12 तासात परत येणाऱ्यांना हायवेवर टोल टॅक्स भरावा लागणार नाही? व्हायरल पोस्टचं काय आहे सत्य

12 तासात परत येणाऱ्यांना हायवेवर टोल टॅक्स भरावा लागणार नाही? व्हायरल पोस्टचं काय आहे सत्य

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार, जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांच्या आत परत आला, तर तुम्हाला परतीच्या प्रवासात कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही."

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतेवेळी जर कोणी 12 तासांत परतले तर टोल कर आकारला जाणार नाही, असा दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्रणाली बदलण्याचे आश्वासन दिले आहे. अशात या नवीन पोस्टने अनेकांचा गोंधळ उडाला आहे.

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार, जर तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान 12 तासांच्या आत परत आला, तर तुम्हाला परतीच्या प्रवासात कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही." याशिवाय टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्या लोकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही, असा दावाही पोस्टमध्ये केला जात आहे.

जाणून घ्या सत्य काय आहे?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अलीकडेच या दाव्यांचे खंडन केले आहे. व्हायरल सोशल मीडिया पोस्ट बनावट असल्याचेही सांगितले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 नुसार देशभरातील त्यांच्या प्लाझावर टोल टॅक्स वसूल करते. केंद्राच्या अधिकृत राजपत्राने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही भागावर टोल कर आकारला जातो.

20 किमी परिसरात राहणाऱ्यांवर टोल टॅक्स लागणार नाही?

याशिवाय 20 किमी परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी मोफत टोल टॅक्सचा दावाही खोटा आहे. नियमानुसार टोल टॅक्स भरण्यापासून कोणालाही सूट नाही. जर कोणी टोल प्लाझाजवळ राहत असेल आणि त्याचे वैयक्तिक वाहन असेल, तर त्यालाही प्रवासासाठी मासिक पास काढावा लागेल. राष्ट्रीय महामार्ग टाळण्यासाठी वाहनाला दुसरा पर्यायी मार्ग नसेल तरच ही सूट मिळते.

टोल वसुलीची पद्धत बदलणार

नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, त्यांचे मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली व्यवस्थेत सुधारणा करणार आहे. गडकरींनी संसदेत सांगितले की, त्यांचे मंत्रालय येत्या सहा महिन्यांत देशातील सर्व टोलनाके हटवेल. ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील वास्तविक अंतराच्या आधारे भविष्यात कारमध्ये जीपीएस प्रणाली किंवा संगणकीकृत नंबर प्लेटचा वापर टोल आकारणी करण्यासाठी केला जाईल.

Published by: Rahul Punde
First published: August 24, 2022, 8:36 PM IST

ताज्या बातम्या