एका बाईकवर मी आणि माझा लहान मुलगा तर दुसऱ्या स्कुटीवर मोठा मुलगा आणि पत्नी असे चौघेजण गोव्याला निघालो होतो. कशेडी घाट सुरू झाला अन् कधी विचार पण केला नव्हाता अशी घटना घडली. ब्रम्हांड डोळ्यासमोर आलं. रात्रीच्या काळोखात काय करावं काही सुचत नव्हतं. अशात..
प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग.
माझं नाव संजय घरती-. वडील नेवी ऑफिसर असल्यामुळे बुलेटशी लहानपणापासून एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. 1987 मध्ये ड्रायविंग लायसन्स मिळताच वडिलांनी मला माझी स्वतःची सेकंड बँन्ड बुलेट घेऊन दिली- त्यावेळी बुलेट चालवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, पण, त्याहूनही ती सांभाळून चालवावी ही महत्वाची गोष्ट मला वडिलांनी आधीच शिकवली होती. रायडींग गिअर्स म्हणजे तेव्हा फक्त हेल्मेट माहिती होतं- पुढं 1989 मध्ये मी बुलेट विकून आय.एन.एन.डी. सुझुकी बाईक घेतली. आजच्या काळातील बऱ्याच रायडर्सना कदाचित हे नाव माहितही नसेल. पण, तेव्हाची यामाहा बरोबर चालणारी ती एकमेव बाईक होती- वडील नेवीत असल्याने आम्ही आधी कांजुरमार्गला नेवीनगरला राहायचो- तिथून लोणवळा मी दीड तासात पोहोचायचो. तेव्हा ते फारच रोमांचक वाटायचं. पण, हळूहळू लग्नानंतर जबाबदाऱ्या आल्या आणि माझ्यातल्या रॅश रायडरचं सेफ रायडरमध्ये परीवर्तन झालं- नवी ओळख.. निन्जा अंकल 2002 मध्ये बजाज कंपनीने मार्केटमध्ये पल्सर उतरवली आणि सगळ्या तरुणाईला फास्टेस्ट बाईक मिळाली. मी सुद्धा लगेच पल्सर घेतली आणि पत्नीसोबत लोणावळा, माळशेज राईड करू लागलो. तेव्हा रायडींग कल्चर इतकं काही खास अस्तित्वात नव्हतं- पण, माझी रायडींगची इच्छा काही वेगळीच होती. अलीकडच्या काळात आम्ही बऱ्याच बाईक्स घेतल्या- माझा मोठा मुलगा दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मी त्याच्यासाठी कावासकीची नुकतीच भारतात लाँच झालेली निन्जा बाईक 2014 साली घेतली- तिचा हिरवा रंग मला पाहताक्षणी आवडला होता- आमच्या घरातील ती पहिलीच मोठी आणि महागडी स्पोर्ट्स बाईक होती. घेतली मुलासाठी होती. पण, त्याचं वय लहान असल्या कारणामुळे मीच सुरुवातीला ती बाईक राइडला नेऊ लागलो. सगळीडके एव्हाना माझी ओळख निन्जा अंकल म्हणून होऊ लागलेली.
एक रायडर बाप म्हणून मला माझ्या मुलाला सुरुवातीपासून एक प्रोफेशनल आणि सेफ रायडर कसा असतो ते दाखवायचं होतं. इतक्या लहान वयात महागडी स्पोर्ट्स बाईक देतोय म्हणून नातेवाईकांचा विरोध होता. पण, मला माहित होतं की मी काय करतोय. मुलांना लहानपणीच योगअयोग्य काय हे दाखवलं तर त्यांना स्वतः ह्या गोष्टी समजायला लागतात. मुलासाठी आणि कदाचित माझ्यासाठी पण मी एक चांगला ग्रुप शोधत होतो, जिथे रायडींगबद्दल योग्य ज्ञान मिळेल आणि माझ्या मुलाला मी त्या ग्रुपसोबत बिनधास्त राइडला पाठवू शकेन. ज्या शोरुममधून मी माझी निन्जा बाईक घेतली, त्यांच्याकडूनच मला डोंबिवली रायडर्स क्लबबद्दल माहिती मिळाली.
DRC हा क्लब नाहीतर कुटुंब मी राहायला उल्हासनगराला ह्या क्लबचं नाव डोंबिवली असल्यामुळे सुरुवातीला मनात शंका होती, की मला आणि माझ्या मुलाला क्लबमध्ये घेतील की नाही. परंतु, हा ग्रुप फक्त नावानं डोंबिवलीचा आहे. सदस्य सगळे उत्तम रायडर्सZ- ग्रुपच्या व्यवस्थापकाने सरळ सांगितले. आपण कोणालाच कुठून येतो, कोणती बाईक चालवतो? ह्यावरुन घ्यायचं की नाही ते ठरवत नाही. शिस्तप्रिय आणि जबाबदार रायडर आहे की नाही यावरुन सदस्य करायचा की नाही हे ठरवतो. अशा प्रकारे 2016 मध्ये आम्ही ह्या ग्रुपचे सदस्य झालो. आज मी गर्वाने सांगू इच्छितो की मी एका ग्रुपमध्ये नाही तर रायडर कुटुंबाचा भाग आहे.
रायडर फॅमिली आम्ही लेह-लडाख, उदयपूर, उत्तराखंड अशा अनेक लांब पल्ल्याच्या एकत्र राइड केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आता राइडला एकटा नाही तर माझी दोन्ही मुलं आणि पत्नी देखील सोबत असते. आज रायडर फॅमिली अशी ओळख बनली आहे. एक सोलो रायडर ते रायडर फॅमिलीच्या आजवरच्या अनेक राइड दरम्यान मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. मला सुरुवातीपासून गॅजेटची फार आवड आहे. ग्रुपमध्ये राइड करताना किंबहूना सोलो राइड करताना हेल्मेट, जॅकेट, हँड ग्लोव्ह्ज, शूज सोबत तुम्ही एक अॅक्शन कॅमेरा सतत सोबत ठेवावा असं मला वाटतं. त्याने टिपलेल्या व्हिडीओंमध्ये आपल्याला नुसती राइडची आठवणच नाही तर आपण कुठे चुकलो, कधी काय होऊ शकतं? याची जाणीव होते. तसच उद्या चुकून अपघात वैगेरे झालाच तर अशा परिस्थितीत काय करता येऊ शकतं? याची आधीच तयारी करता येते. ग्रुप राइडमुळे मला फारच सेफ वाटतं. आज माझ्या दोन्ही मुलांना हेल्मेट आणि सेफ्टी रायडींग गिअर्सचं महत्व त्यामुळेचं पटलं आहे. सुरुवातीला एकटा कुठेही राइडला जायचं म्हटलं तर टेंशन असायचं. त्यात पत्नी, मुलांसोबत जाताना दहावेळा विचार करायला लागायचा. परंतु, आता असं अजिबात होत नाही. ग्रुपसोबत असल्याने बिनधास्त फिरण्याची हिंमत तयार झाली आहे.
त्या दिवसापासून कानाला खडा लावला नवीन निन्जा घेतली होती. त्यावेळी उत्साहापोटी मी, माझी दोन मुलं आणि पत्नी. एक निन्जा आणि दुसरी होंडा डिओ स्कुटर घेऊन अचानक ठरवलं की गोव्याला जाऊयात. मुलाकडं नुकतेच लायसन्स आलं होतं. त्याच्यासोबत त्याची आई आणि निन्जा वरुन माझ्या छोट्या मुलाल घेऊन मुंबई गोवा हायवेवरुन निघालो. माझ्या मुलांसाठी हा पहिलाच इतका लांब पल्ल्याचा राइड अनुभव असल्याने जसाजसा दिवस मावळत गेला तसा त्यांचा उत्साह आणि स्पीड दोन्ही कमी होत गेलं. तरी आम्ही अंधारातून हळूहळू पुढे सरकत होतो. कशेडी घाट सुरू झाला आणि कधी विचार पण केला नव्हाता अशी घटना घडली. डिओची पेट्रोल टाकी फारच लहान असल्याने जेमतेम 4 लिटर पेट्रोल त्यात मावतं. बराच वेळ गाडी चालवून पण आम्ही पोहचत नसल्याने निराशेने माझ्या मुलाचं पेट्रोलच्या काट्याकडे लक्षं नव्हतं. आणि घाटाच्या मधोमध आमची डिओ बंद पडली. ब्रम्हांड डोळ्यासमोर आलं. रात्रीच्या काळोखात मी पुढे जाऊन पेट्रोल घेऊन येईल किंवा पेट्रोलचा पाईप असेल तर निन्जा मधलं पेट्रोल काढून डिओमध्ये टाकेन असे दोन अशक्यप्राय पर्याय आमच्यासोर होते. घाटात पेट्रोलसाठी पाईप मिळणार नव्हता. ना बायकापोरांना रस्त्यात एकटं सोडू शकत होतो. कसेबसे पेट्रोल अरेंज केलं आणि तिथपासून कानाला खडा लावला. तेव्हा जर माझ्यासोबत ग्रुप असता तर हे घडलं नसतं. जसे पूर्वीच्या काळात योद्धे लढाईला जायचे आणि स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखत, जिरेटोप वापरायचे ते फक्त लढण्यासाठी जातानाच नाही तर तालमीच्या वेळेला सुद्धा वापरत होते. कारण, परिस्थिती सांगून येत नाही. आजच्या काळातील रायडर्ससाठी हेल्मेट आणि जॅकेट चिलखत आणि जिरेटोपापेक्षा कमी नाही. अरे इथेच तर जायचं आहे, हेल्मेट कशाला? हा विचार बंद झाला पाहिजे.
वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी मुलासोबत उत्तराखंडला वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी मी डोंबिवली रायडर्स क्लबच्या इतर अनुभवी सदस्यांसोबत उत्तराखंडची राइड केली. सोबत अनुभवी रायडर्स असल्याने तशी भिती उरली नव्हती. पण, ह्या वयात 18 दिवस शरीर साथ देईल का? हा प्रश्न मनाला सारखा भेडसावत होता. माझं गाव देहाराडून उत्तराखंडची राजधानी- लहानपणापासून तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा आणि अति थंड हवामानाचा अनुभव होता. त्यामुळे ह्या वयात मला हे जमेल की नाही हा प्रश्न होता. शेवटी राइडचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागला. 1 जानेवारी 2022 ला आम्ही चार रायडर्स सकाळी पाच वाजता निघालो. अचानक आदल्या दिवशी लहान मुलगा म्हणाला मी पण येतो तुमच्यासोबत. त्याला डबलसीट घेऊन आम्ही निघालो. पत्नीचा विरोध होता. कारण, तब्बल 18 दिवस 5000 किलोमीटरचा प्रवास तो सुद्धा डबलसीट. मग विचार केला life without Problems like body without Soul हेच तर मी आजवर जगलो आहेs- आता वयाच्या आकड्यात अकडून राहू? आणि निघालो. डोंबिवली ते हरिद्वार काहीच वाटले नाही. कदाचित लेह-लडाख आणि इतर राइडचा अनुभव होता म्हणून. हरीद्वारपासून पुढे मोठमोठी आव्हानं येऊन उभी राहू लागली. अचनाक ढगफुटी सारखा पहाडी वादळी पाऊस तर कुठे दरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद.
वय हा फक्त एक आकडा ह्या आव्हानांना ओव्हरटेक करत करत आम्ही जोषीमठला पोहचला. औली हे आमचं ह्या राइडचं मुख्य डेस्टीनेशन होतं. भारतातलं स्वित्झरलँड म्हणून औली प्रसिद्ध आहे. आव्हानं प्रत्येकासमोर येत असतात. त्यावर मात करण्याचे दोन मार्ग असतात. एक तर जे आहे त्याला स्वीकार करा किंवा त्यावर मात करा. आम्ही रायडर्स नेहमीच दुसरा मार्ग पत्करतो. औलीला जोषीमठहून रोप वे ने जाता येतं. कोविडचे पेशंट सापडल्यामुळे आम्ही पोहचण्याच्या एक दिवस आधी रोप वे बंद करण्यात आला होता. इतक्या दूर येऊन औली नाही बघणार तर काय फायदा? टॅक्सीवाले पण यायला तयार होत नव्हते. कारण, बर्फवृष्टीमुळे घाटात गाड्या चढू शकत नव्हत्या. अशात मी जिद्दीने निघालो. माझ्याकडे जावा बाईक होती. निसरड्या रस्त्यावरुन जिथं पायी चालणं अवघड आहे, तिथून माझी बाईक हळूहळू पुढे जात होती. आजवरचे आयुष्यातले सगळे रायडींगचे अनुभव वापरले आणि मी औलीच्या बेसकँपला पोहोचलो. जग जिंकल्याची फिलींग माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मायनस 4 डिग्री सेल्सिअस तापमानात घामाघूम झालेलो मी आयुष्यातील एक वेगळीच कामगिरी करुन मी उभा होतो. माझे इतर रायडर मित्र मात्र त्यांच्या केटीएम घाटाच्या सुरुवातीलाच अगदी 100 मीटर अंतर कापण्यासाठी सूर्यास्त होईपर्यंत प्रयत्न करत होते. त्यादिवशी औलीला पोहचणारी माझी एकमेव बाईक होती. आजही मी गर्वाने सांगतो की Age is just Number आणि ते मी सिद्ध केलं आहे, केवळ रायडींगमुळेच.
- संजय घरती, बाईक रायडर, उल्हासनगर