जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / एकेकाळी रायडर्स ग्रुपकडून मिळाला होता नकार, आता तरुणांसाठी झालाय Inspiration

एकेकाळी रायडर्स ग्रुपकडून मिळाला होता नकार, आता तरुणांसाठी झालाय Inspiration

एकेकाळी रायडर्स ग्रुपकडून मिळाला होता नकार, आता तरुणांसाठी झालाय Inspiration

सोशल मीडिया आणि प्रत्यक्षरित्या अनेकांना भेटलो. पण, प्रत्येकाने विशिष्ट बाईकच हवी असल्याच सांगत नकार दिला. यामुळे मी निराश झालो. अन् त्याच दिवशी ठरवलं..

  • -MIN READ
  • Last Updated :

मी छोट्या मोठ्या राइड भरपूर केल्या. पण, मला आता बाहेर पडायचं होतं, नवनवीन ठिकाणं खुणावू लागली होती. त्यासाठी कुठल्यातरी रायडर ग्रुपमध्ये असणं आवश्यक होतं. सोशल मीडिया आणि प्रत्यक्षरित्या अनेकांना भेटलो. पण, प्रत्येकाने विशिष्ट बाईकच हवी असल्याच सांगत नकार दिला. यामुळे मी निराश झालो. अन् त्याच दिवशी ठरवलं.. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. रायडरचे पाय पाळण्यात प्रत्येकाला लहानपणापासूनच कसल्या ना कसल्या गोष्टीचं वेड असतं. मलाही शाळेत असल्यापासून गाड्यांची फार आवड होती. माझ्या अभ्यासाच्या वह्या मागच्या बाजूने लवकर भरायच्या, कारण मी सतत मला आवडणार्‍या नवीन नवीन गाड्यांची चित्र काढत असे. पॉकेट मनी साठवून रद्दीच्या दुकानातून “Overdrive” आणि “Autocar India” ची मासिक घ्यायचो. एव्हाना घरातल्यांना समजून चुकलं होतं की मला चित्रकला आणि गाड्यांमध्ये जास्त रस आहे. आठवीत दिवाळीच्या सुट्टीत मामाकडं रहायला गेलेलो, तेव्हा हट्ट करून मामाची splendor चालवायला शिकलो. बाइक बद्दलचं माझं आकर्षण बघून बाबांनी आमची पहिली बाइक घ्यायचा निर्णय घेतला. दोन-तीन आठवडे सगळीकडे चौकशी करून मी Karizma आणि Unicorn असे दोन पर्याय ठेवले, पण सी. सी. लक्षात घेता Unicorn घरात आली. मग जशी संधी मिळेल तशी मी कधी चोरून तर कधी परवानगी घेऊन बाइक चालवायला लागलो. अठराव्या वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशीच लायसन्ससाठी अर्ज केला. 2006 साल माझ्यासाठी विशेष होतं. कारण, घरात पहिली बाइक आली होती आणि घरच्यांसाठी मी S.S.C. ला होतो म्हणुन. नंतर मी कमर्शिअल आर्टच्या पदवीसाठी, कॉलेजला वरळीला होतो. तिथून आम्ही मित्र बाइकवरुन बांद्राला “स्पोर्टस् बाइक” बघायला जायचो. कॉलेज पूर्ण होताच 2009 साली नोकरी मिळाली. मी रोज कामाला बाइकनेच जायचो आणि तेव्हाच हळूहळू माझ्यातला रायडर डेव्हलप होऊ लागला. मोठ्या बहिणीकडून स्पेशल गिफ्ट सुरुवातीला फक्त हेल्मेट आणि हॅण्ड ग्लोव्ह्ज घालून लोणावळा, माळशेज, इगतपुरी अशा छोट्या छोट्या राईड्स केल्या. रोज ऑफिसला बाइकने जात होतो तरी वीकेंडला राईडला जायची उत्सुकता काही वेगळीच. मोठ्या बहिणीने माझी राइडिंग विषयीची ओढ बघून पाहिले राइडिंग जॅकेट भेट दिलं. तिनं मला घेतलेलं सगळ्यात महागडं आणि माझ्या आवडीचं गिफ्ट होतं ते. तेव्हापासून ऑफिशिअल रायडर असल्यासारखा मी दर वीकेंडला राईड्सला जाऊ लागलो. त्या घटनेमुळे डोंबिवली राइडर्स क्लब कल्पना माझ्या डोक्यात आली कधी शाळेतले मित्र, कधी कॉलेजमधले तर कधी बहिणीसोबतच, राइडसाठी सतत कोणाला ना कोणाला शोधत राहिलो. नंतर इंटरनेट वरून बऱ्याच रायडर्स ग्रुपची माहिती शोधून काढली. त्यांना मला ग्रुपमध्ये घेण्याची विनंती केली. पण, माझ्या पदरी निराशा यायची, एकतर मोठी स्पोर्ट्स बाईक किंवा बुलेट असली तरच ग्रुप मध्ये घेतो असं विचित्र नियम होते. मला ते पटणार नव्हतं. एखाद्याला त्याच्या बाईक वरून कसं ठरवलं जातं ग्रुप मध्ये घ्यायचं की नाही ते? आणि मग माझ्या मनात राइडर्स ग्रुप सुरू करण्याची कल्पना आली. माझ्या सारखे अजूनही असतीलच ह्या विचाराने मी ग्रुप सुरू करायचं ठरवलं. तिथूनच आमच्या “डोंबिवली राइडर्स क्लब"ची स्थापना झाली. 2012 साली आम्ही आमचा ग्रुप रजिस्टर केला. नंतर हळूहळू महाबळेश्वर, कोकण, पुणे-साताऱ्याचे गडकिल्ले, अशा टप्प्या टप्प्याने आम्ही महाराष्ट्र संपूर्ण पिंजून काढला. एकटे राइडला जाणे आणि ग्रुप सोबत राइड करणे ह्यात किती फरक असतो ते ह्या काळात समजून आले. सेफ्टीच्या दृष्टीने सगळे रायडिंग गिअर्स घालणे आणि ग्रुप सोबत राइड करणे किती सोयीस्कर आणि अत्यावश्यक आहे ते आम्ही आमच्या राइड्स करताना लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. “रायडिंग गिअर्स शिवाय बाइक चालवू नये” हे स्वतःच्या कृतीतून सगळ्या जगाला समजावायची जणू प्रतिज्ञाच घेतली. पहिल्यांदा महाराष्ट्राबाहेर राइड.. महाराष्ट्राच्या बाहेर कधी न गेलेलो आम्ही 2014 साली पहिल्यांदा राजस्थान राइडला जायचं ठरवलं. कसलाही अंदाज न बांधता निघाल्या कारणाने जैसलमेरला पोहोचताच थंडीने आमचा स्पीड कमी झाला. कधी न अनुभवलेली थंडी आणि त्यात सतत शेकडो किलोमीटर बाइक चालवून समजले की राइड करणं इतकं पण सोपं नाही. सॅम ड्युनस् च्या वाळवंटाला जात असताना अचानक आम्हाला पॅरामिलट्रीच्या जवानांनी अडवलं. त्या जवानांपैकी दोन ऑफिसर मुंबईचे होते. राजस्थानच्या वाळवंटात इतक्या दूर महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या बघून त्यांनी आम्हाला थांबवलं होतं. त्यांच्याशी गप्पा मरताना पुढच्या प्रवासासाठी काही टिप्स मिळाल्या. आठवण म्हणुन त्यांच्यासोबत सेल्फि काढून आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. त्यांना तिथे आम्हाला पाहून जो अभिमान वाटत होता, त्याहून अधिक जास्त आपल्या देशासाठी लढणार्‍या जवानांना सीमेजवळ असे कोणी भेटले की ते किती खूष होतात आणि त्यांचं मन किती मोठं असतं हे स्पष्ट दिसत होत. पुढे गुजरातचे व्हाईट डेझर्ट (रण ऑफ कच्छ), कन्याकुमारी, रामेश्वरमचा पंबन ब्रीज, धनुष्कोडी- पाँडिचेरी, काश्मीर - लेह लडाख, कुर्ग-गोकर्ण, गोवा, उदयपूर - जयपूर - चित्तौड़गढ़ - पोखरण,  इंदौर अशा अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये राईड्स केल्यात. आयुष्यातील ड्रीम राइड प्रत्येक बाइक राइडरची ड्रीम राइड म्हटलं की लेह-लडाख हेच नाव समोर येतं. अर्थातच मी सुद्धा काही वेगळा नाही. 2018 मध्ये जून महिन्यात लडाखला जायचं ठरविलं. त्यासाठी लागणारे पैसे आणि इतर आवश्यक गोष्टींची जमवा जमव करताना हे स्पष्ट झाले की, आयुष्यात कुठलीही गोष्ट करण्यासाठी एकदा तुम्ही ध्येय ठरवलं, की त्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू आपोआप यश मिळत जाते. फक्त तुमची इच्छा शक्ति प्रबळ हवी आणि तुमच्या ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. 20 जून 2018 ला जेव्हा मी डोंबिवलीहून लडाखला जायला निघालो तेव्हा मनात असंख्य प्रश्न होते. मायनस डिग्री सेल्सिअस मधील थंडीवर मात कशी करायची, कमी ऑक्सिजन मध्ये बाइक कशी चालवायची वगैरे. ह्या सर्व समस्यांतून मार्ग काढून, यशस्वीपणे संपूर्ण राइड फिरून आल्यावर, आयुष्यातला अजून एक मोठा आणि महत्वपूर्ण धडा शिकलो, तो म्हणजे “nothing is impossible”. अशक्य असे या जगात काहीच नाही, हे आपण खूप वेळा ऐकलेले असते. पण, प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय त्याची प्रचिती येत नाही. विविधतेत एकतेचं दर्शन भारताच्या विविध राज्यांमधून आणि शहरांमधून राइड करताना मला खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येक राज्यांतील लोकांची गाड्या चालवण्याची पद्धत वेगळी आहे. तिथे तुम्हाला त्यांच्याशी मिळते-जुळते राहूनच बाइक/गाडी चालवावी लागते. राज्या-राज्यांतील जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, तिथे आपली आवड निवड ठेवून नाही चालत. विविधतेत एकता असे भारत देशाचे वर्णन करतात ते खरया अर्थाने राईड करून अनुभवले. बाइक राइडर म्हणजे माझ्या मते तरी फक्त हेल्मेट आणि जॅकेट घालून बाइकवरुन फिरणे इतकेच नाही. त्यासोबत तुम्हाला तुमच्या बाइकचे मेकॅनिकल नॉलेज पण हवे. जितकी तुम्ही तुमच्या बाइकची काळजी घ्याल, तितकीच जास्त ती तुम्हाला चालवताना आनंद देईल व तुम्हाला सुरक्षित ठेवेल. मला स्वतःची बाइक स्वतः धुण्यात, स्वतः तीचं सर्व्हिसिंग करण्यात जास्त आनंद मिळतो. जर तुम्ही वेळोवेळी बाइक सर्विस करत असाल, तिचे आवश्यक पार्ट्स बदलत असाल, तर तुम्हाला कुठलीच बाइक कधीच धोका देणार नाही. भारताच्या सर्व सीमांपर्यंत पोहोचायचंय माझा मुख्य उद्देश भारताच्या सर्व सीमांपर्यंत पोहोचण्याचा आहे. कन्याकुमारीचे भारताचे शेवटचे टोक, राजस्थानची लोंगेवाला बॉर्डर, अमृतसरची वाघा बॉर्डर, गुजरातची लखपत किल्ल्या जवळची बॉर्डर ते लडाख मधील चीनची सियाचीन बॉर्डर आजपर्यंत जाऊन आलो आहे. अजूनही बऱ्याच बॉर्डर्सना भेट देण्याची इच्छा आहे. खरा रायडर तोच जो… जसा एखादा चित्रकार ब्रश आणि रंगांविना अपूर्ण असतो, तसाच बाइक राइडर हा त्याच्या राइडिंग गिअर्सविना अपुराच. माझ्यासाठी बुलेट चालवणारा म्हणजेच राइडर किंवा KTM चालवणारा फास्ट राइडर असे अजिबात नाही. खरा राइडर तोच जो त्याच्या बाइकवर सगळे राइडिंग गिअर्स घालून इतरांना त्रास न देता त्याच्या बाइकवरुन प्रवासाचा आनंद घेतो. 100 च्या वर स्पीड, जोरजोराने हॉर्न वाजवणे आणि लाऊड सायलेन्सरचा आवाज करून लोकांना त्रास देऊन कोणी कधीच स्वतः राइडर म्हणवून घेऊ नये. जसा रस्ता तसाच आपला स्पीड असावा. उगाच “बाइक आहे, कट मारून निघून जाऊ” हा अट्टाहास कशाला? फास्ट रायडर हायस्पीडला बाइक पळवून नाही तर जास्तीत जास्त अंतर कमीत कमी हॉल्ट घेऊन पार करून होतात. हायस्पीडसाठी रेस ट्रॅक असतात हायवे नाही. माझ्यासाठी बाइक रायडिंग म्हणजे बरच काही शिकण्याचं साधन आहे. शांत राहून अडचणीच्या वेळेत सुयोग्य विचार करुन त्या अडचणींचा आणि वेळेचा सामना करणे, कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरवली की त्यासाठी आपण आपोआप आपली सगळी ताकद लावतो आणि यशस्वी होतो, नवीन नाती बनवणे, देशाचा इतिहास अनुभवणे, आजूबाजूच्या लोकांसोबत जोडले जाणे, अश्या अनेक गोष्टी मी रायडिंगमुळे शिकलो. हा क्लब नाही तर एक अखंड कुटुंब डोंबिवली राइडर्स क्लब हा आज एक ग्रुप राहिलेला नसून एक बाईकर्सचं कुटुंब आहे. सगळ्या रायडर्सचे पत्नी आणि मुलंसुद्धा राईडला आवर्जून येतात. आर.टी.ओ.च्या मदतीने आम्ही सेफ्टी गिअर्सचं महत्व बाईक रॅली काढून लोकांपर्यंत पोहोचवतो. डोंबिवली राइडर्स क्लब मुळे मी खूप काही शिकलो, सख्ख्या भावापेक्षा पण जास्त जवळचे राइडर्स मित्र भेटले. एक वेगळी ओळख मिळाली. जसे बाइकच्या हेडलाइटच्या प्रकाशात जितके दिसते, त्याचा अंदाज घेत आपण रस्त्यावर पुढे जात असतो. तसेच आयुष्यच्या वाटेवरून चालताना तुम्हाला तुमचं पुर्ण भविष्य नाही दिसत. एक एका प्रसंगावर हळूहळू मात करत पुढे गेलं की आयुष्याचा प्रवास पण सोपा होतो. - अद्वैत परब, संस्थापक डोंबिवली राइडर्स क्लब तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात