मुंबई, 3 डिसेंबर : आगामी काही महिन्यांत तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर रहस्य आणि कल्पकतेसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मध्य प्रदेशातील (madhya pradesh) छतरपूर येथे असलेल्या खजुराहोला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. म्हणजेच, तुम्ही आतापासून पुढील 3-4 महिन्यांत कधीही खजुराहोला जाऊ शकता. यातही फेब्रुवारी महिन्यात खजुराहोला (khajuraho) जाण्याचा विचार केला तर ते अधिक चांगले होईल. तुम्ही विचार करत असाल की फेब्रुवारीतच का? याबद्दल तुम्हाला सांगणार आहोतच. पण आधी खजुराहोबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. जर एखाद्याला लैंगिक सौंदर्य, वैचारिक मोकळेपणा, शारीरिक सौंदर्य आणि कलात्मक जिवंतपणा पाहायचा असेल तर त्याने एकदा खजुराहोच्या भूमीवर यावे. गर्भगृहात देवी-देवतांच्या मूर्ती आणि भिंतींवर सृष्टीची सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री-पुरुष प्रणयाचं उलगडलेलं चित्रण अशी मंदिरं क्वचितच इतर कुठं असतील. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, प्रेम, सौंदर्य आणि लैंगिक संबंधांची पूजा करणारा समाज आपल्या तथाकथित विकसित समाजापेक्षा कितीतरी पुढे आणि वैज्ञानिक विचारसरणीचा होता. खजुराहोच्या भूमीवर पसरलेली विशाल मंदिरांची साखळी पाहून याचीच प्रचिती येते. चारित्र्य, वासना आणि गुप्ततेच्या नावाखाली माणूस आपल्या नैसर्गिकपणापासून आणि तार्किक विचारांपासून किती दूर गेला आहे, याचा अंदाज इथं येऊ शकतो. खजुराहोची वैशिष्ट्ये Features of Khajuraho खजुराहो हे 1000 वर्षांहून अधिक जुन्या हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोने त्यांना जागतिक वारशाचा दर्जा दिल्याने या मंदिरांचे महत्त्व तुम्ही समजू शकता. ही मंदिरे दोन भागात विभागली गेली आहेत - पश्चिम गट आणि पूर्व गट. सर्वात मोठी आणि भव्य मंदिरे वेस्टर्न ग्रुपमध्ये आहेत. बहुतेक मंदिरे भगवान शिव किंवा विष्णूची आहेत. कंदरिया महादेव मंदिर सर्वात मोठे आणि भव्य आहे. याशिवाय सूर्य मंदिर, लक्ष्मण मंदिर आणि वराह मंदिरही पाहण्यासारखे आहे. येथील जैन मंदिरही अतिशय सुंदर आहेत.
खजुराहोतील प्रणय चित्रण Love depiction in Khajuraho तसं पाहिलं तर भारतात इतर ठिकाणीही अशी मंदिरे आहेत. जिथे कामुक प्रतिमा चित्रित केल्या जातात. मात्र, खजुराहोमध्ये एका वेगळ्याच मोहिनीने रंगवलेली ही शिल्पं स्वतःच एक वेगळी निर्मिती आहे. मध्य प्रदेशला भेट देण्यासाठी जेव्हाही जाल तेव्हा या युनेस्को हेरिटेजला भेट द्यायला विसरू नका. याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातील कथा सांगणाऱ्या अशा अनेक मूर्ती येथे कोरल्या आहेत. जाणकारांच्या मते या मूर्ती रंगवण्याचा एक मुख्य उद्देश आहे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याने आपल्या मनातून या गोष्टी काढून स्वच्छ मनाने आत प्रवेश करावा.
काय पहायला मिळणार?
- खजुराहो मंदिर
- लक्ष्मण मंदिर
- पन्ना राष्ट्रीय उद्यान
- अंजीगड किल्ला
- राणेह फॉल्स
- पुरातत्व संग्रहालय खजुराहो
- बेणी सागर धरण
- जैन संग्रहालय
चौर्याऐंशी मैदानांवर यज्ञानंतर भव्य मंदिरे बांधणे हा चंदेल राजांच्या उपासना आणि कलाप्रेमाचा पुरावा आहे. या चौराष्ट मंदिरांपैकी सध्या फक्त बावीस मंदिरे उरली आहेत. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, चंदेला राजांचे स्मारक म्हणून हे कलात्मक मंदिर ग्रॅनाइट आणि वाळूच्या दगडापासून साकारलं आहे. यामध्ये पाश्चात्य समूहातील मंदिर कला, कलाकुसर आणि स्थापत्यकलेचे अनोखा अविष्कार आहे. इंडो-आर्यन परंपरेतील या मंदिरांमध्ये मूर्तींची विपुलता आहे. Hampi | हंपी: इतिहास आणि पौराणिक कथा जिवंत करणारी नगरी! फेब्रुवारी महिन्यातचं का जावं? मध्य प्रदेश सरकार दरवर्षी खजुराहो नृत्य महोत्सवाचे आयोजन करते. हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात असतो. या दरम्यान देशातील आघाडीचे शास्त्रीय नर्तक येथे येतात आणि खजुराहोच्या ऐतिहासिक मंदिरांच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात त्यांना नृत्य करताना पाहून असे वाटते की जणू कामदेव आणि रतीच स्वर्गातून पृथ्वीवर आले आहेत. नृत्य महोत्सवात दररोज सायंकाळी 7 ते रात्री उशिरापर्यंत एक कार्यक्रम असतो. तिकिटे येथे मोफत आहेत. आता कोविड निर्बंध उठवल्यामुळे हा महोत्सव पुन्हा सुरू होणार आहे.
कसं पोहचणार? how to reach khajuraho विमानानं जायचंय? खजुराहोला विमानतळ असल्याने तुम्ही काही तासांत मुंबईहून थेट पोहचू शकता. विमानतळ खजुराहोच्या दक्षिणेस सुमारे 2 किमी अंतरावर आहे. विमानतळावर आल्यावर, खजुराहोमधील हॉटेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी स्थानिक कॅब किंवा टॅक्सी भाड्याने घेऊ शकता.
रोड ट्रीप रस्त्याने जायचा विचार करत असाल तर लक्षात असुद्या तुम्हाला 1 हजार 143 किलोमीटर जायचं आहे. खजुराहोला पोहचायला तुम्हाला 17 ते 20 तास लागू शकतात. दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही बसनेही जाऊ शकता. बसला तीन हजार रुपयांपर्यंत तिकीट लागू शकते.
रेल्वे खजुराहोपासून सुमारे 63 किमी अंतरावर महोबा हे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मुंबई आणि इतर प्रमुख भारतीय शहरांतील महत्त्वाच्या गाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेर उपलब्ध असलेल्या कॅब आणि ऑटो प्रवाशांना खजुराहोमध्ये कुठेही घेऊन जातात.