींमध्ये कायमचा राहतो. त्याचबरोबर सोलो राईडचा माझा छोटा-मोठा अनुभव देखील मला खूप काही शिकून गेला. जे रायडर हे वाचत असतील ते हे समजू शकतात की खूप दिवस राईड केली नाही तर काय होतं? तुम्ही अस्वस्थ होता, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. लॉकडाऊनमुळे माझंही असच काहीसं झालं होतं. वर्षभर सर्व पूर्वरत होण्याची वाट पाहिली. कधी ठरलेल्या राईड्स करतो असं झालं होतं. अखेर न रहावून जानेवारी 2021 ला लाँग राईड करण्याचं ठरवलं. नेहमीप्रमाणे प्रत्येक राईडला वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करायचा हा मनसुबा ठेऊन डेस्टिनेशन शोधत होतो. पण, राईडसाठी भेटलेले दिवस आणि बाकीच्या काही गोष्टी लक्षात घेता ठिकाण ठरत नव्हतं. शेवटी राईडच्या दोन दिवस आधी कधी न पाहिलेली एक जागा इन्टाग्रामच्या रिल्समध्ये पाहायला मिळाली. ठिकाणं होतं कर्नाटकातील हंपी. पूर्वतयारी म्हणून खूप दिवस उभी असलेल्या बाईकची दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंग करुन घेतली. टूल बॉक्स, बॅग, जॅकेट आणि सेफ्टी गिअर्स कपाटातून काढून साफ करून ठेवले. निघण्याचा दिवस.. सर्व तयारीनिशी 22 जानेवारी 2021 ला पुण्याहून माझी राईड सुरु झाली. पहिला हॉल्ट पंढरपूरला घेऊन सुमारे 570 किमीचा 12-13 तासांचा  प्रवास करत मी रात्री हंपीला पोहचलो. रात्र असल्याने हंपी काय आहे? याची कल्पना आली नाही. सकाळी उठून हंपीची सैर करायला निघालो. विजयनगर साम्राज्याचे अवाढव्य रूप बघून डोळ्यांचे जणू पारणे फिटले. प्रथम मी सर्वात जुने देवस्थान आणि सक्रिय हिंदू उपासना स्थळ म्हणून ओळख असलेल्या विरुपाक्ष मंदिर आणि बाजार संकुलला गेलो. त्यानंतर विजय विठ्ठल मंदिर, गरुड दगडी रथ, शिव मंदिर, पुरंदरदासार मंडप, चक्र तीर्थ, शशिवेकालू गणेश स्मारक, नंदी, नरसिंह, शिवलिंग अशा अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या अवशेषांना भेट दिली. दुसऱ्या दिवशी अच्युतराय मंदिर आणि बाजारपेठ, हेमकुट टेकडी स्मारके, पट्टाभिराम मंदिर, महानवमी व्यासपीठ स्मारक, कमल महाल, गणगित्ती जैन मंदिर, अहमद खान कबरराम मंदिर, हत्तीचे तबेले, पुरातन तराजू, महानवमी व्यासपीठ स्मारक अशे अनेक धार्मिक केंद्रांचे महत्त्वाचे शिलालेख आणि बांधकामांची सर्वोत्तम-जतन केलेली उदाहरणे पाहण्याचं भाग्य मिळालं. आपला इतिहास आणि लहानपणी ऐकलेल्या देवदेवतांच्या गोष्टी हंपीमध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळतात. विजयनगरचा अवाढव्य साम्राज्य आणि त्या मागचा इतिहास डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यात सामावून घेणे अश्यकच. पण, एव्हडं पाहूनच आपण केलेला प्रवास सार्थ झाला. याचं समाधान मात्र नक्कीच मिळत. हंपीवरुन गोकर्णला.. हा प्रवास इथेच थांबला नाही. हंपीची सैर पूर्ण करून 25 जानेवारी 2021 ला मी गोकर्णकडे जायचं ठरवलं. हंपीपासून गोकर्ण 350 किमी म्हणजे 7-8 तासांवर कर्नाटकातील मंगळुरूजवळ वसलेले गाव आहे. हंपी-गोकर्ण रोड म्हणजे घनदाट दांडेली जंगलाने भरलेला पश्चिम घाट, विलक्षण सीन, रस्ते एक थ्रिलर अनुभव करून देतात. गोकर्णचे सुंदर समुद्रकिनारे हे मुख्य आकर्षण आहेत. येथे असे मानले जाते की गायीच्या कानातून शिवाचा जन्म झाला आणि म्हणूनच त्याला गोकर्ण म्हणतात. तसेच एका मान्यतेनुसार गंगावली आणि अघनाशिनी नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावाचा आकारही कानातल्यासारखा आहे. या कारणास्तव येथे लोकांची खूप श्रद्धा असून एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. म्हणूनच येथील समुद्रकिनाऱ्यांवर लोकं जप, योपासने करताना दिसतात. इथे परदेशी लोकंही भारतीय संस्कृतीला जोपासताना पहायला मिळतात. परतीचा प्रवास जेव्हडी उत्सुकता घरातून राईडसाठी  निघताना असते त्यापेक्षा जास्त उदासिनता परतीच्या वेळेस होते. 27 जानेवारी 2021 ला गोकर्णहुन पुण्याला 550 KM चा परतीचा प्रवास सुरु केला. घनदाट जंगल, विलक्षण रस्ते, ताजी हवा यांचा सुखदः अनुभव घेत गोकर्णाहून पुण्याला येत असताना हंपी  विजयनगर साम्राज्याचे दृश्यं, अवाढव्य मंदिर, मूर्ती, दगड, त्यांचा इतिहास जमेल तितकं डोळ्यात आणि मनात सामावून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पुणे-हंपी-गोकर्ण-पुणे असा अविस्मरणीय 1800 किमीचा प्रवास इथे संपला. एक रायडरसाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मला माझ्या बाईकने कुठेही त्रास दिला नाही. कदाचित माझ्या पूर्व तयारीमुळे हे साध्यं झाल असेल. खरंतर तो प्रवास संपला नाही तर पुढच्या राईडची पूर्व तयारी केली असं समजूया. बुलेट राईडची अजून बरीच हिटलिस्ट बाकी आहे आणि ती पूर्ण करायची धडपड चालूच राहील. सागर नलगे, बाईक रायडर, पुणे (Insta ID- sagar_nalage.10) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात