जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / 12 राज्य, 6400 KM अंतर अन् पाच Bike Riders चा भीमपराक्रम! थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवरच नोंद

12 राज्य, 6400 KM अंतर अन् पाच Bike Riders चा भीमपराक्रम! थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवरच नोंद

12 राज्य, 6400 KM अंतर अन् पाच Bike Riders चा भीमपराक्रम! थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डवरच नोंद

भारतातील चार दिशांच्या महत्त्वाच्या मेट्रो शहरांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून 6400 किलोमीटरचे अंतर 18 दिवसात आम्ही बुलेट गाडी वरून कापायचं ठरवलं. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात अशा 12 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात घोडदौड करीत आम्ही गोल्डन क्वेअड्रीलेटरलचा प्रवास पूर्ण केला याबद्दल आपल्याशी थोडेसे हितगूज.

  • -MIN READ
  • Last Updated :

क्रीडाक्षेत्र हे आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे क्षेत्र! खेळाला आपल्या आयुष्यात एक अविभाज्य स्थान आहे. खेळांमुळे शारिरीक स्वास्थ्य टिकतेच. परंतु, आपापसातील एकोपा सद्भावना खिलाडूवृत्ती इत्यादींची जोपासना होते. असाच एक साहसी क्रीडा प्रकार म्हणजे बाईक रायडिंग. आम्ही रॉयल बुलेट इयर्स पुणेच्या प्रसिद्ध बाईक रायडिंग क्लबचे अनुभवी व सन्माननीय सदस्य आहोत. आम्ही बाईकवर भारत भ्रमणचे स्वप्न पाहिले आणि भारत देशाचा अभिमान असणार्‍या स्वर्णिम चतुर्भुज, सुवर्ण चतुष्कोण किंवा गोल्डन क्वेअड्रीलेटरल किंवा जी क्यू नावाने प्रसिद्ध असलेले आणि भारतातील चार दिशांच्या महत्त्वाच्या मेट्रो शहरांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून 6400 किलोमीटरचे अंतर 18 दिवसात आम्ही बुलेट गाडी वरून कापायचं ठरवलं. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात अशा 12 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात घोडदौड करीत आम्ही गोल्डन क्वेअड्रीलेटरलचा प्रवास पूर्ण केला याबद्दल आपल्याशी थोडेसे हितगूज. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. कौतुकास पात्र अशी ही कामगिरी करताना आम्ही देशातील महत्त्वाच्या औद्योगिक, शेतकी, सांस्कृतिक, धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्याचे वृत्तांकन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर पोहोचवले. क्लीन इंडिया ग्रीन इंडिया हा संदेश घेऊन आम्ही कर्नाटकातील बंगळूर तामिळनाडूमधील चेन्नई आंध्र प्रदेशातील विजयवाडा, विशाखापट्टणम, ओरिसातील जगन्नाथ पुरी, भुवनेश्वर पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता, बिहार मधील औरंगाबाद, बोधगया यामार्गे कूच करीत वाराणसीला भेट दिली. तिथून ओरिया मार्गे लखनौ आग्रा एक्स्प्रेस वे ने प्रवास करीत जगातील सात आश्चर्यांपैकी प्रसिद्ध असलेल्या ताज महाल आग्रा शहराला धडक मारली. तिथून जगप्रसिद्ध अशा यमुना एक्सप्रेस किंवा ताज एक्सप्रेस वरून वेगाने बुलेट चालवत आम्ही दिल्ली सर केली. दिल्लीनंतर आम्ही गुलाबी शहर जयपुर सिटी ऑफ लेख उदयपूर गाठले ही शहरे मागे टाकीत आम्ही गुजरातच्या राजधानीच्या शहरात गांधीनगर मध्ये प्रवेश केला. नंतर अहमदाबाद वडोदरा सुरत मार्गे आम्ही आपल्या माय भूमी म्हणजेच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबापुरीत पाऊल टाकलं. मग आम्ही विद्येचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरी मध्ये प्रवेश केला आणि आम्ही पाहिलेले स्वप्न साकार झाले. असा भीमपराक्रम करणाऱ्या मोजक्या अजिंक्य वीरांच्या रांगेत आम्ही जाऊन बसलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुवर्ण चतुष्कोण हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आहे. भारतातील औद्योगिक, शेतकी, सांस्कृतिक आणि धार्मिक ठिकाणांना या राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहे. हा महामार्ग संपूर्ण नकाशावर पाहिला असता त्याचा चतुष्कोणचा आकार होतो. भारताच्या उत्तरेकडील दिल्ली पूर्वेकडील कोलकत्ता पश्चिमेकडील मुंबई आणि दक्षिणेकडे चेन्नई या मेट्रो शहरांना या महामार्गाने जोडलेले आहे. या सुवर्ण चतुष्कोण महामार्गावर प्रवास करताना मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई या शहरांबरोबर भारतातील इतर शहरातूनही प्रवास करीत आम्ही जी क्यू चे स्वप्न साकार केले. आम्ही सुवर्ण चतुष्कोण महामार्गावर अजून प्रवास करताना पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, रणीबेंनुर, दावणगेरे, चित्रदुर्ग, सिरा, तुमकुर, बेंगलोर, होसुर, कृष्णागिरी, बनीअंबडी, अंबुरे, पल्लिकोंदा, वेल्लोर, राणीपेठ, कांचीपुरम, श्रीपेरंबदूर, चेन्नई, नेल्लोर, कायलि, ओंगोले, गुंटूर, विजयवाडा, राजमहेंद्री, विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, बहरामपुर, भुवनेश्वर, कटक, बालासोर, खरकपूर, कोलकत्ता, वर्धमान, दुर्गापुर, असंसोल, धनबाद, बागोदर, बरी, चंपारण्य, दोभी, शेरघाटी, औरंगाबाद, देहरी, ससाराम, रुद्रा, मोहनिया, चंदोली, वरणासी, अलाहाबाद, फत्तेपूर, कानपूर, विटावा, फिरोजाबाद, आग्रा, मथुरा, फरीदाबाद, दिल्ली, गुरगाव, जयपुर, अजमेर, चित्तोडगड, उदयपूर, गांधिनगर, आमदाबाद, नाडियाड, आनंद, वडोदरा, अंकलेश्वर, भरूच, सुरत, नवसारी, वलसाड, वापी, सिलवासा, मुंबई, पनवेल, खंडाळा,  लोणावळा, पुणे स्वप्नवत प्रवास केला. बुलेट गाडीवर हा प्रवास करताना अतिशय जोखीम पत्करत आम्ही कलकत्ता दिल्ली चौदाशे 53 किलोमीटर प्रवास करताना नॅशनल हायवे 44 आणि नॅशनल हायवे 19 याचा वापर केला. दिल्ली-मुंबई या महामार्गावरून प्रवास करताना आम्ही चौदाशे 19 किलोमीटर गाडी चालवताना राष्ट्रीय महामार्ग 48 चा वापर केला.मुंबई-चेन्नई बाराशे नव्वद किलोमीटर गाडी चालवताना नॅशनल हायवे 48 वरून आम्ही मार्गक्रमण केले. आणि चेन्नई कलकत्ता प्रवास करताना सोळाशे 84 किलोमीटर गाडी चालवत आम्ही नॅशनल हायवे 16 वरून प्रवास केला. या संपूर्ण प्रवासाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेतली असून आम्हा सर्वांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रशस्तीपत्र मेडल देऊन आमचा यथोचित गौरव केला आहे. आमच्यापैकी सर्वात लहान रायडर अथर्व कोकीळ हा फक्त एकवीस वर्षाचा तरुण सुवर्ण चतुष्कोण राईड पूर्ण करणारा सर्वात तरुण ठरला आहे तसेच वयाच्या 62 व्या वर्षी चतुष्कोणची मोहीम पूर्ण करणारे भरत जाधव हे सर्वात जास्त वयाचे सुवर्ण चतुष्कोण बाईक वरून पूर्ण करणारे रायडर ठरले आहेत. आमचे आरबीपीचे सर्वेसर्वा गजानन सरकाळे सर्वात कमी बाईक रायडिंगचा अनुभव असलेले अमोल मोरे आणि आरबीपीचे आधारस्तंभ सर्वात अनुभवी रायडर संतोष होनकरपे सर्व रायडर्सने सुवर्ण चतुष्कोणची मोहीम वीस दिवसात पूर्ण करून इतिहास घडवला आहे. हा इतिहास इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या 2023 च्या या पुस्तकामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. ही बुलेट राईड, खडतर प्रवास करताना आम्ही जवळपास संपूर्ण भारताला प्रदक्षिणा मारली. आमचा प्रवास नेमका कसा झाला दिवसभराच्या शेडूल काय असायचं आम्हाला रस्त्यात काय अडचणी आल्या याबद्दलचे बारकावे आपल्याशी शेअर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. सुवर्ण चतुष्कोण बाईक मोहीम रात्री बारा वाजता माझ्या मोबाईलची रिंग वाजली समोरून आमचा सर्वात तरुण रायडर अथर्व बोलत होता, सर झाली का तयारी? सकाळी कात्रज उद्यानापाशी वेळेत या, लवकर निघू आपल्या उद्याचे टारगेट आठशे किलोमीटरच्या पुढे आहे. थेट बेंगलोर गाठायचे आहे. अथर्व खूप उत्साहात होता. कारण, खूप दिवसांचे आमचे स्वप्न साकार होणार होतं. ते प्रत्येक बाईक रायडरच्या बकेट लिस्टमध्ये असणारे स्वप्न. रस्त्याने जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करुन संपूर्ण भारताला प्रदक्षिणा घालायचं स्वप्न होतं. सुवर्ण चतुष्कोण या महामार्गावरून प्रवास करून देशाला क्लीन इंडिया ग्रीन इंडियाचा संदेश द्यायचा. म्हणतात ना स्वप्न पाहिल्या शिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही किंवा पूर्ण होत नसते. असेच एक स्वप्न आरबीपीच्या पाच शिलेदारांनी पाहिले. भारतातील चारी दिशांना असणाऱ्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली या मेट्रो शहरांना भेटी द्यायचं, स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले नाही तर ते आरबीपीचे शिलेदार कसले? आरबीपीचे लाडके व्यक्तिमत्व गजानन सरकाळे, वय वर्ष 21 असलेला आमचा सर्वात छोटा रायडर अथर्व कोकीळ, सर्वात वडीलधारे असणारे भरत जाधव, रायडिंगचा सर्वात कमी अनुभव असलेले अमोल मोरे, सर्वात अनुभवी रायडर संतोष होनकरपे हे शिलेदार 18 नोव्हेंबर 2021 रोजी जी क्यू मोहिमेला निघाले. ठरलेल्या वेळेत मी आणि अमोल पिंपरी चिंचवड वरून कात्रजला पोहोचलो. आमच्या सगळ्या मोहिमांचे सुरुवात कात्रज चौकतूनच होते. आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्धगायक आणि माझे मित्र चंद्रशेखर महामुनी, आमचे गुरुवर्य गुमास्ते सर लंगोटी यार अभिजीत, मिलिंद रायडर, अथर्वचे बाबा आणि इतर मित्र मंडळी आधीच येऊन थांबले होते. सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्वीकार करत गाड्यांची पूजा करून आम्ही सर्वांचा निरोप घेतला. मोहीम सोपी नव्हती अतिशय जड वाहतूक असणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर आम्हाला सुरक्षितपणे गाडी चालवायची होती. हायवेवर आताताईपणा करून चालणार नव्हते, कारण हायवेवर चुकीला माफी नाही हे वाक्य आम्हा सर्वांच्या मनावर बसलेले होते. महाबळेश्वर फाट्यानजीक पेटपूजा केली. आमचे आजचे टारगेट थेट बेंगलोर होते. ते 800 किलोमीटरचा टप्पा होता. आमच्याबरोबर चार हिमालयीन बुलेट आणि माझी थंडरबर्ड फाइव हंड्रेड एकूण पाच गाड्या होत्या. नोव्हेंबर महिना असल्याने वातावरण थंड होते बंगलोरचे बोर्ड पटापट मागे जात होते, इतक्यात वातावरण बदलले थोडा रिमझिम पाऊस चालू झाला, त्यावेळी आम्ही चित्रदुर्गा शहराच्या थोडेसे अलीकडे होतो. रिमझिम पावसाचा सिलसिला संपून निसर्गाने रौद्र रूप धारण केले. आता अतिशय जोरदार पाऊस चालू झाला. अचानक आभाळ भरुन आल्याने अंधारून आले होते, पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी हेल्मेटच्या काचेवर जोरदार तडाखे बसत होते, पुढचा रस्ता दिसत नव्हता, एका जागी थांबलो आणि सर्वानुमते पुढे गाडी न चालवता चित्रदुर्गा मध्ये मुक्काम करायचे ठरवले. मुक्कामासाठी हॉटेल नेटवरून शोधले, आम्ही बायपासला असल्याने ऑप्शन्स खूप कमी होते, हायवेपासून थोड्या अंतरावर हॉटेल मिळाले. भिजलो होतो, छान गरम पाण्याने अंघोळ करावी तर गरम पाणी सकाळी मिळेल असा निरोप आला. पावसात अडकण्यापेक्षा पाठ टेकायला जागा मिळाली होती, जेवण ऑर्डर केले, जेवण करुन छान झोपलो. ओले कपडे, रायडिंग गिअर्स बाहेर लॉबीमध्ये ठेवले होते. अशा लहरी वातावरणाचा अनुभव असल्याने सर्वांच्या सॅडल बॅग वॉटरप्रूफ घेतल्या होत्या. तसेच आतील सामान भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्याही सोबत होत्या. हॉटेलच्या मॅनेजरकडून कर्नाटक मध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे आणि चेन्नईमध्ये पावसाने खूप धुमाकूळ घातला आहे असे कळाले. कधी नव्हे इतका पाऊस चेन्नईमध्ये आहे असे कळाले. आंध्र मधील तिरुपती मंदिर मध्ये पाणी घुसले असून सगळीकडे हाहाकार माजला आहे हे असे व्हाट्सअप व्हिडीओ सगळीकडे फिरत होते. पुढचा प्रवास बंगलोर, चेन्नई आंध्रातील विजयवाडा असा होता. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. आताही पाऊस प्रचंड कोसळत होता. उद्या या पुढच्या प्रवासाला निघता येईल की नाही याची शाश्वती नव्हती. ती मोहीम कॅन्सल होते की काय अशी चिंता वाटू लागली. जेवून थोड्या गप्पा मारून आम्ही सर्वजण झोपी गेलो. पहिला टप्पा बंगलोरला न जाता आल्यामुळे थोडे नाराज होतो. पण मोहिमेत योग्य वेळी योग्य निर्णय खूप महत्त्वाचा असतो. चित्रदुर्गला थांबणे शहाणपणाचा निर्णय होता. सकाळी सातला जाग आली संपूर्ण प्रवासात दुपारचे जेवण घ्यायचे नाही असे ठरले होते, त्यानुसार आठ वाजता आता न्याहारी करून तयार झालो होतो. पाऊस थोडासा उघडला होता, पुढचा प्रवास नक्कीच खडतर असणार याची सर्वांना जाणीव झाली होती. पुढच्या प्रवासाला निघालो. सर्वांनी पोंचू रेनकोट बरोबर ठेवले होते ते घालूनच प्रवास सुरु केला. पुन्हा पाऊस सुरू झाला, पावसाचा धमाका बघता जेमतेम बंगलोरला पोहोचू असे वाटत होते. सर्वांनी पावसात अत्यंत सावधपणे गाडी चालवताना आपला सर्व अनुभव पणाला लावला होता. एक एक किलोमीटर मागे टाकत होतो, एकशे पस्तीस किलोमीटर अंतर कापत तुमकुरला पोहोचलो. पावसाने पिच्छा सोडला नव्हता. संपूर्ण बंगलोर सिटीला बायपास करणारा नाईस नावाचा रोड पुढे मैसूरपर्यंत जातो. दुचाकीलाही टोल असणारा हा रोड बंगलोर मधील प्रचंड वाहतूक चुकवत आपल्याला थेट बेंगलोरच्या बाहेर नेऊन सोडतो. दि नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्राइजेस रोड म्हणजेच नाईस रोड. याआधीही भरपूर वेळा या नाईस रोडवरून प्रवास केला होता. परंतु, यावेळी रस्त्याची खूप दुरावस्था झाली होती, खड्डे पाऊस चालू वाहनांची गर्दी चुकवत तसेच कर्नाटकातील स्थानिक रायडर बरोबर स्पर्धा न करता नाईस रोड पार करून होसुर गाठले. इलेक्ट्रोनिक सिटी मध्ये असणाऱ्या मॉलमधून अथर्व गजानन आणि भरत सरांनी पावसाळी पॅन्ट खरेदी केली. आता शूज पण भिजणार नव्हते. सर्व गाड्यांवरील सामान सांभाळत मी आणि अमोल बाहेर उभे होतो. आमचा रायडर अथर्व यास त्याच्या मापाची डबल एक्स एल पॅन्ट इथे मिळाल्याने तो भलताच खुश होता. होसुरला हायवे जवळ हॉटेलमध्ये मुक्काम केला. जेवण हॉटेलमध्येच आले मिळाले. आज जेमतेम अडीशे किलोमीटर गाडी चालवता आली होती. सगळा प्रवास पावसातच केला होता. होसुरला पाऊस नव्हता थोडेसे हायसे वाटले, खरी कसोटी उद्या लागणार होती. संपूर्ण चेन्नई शहर जलमग्न झाले आहे असे बातम्यांमधून कळाले होते. चेन्नईला असणाऱ्या काही मित्रांकडे पावसाच्या परिस्थितीबद्दल विचारणा चालू होती, गुगलची पण मदत घेऊन पुढील वाटचाली बद्दल ठरवत होतो. जेवण करून झोपी गेलो . सकाळी नाश्ता करून चेन्नईकडे प्रयाण केले. आज पाऊस बिलकुल नव्हता. आज वेगळेच आव्हान होते, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गाडी खूप हळू चालवावी लागत होती, आजचा टप्पा जवळपास तीनशे दहा किलोमीटरचा होता. जसजसे चेन्नईकडे प्रयाण केले काही नद्यांवरील पुलापाशी प्रचंड वाहतूक कोंडी होती, शेकडो लोक रस्त्यावरून चालत होते, रस्त्याच्या कडेला पुलावर जिथे जागा मिळेल तिथे वाहने लावून सगळ्यांनी पुलावर गर्दी केली होती. सुरुवातीला एखादा अपघात झाला असावा म्हणून बघ्यांनी गर्दी केली आहे आहे असे आम्हाला वाटले, परंतु प्रत्यक्षात पुलावर गेल्यावर इतकी गर्दी का? या प्रश्नाचा उलगडा झाला. चेन्नई परिसरात प्रचंड झालेल्या या पर्जन्यवृष्टीमुळे सर्व नद्या या हिवाळ्यात दुथडी भरून वाहत असल्याचा नजारा बघण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. नजर जाईल तिथपर्यंत नद्यांचे मोठे पात्र दुथडी भरून वाहताना त्या पाण्याने केलेला विनाश, बुडालेली घरे, बुडालेली शेती सर्वत्र दिसत होती. हे पावसाचे चित्र पावसाळ्यातील नसून हिवाळ्यातील होते हे विशेष. संध्याकाळी सातच्या दरम्यान चेन्नई शहरात प्रवेश केला, चौफेर पावसाने केलेली चेन्नईची दुर्दशा आम्ही प्रत्यक्ष बघत होतो. सगळीकडे पाण्याचे साम्राज्य होते. आज आम्ही चांगले हॉटेल पाहायचे आणि थोडे एंजॉय करायचे ठरविले त्याला कारणही तसेच होते, आमचा रायडर अमोल यांचा वाढदिवस होता. रात्री साजरा करायचा ठरविला. चेन्नई शहरात खूप गर्दी आणि पावसाने रस्ते तुंबलेले असल्याने शहराच्या थोडे अलीकडे एक उत्तम हॉटेल पाहून राहायचं ठरल. एक छान हॉटेल मिळाले आणि आजचा टप्पा पार पडला. पुण्याहून निघून आज तिसरा दिवस होता भारताच्या दक्षिण दिशेला असलेल्या तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरात पावसाने आमचे स्वागत केले नाही ही खूप दिलासा देणारी बाब होती. आम्ही जी क्यू मिशन हा पहिला टप्पा चेन्नई पार केला होता. रात्रीची पार्टी अमोलने दिली. आम्ही केक कापून अमोलचा वाढदिवस साजरा केला. जेवण केले झोपी गेलो. सकाळी अमोलने लवकर उठून जवळच असलेल्या या शिव मंदिरात जाऊन जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. अगदी साऊथ इंडियन स्टाइलने त्याने लुंगी घातली होती, माथ्यावर चंदन लावले होते, काल आम्ही त्याला जो सिल्कचा शर्ट गिफ्ट दिला होता त्याचं अमोलनं आज उद्घाटन केले होते. चेन्नईला जाताना रस्त्यात असलेल्या कांचीपुरम या जुन्या मंदिरांसाठी आणि येथील सिल्कच्या साड्यासाठी प्रसिद्ध अशा शहराला आम्ही धावती भेट दिली होती. घरच्यांसाठी सर्वांनी साड्यांची खरेदी केली, तुम्ही त्या तिथूनच कुरियर ने पुण्याला पाठवून दिल्या कारण संपूर्ण प्रवासभर ते आमच्याबरोबर वागवणे शक्य नव्हते. कोमती सिल्क प्रसिद्ध साड्यांचे दुकान आम्ही खरेदीसाठी निवडले होते. त्यादिवशी त्रिपुरी पौर्णिमा असल्याने संपूर्ण दुकान समया, तेलाच्या दिव्यांनी उजळून निघाला होता, दुकानाच्या दारात रांगोळी काढलेली होती, त्या दुकानातील कर्मचारीवर्ग पारंपरिक वेशभूषेत होते, त्यांनी आमचे स्वागत केले. कर्मचारीवर्ग सर्वांची काळजी घेत न कंटाळता आम्हाला त्यांनी शेकडो साड्या दाखवल्या. सुमारे दोन तास आमची साड्या खरेदी मोहीम चालू होती. करून अर्ध्या तासात खरेदी करून निघू असे म्हणणारा अमोल दोन तास तिथे कसा रमला त्याचे त्यालाच कळले नाही. अथर्वने व्हिडिओ कॉल करून आईसाठी मनपसंत साड्या खरेदी केल्या. गजाभाऊ नेही तीच पद्धत वापरून घरच्यांसाठी खरेदी केली. भरत सरांनी सीनियर पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या आपल्या पत्नीसाठी फोन वर बोलून पसंतीची साडी आली घेतली. माझी एनिवर्सरी 22 नोव्हेंबर ला असते त्याचे औचित्य साधून अजून एक सुंदर साडी माझ्या बेटर हाफ साठी घेऊन कुरियरने मी पाठवून दिली आणि आश्चर्य म्हणजे बरोबर 22 नोव्हेंबर रोजी ती पुण्याला घरी पोहोच झाली, थोडीफार नाराज झालेली माझी बायको सरप्राईज मिळाल्यावर नक्कीच खुश झाली असणार यात शंका नाही. आज आम्हाला आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठायचे होते, आजचा टप्पा साधारण चारशे पन्नास किलोमीटरचा होता. हायवे चांगला होता, नेल्लोर, ओंगोले, गुंटूर ही महत्त्वाची शहरे एकापाठोपाठ मागे टाकून आम्ही विजयवाडाला पोहोचलो. हायवेवरील नदीवरील एक पूल पूर्णपणे खचल्याने आणि पाण्याखाली गेल्याने संपूर्ण हायवेवरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. ट्रक ड्रायव्हर यांच्याशी बोलताना अधिक माहिती मिळाली साधारणत ते पन्नास किलोमीटर असेच ट्राफिक जाम आहे, ट्रकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, जाणारा रस्ता पूर्णपणे ब्लॉक आहे अशी माहिती मिळाली. समोरून अधुन-मधुन एखाददुसरे वाहन येताना दिसे. दुचाकीला जायला जागा नाही ते पण पन्नास किलोमीटर, काय करावे मोठा प्रश्न समोर उभा राहिला. पोलिसांची संवाद साधला त्यांनी सांगितले रस्त्याने सरळ पुढे जाता येणार नाही, तुम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने सावकाश वाहने चालवत जात राहा, आम्ही त्यांचे आभार मानले आणि रस्ता दुभाजक ओलांडून वरून पलिकडील रस्त्याच्या  लेन वरून गाडी चालू लागलो, समोरून अचानक वाहने येत होती, आमच्या गाड्यांचे दिवे आम्ही दिवसाही चालू ठेवले होते, खूप सावधगिरीने गाडी चालवावी लागत होती, डावीकडील लेनमध्ये फक्त ट्राफिक मध्ये अडकलेल्या गाड्याच गाड्या दिसत होत्या. ट्रॅफिक मध्ये अडकलेले लोक हतबल झालेले दिसत होते, आम्ही मात्र आनंदी होतो आम्ही पुढे जात होतो आणि वाहनांच्या रांगा मागे मागे जात होत्या. साधारणता 65 किलोमीटर गाडी आम्ही विरुद्ध दिशेने चालवली. शेवटी तो खचलेला पाण्यात बुडालेला पूल आला. तिथे बघ्यांची प्रचंड गर्दी होती, पूल दुरुस्तीचे काम वेगाने चालू होते. आम्ही तिथे थोडा वेळ थांबून पुढच्या प्रवासाला निघालो. दुचाकी होती म्हणून मार्ग काढू शकलो. चार चाकीमध्ये असणाऱ्या लोकांचे हाल 65 किलोमीटर पाहिले होते. एका छान ढाब्यावरती जेवायला थांबलो, हायवे लगत राहण्यासाठी हॉटेल शोधले आणि आजचा विजयवाडाचा टप्पा संपला. विजयवाडा हे शहर आंध्र प्रदेशातील क्रमांक दोनचे शहर आहे. महाराष्ट्र मध्ये महाबळेश्वर येथे हे उगम पावणाऱ्या आणि पूर्ववाहिनी असणाऱ्या कृष्णा नदीच्या काठी विजयवाडा शहर वसलेले आहे. सभोवताली पूर्व घाटाच्या डोंगररांगा आहेत, त्यांना इंद्रकीलाद्री डोंगर रांगा नावाने ओळखले जाते. आंध्र प्रदेशच्या अगदी मध्यभागी विजयवाडा शहर वसले. विजयवाडा आंध्र प्रदेशची आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक राजधानी आहे. विजयवाडा शहराचे पूर्वीचे नाव विजय वाटिका होते तर ब्रिटिश कालीन नाव बेजवडा होते. रोज झोपण्याआधी दिवसभर केलेल्या प्रवासाबद्दल आम्ही एकमेकांशी बोलत असतो, गाडी चालवताना एखाद्या रायडरची एखादी चूक लक्षात आली तर त्याविषयी चर्चा करून अशी चूक पुन्हा न करण्याची त्याला सूचना करणे, दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग करणे ही महत्त्वाची कामे आम्ही न चुकता करत असायचो. रोजचे मुक्कामाचे हॉटेल शोधायचे काम अथर्व कडे असे. तो नित्यनियमाने दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडत असे. गजाभाऊ, भरत सर त्याला मदत करीत असत. आमचा पुढचा मुक्काम विशाखापट्टणम होता. आता हायवे अतिशय सुंदर होता, काही रस्ते तर इतके सुंदर होते की आपण भारतात गाडी चालवत आहोत हे मनाला पटवून द्यावे लागे. आजचा प्रवास जास्त नव्हता विजयवाडा ते विशाखापट्टणम अंतर साधारणता साडेतीनशे किलोमीटर होते. विजयवाडापासून साधारणत दीडशे किलोमीटरवर राजमहेंद्री हे शहर लागते. महाराष्ट्रातील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणार्‍या गोदावरी नदी पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला राजमहेंद्री येथे मिळते. उंचच उंच आणि लांब रेल्वे ब्रिज आणि गोदावरी नदीवरील पूल आणि समुद्रासारखे दिसणारी गोदावरी नदी खूप विलोभनीय दृश्य होते. हाताला माऊंट केलेल्या गोप्रो कॅमेराने त्या या अथांग गोदावरीचे चित्रीकरण केले. सायंकाळी अंधार पडायच्या सुमाराला विशाखापट्टणम गाठले. विशाखापट्टनम् शहर पूर्वघाट रांगा आणि बंगालचा उपसागर यामधील पट्ट्यात वसलेले आहे. पूर्वी विशाखापट्टणम विजाग, विजागपट्टनम, विशाखा तसेच वॉल्टर या नावाने सुद्धा ओळखले जायचे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील चेन्नईनंतर सर्वात मोठे शहर म्हणून विशाखापट्टणमचा नावलौकिक आहे. विशाखापट्टनम नंतर आमचे पुढचे टार्गेट होते भुवनेश्वर, जी क्यू राईड करताना फक्त हायवेवर गाडी चालवणे आणि अगदी सहज पदरात पाडून घेण्याजोगे मोजक्या ठिकाणांना भेट देणे हे आधीच ठरले होते. संपूर्ण जी क्यू मार्गावर जवळपास 80 मोठी शहरे आहे त्या सर्वांना भेट देऊन तेथील ऐतिहासिक धार्मिक शैक्षणिक ठिकाणे पाहणे हे संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम होईल. आमच्याकडे वेळ खूप कमी होता अठरा दिवसातच आम्हालाही जी क्यू मोहीम पूर्ण करायची होती. त्यानुसार संपूर्ण नियोजन केले होते पावसामुळे आधीच ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा एक दिवस आम्ही मागे होतो. भुवनेश्वर पासून 65 किलोमीटर अंतरावर असणारे जगन्नाथ पुरीचे दर्शन घ्यायचेच आधीच ठरले होते. आज आम्ही पुरीसाठी रवाना झालो अंतर साधारणता 425 किलोमीटर होते. विशाखापट्टनम ते पुरी हायवे अतिशय अफलातून होता आम्ही रायडिंग एन्जॉय केले. आम्ही ओरिसा बॉर्डर वर पोचलो, आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर असणारे ओरिसा कसे असेल याची उत्सुकता सर्वांना होती. ओरिसा बॉर्डरवर थांबून फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. गजानन लीड करत होता तो थांबला आणि म्हणाला इथून एक शॉर्टकट आहे, तिथूनच जायचं का पुरीला, रस्ता कसा आहे माहिती नाही, पण भुवनेश्वरला जाऊन उलटा येण्यापेक्षा तिथूनच जाऊ अंतर 60 किलोमीटर आहे, वाटेत चिल्का सरोवरचा बोर्ड दिसला खूप इच्छा होती चिल्का सरोवर पाहण्याची, चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे विविध परदेशी पक्ष्यांचे ते नंदनवन आहे, प्राणी पक्षी विविध वनस्पती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. जगातील सर्वात मोठे ब्रॅकिष वॉटर लगून म्हणून चिल्का सरोवर ओळखले जाते. चिल्का सरोवर पाहण्याचा मोह सुटत नव्हता. परंतु, जगन्नाथ पुरी आम्हाला खुणावत होते. हायवेवरील पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनापाशी थांबून पुरीचा रस्ता विचारून हायवेला पुढे जाऊन पाच किलोमीटर वरून यु टर्न घेऊन आम्ही एका छोट्या रस्त्याला येऊन थांबलो. जगन्नाथ पुरीचा शॉर्टकट रस्ता होता. त्या ठिकाणी एक छोटे हॉटेल होते, गरम समोसे तळायचे काम चालू होतं, सर्वांनी तिथे ब्रेक घेतला, त्याठिकाणी गेल्यापासून माझी नजर रस्त्याच्या पलिकडे असलेल्या एका म्हाताऱ्या मनुष्यावर रोखली गेली होती. सर्वांनी खाण्याची ऑर्डर दिली, माझे लक्ष मात्र त्या अगदी जर्जर झालेल्या मनुष्यावरून हटत नव्हते, मी त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन तो काय करतो ते पहात होतो, तो इसम अगदी कचराकुंडीत बसला होता, शेजारी खूप जुने पडके घर होते, अंगावर लंगोट वजा फडके कमरेला गुंडाळले होते बाकी अंगावर काहीच घातले नव्हते. दाढी मिशा वितभर वाढलेल्या होत्या, डोक्यावरील केसांच्या जटा झाल्या होत्या, त्याला उभे राहता येत नसावे कारण तो दोन्ही हात जमिनीला टेकून जमिनीला घासत पुढे सरकत होता. भयंकर थंडी असताना तो मात्र थंडी कशी सहन करत होता देव जाणे. हळूहळू त्याने कचऱ्यातून कागद गोळा केले आणि पेटविले, चांगलाच मोठा जाळ झाला, त्या उजेडात त्याचा चेहरा खूप भेसूर दिसत होता, तो भिकारी किंवा वेडा असावा असा अंदाज मी मनात बांधला. डोसे सामोसे खाऊन आम्ही पुढील मार्गाला रवाना होणार इतक्यात पाच पैकी चार गाड्या निघाल्या मी ग्लोज घालून हेल्मेट डोक्यावर घालत होतो तेवढ्यात इतका वेळ त्या कचऱ्यात शांत बसलेला तो इसम अचानक उभा राहून माझ्या दिशेने चालत आला, त्याच्या हातात कापडी फडके होते, त्याच्या माझ्याकडे येण्याच्या गतीने मी थोडा बिचकलो, मी गाडी सुरु केली, तो म्हातारा माझा रस्ता अडवून उभा राहिला, त्याने माझ्या अंगावर त्याच्या हातातील फडके तीन-चार वेळा झटकले, आणखी काही करायच्या आत मी त्याला चुकवून गाडी दामटली आमचे रायडर थोडे पुढे जाऊन माझी वाटच पाहत होते, त्यांना झालेला किस्सा सांगितला. सर्वांनाच ती नकारात्मक ऊर्जा जाणवत होती. सर्वांसोबत पुढे निघालो, आपण कोणत्या तरी खूप अनोळखी प्रदेशात चाललोय, काहीतरी नकारात्मक ऊर्जा बरोबर, आजूबाजूला आहे असे सतत वाटत होते. त्या रस्त्यातून जाताना अगदी पाच दहा घरांची वस्ती दिसे परत एकदम काळाकुट्ट अंधार, रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे, रस्त्यावर कोणीच दिसायचे नाही, आपल्या आजूबाजूला नक्की डोंगर आहे पाणी आहे का दरी आहे याचा अंदाज लावता येत नव्हता. आम्ही शॉर्ट कट मारला खरा परंतु रस्ता अतिशय खराब होता, जागोजागी गतीरोधक बसवलेले होते इतके गतिरोधक आम्ही भारतातील कोणत्याही रस्त्यावर पाहिलेले नाही, कोठेही नावाचे साईन बोर्ड नव्हते, आम्ही तो काळाकुट्ट अंधार चिरत पुढे पुढे जात होतो. अमोल चांगला दमला होता, त्या अरुंद रस्त्यावर गाडी चालवताना त्याची गाडी थोडीशी भरकटत होती, अथर्वने अमोलला सांगितले तुला झोप येत आहे थोडा वेळ थांबुन विश्रांती घेऊ, पुढे एक छोटासा पेट्रोल पंप दिसला तिथे थोडा थांबायचे ठरले, गतिरोधक खूप असल्यामुळे आमची मान पाठ कंबर एक झाली होती, त्या रस्त्यावर आम्ही जेमतेम 25 किलोमीटर आलो होतो. मात्र, शेकडो किलोमीटर गाडी चालवण्याचे कष्ट आम्हाला करायला लागले होते. सर्वांनी तोंडावर पाणी मारून थोडा थकवा दूर करायचा प्रयत्न केला, पंपा जवळील सिमेंटच्या कट्ट्याजवळ बसलो, पेट्रोल पंपावरील उजेडामुळे थोडेसे हायसे वाटत होते पण इतक्यात ती लाईट बंद झाली आणि सगळीकडे काळोख पसरला. आम्ही अर्धा तास तिथे विश्रांती घेतली, हळू हळू पुढे जात राहू असे ठरले. अमोलचे डोळ्यावरची झापड उतरली तसा गाडीला स्टार्टर मारून तो पुढे निघाला, गजा भाऊ आणि भरत सर त्यापाठोपाठ निघाले, अथर्वने गाडी चालू केली मी गाडीला स्टार्टर मारला माझी गाडी काही चालू झाली नाही, बॅटरी डिस्चार्ज झाली होती, स्टार्टर बसतच नव्हता, नसते संकट रात्रीच्या वेळी उभे राहिले होते. गाडीला किक मारून गाडी चालू करायचा प्रयत्न केला पाय दुखून आले. पण गाडी काही चालू व्हायला तयार नाही. अथर्वने गजा भाऊंना फोन करून माझी गाडी बंद पडल्याचे सांगितले, आम्ही मागे दिसलो नाही म्हणून भरत सर परत आले. गाडी स्टँडला लावून आम्ही किक मारायचा प्रयत्न करत होतो, गाडी मात्र काही केल्या चालू व्हायला तयार नव्हती. आता मात्र मनात अजूनच नकारात्मकता निर्माण झाली, गाडी बंद पडण्याचा आणि त्या म्हाताऱ्याने आपल्या अंगावर फडके झटकण्याचा काही तरी संबंध असावा असे वाटू लागले, इतक्या रात्री करायचे काय, ना ना प्रश्न मनात येऊ लागले, जगन्नाथ पुरी येण्यासाठी अजूनही 35 किलोमीटर जायचे होते, शेवटी देवाचे नाव घेत एक जोरदार किक मारली आणि गाडी चालू झाली, गाडीची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाल्याने गाडीचे हॅलोजन पूर्ण बंद ठेवायला लागत होते. आता त्या पुर्ण अंधार रात फक्त हेडलाईटच्या लाईटवर गाडी चालवणे थोडे अवघड जात होते. माझी गाडी पुढे अथर्व आणि भरत सरांची गाडीमागे त्यांच्या गाडीच्या उजेडात माझे मार्गक्रमण चालू होते. गतिरोधक आमची पाठ सोडायला तयार नव्हते कोणत्याही गतिरोधक वर पांढरे पट्टे नाही, आता मात्र आमचे पेशन्स संपायला आले होते, आता कधी एकदा जगन्नाथ पुरीला पोहोचतोय असे झाले होते, रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते, तो संपूर्ण रस्ता संपेपर्यंत कायम तो विचित्र वातावरणाने भरलेला आहे असेच वाटत होते. रात्री रस्त्यावर काही लोक दिसले, रात्रीचे कोठून तरी स्नान करून आलेले ते दिसत होते ओल्या पंचा सकट तसेच चालत असायचे अगदी एकटे एकटेच. रस्त्यात काही ठिकाणी विचित्र झाडे दिसली अगदी वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली रंगीबेरंगी, काही ठिकाणी झेंडे बांधलेले, झाडांना वेगवेगळी कापडे गुंडाळलेले, एखाद्या झाडाखाली एखादा मिणमिणता दिवा दिसायचा, इतक्या रात्री उशिरा हे लोक कोठे जात असतील, हे दिवे कोण लावत असेल, या एकदम निर्मनुष्य रस्त्यावर या लोकांना सरपटणाऱ्या प्राण्यांचे, हिंस्र प्राण्यांचे भीती वाटत नसेल का? याची उत्तरे आम्हाला मिळाली नाहीत. एकदाच शेवटी जगन्नाथ पुरी जवळ पोहोचलो एका भल्या मोठ्या होर्डिंग ने आमचे स्वागत केले. जगन्नाथ पुरी मध्ये आपले स्वागत आहे. ह्या साठ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आम्हाला 200 च्या वर गतिरोधक यांचा सामना करावा लागला. हॉटेलच्या जवळ आलो. मात्र, शेवटचे शंभर मीटर मध्ये खूप फिरलो हॉटेल काही केल्या सापडायला तयार नाही, बुकिंग केलेल्या हॉटेलचे नाव गदाधर होते त्या गदाधर नावातील ग अक्षर गळून पडले होते त्यामुळे त्याचे नाव दाधर झाले होते, दोन वेळा त्या समोरून गेल्यावर पण आम्हाला ते हॉटेल लक्षात आले नाही. खूप दमछाक झाल्यावर डोके काम करत नाही त्याचे जिवंत उदाहरण होते. शेवटी एकदाचे गदाधर सापडले आणि एक अध्याय संपला. आम्ही हॉटेलवर पोहोचण्याआधीच जेवणाची ऑर्डर दिली होती, आम्हाला उशीर झाल्याने आम्हाला जेवण देण्यासाठी हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं. आम्ही सर्व जेवणाची ऑर्डर आमच्या रूम मध्ये मागून जेवण केले. अंथरुणावर पडताच सगळे झोपी गेले. सकाळी लवकर उठून जगन्नाथाचे दर्शन घेऊन मुक्कामाला कोणार्कला जायचे असे ठरले होते, ब्रेकफास्ट करून दर्शनाला निघणार इतक्यात हॉटेलच्या मॅनेजरने सांगितले आत्ता दर्शन बंद आहे ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी मंदिरात आलेले आहे त्यामुळे तेथे आता कोणालाही सोडणार नाही तुम्ही दुपारनंतर दर्शनाला जा असे त्याने सुचवले. आम्ही राहत असलेल्या हॉटेलमधून आम्हाला जगन्नाथ पुरी मंदिरातील एक गुरुजी काली कृष्णा यांचा नंबर मिळाला. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मी जेव्हा तुम्हाला सांगेन तेव्हा लगेच दर्शनाला या, त्यांच्या फोनची वाट पाहू लागलो. अर्ध्या तासांनी त्यांचा फोन वाजला आणि आपापल्या आधार कार्ड घेऊन लगेच दर्शनाला या असे त्यांनी कळविले आम्ही लगेच रिक्षात बसून मंदिराकडे निघालो, आज मंदिराकडे जायला वाहनांना बंदी असल्यामुळे आम्हाला साधारण एक किलोमीटर अलीकडे रिक्षाने सोडले, आता मंदिराच्या दिशेने चालत निघालो, चिंचोळ्या गल्लीतून पुढे जात असताना डावीकडे जगन्नाथ मंदिराच्या कळसाचे विहंगम दृश्य दिसले, कळसावर फडकणारा भगवा ध्वज पाहून आमचे पाय जागीच थबकले. आम्ही सर्वांनी त्या कळसाचे दर्शन घेतले, त्या फक्त एका दर्शनाने आत्तापर्यंत आलेली सगळी नकारात्मकता क्षणात निघून गेली, जगन्नाथ मंदिर हे अतिशय सकारात्मक ऊर्जा असणारे मोठे स्त्रोत आहे आम्हाला सगळ्यांना लगेच जाणवलं. काली कृष्णा गुरुजींनी सांगितलेल्या गेटवर आम्ही हजर झालो, काले कृष्णा गुरुजी म्हणजे तेवीस-चोवीस वर्षाचा तरुण होता, बॉडी बिल्डरला लाजवेल अशी शरीरयष्टी, तलम धोतर, डोक्याला चंदनाचा टिळा आणि अंगात जाणवे असा पोशाख त्यांनी केलेला होता. सर्वांचे आधार कार्ड घेऊन ते दर्शन पास घ्यायला गेले, अर्ध्यातासातच आम्ही सर्व प्रोटोकॉल्स पाळून मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिरातील प्रत्येक दालनाचे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व कालीकृष्णा गुरुजी नी आम्हाला समजावून सांगितल. काले कृष्णा गुरुजींचे संपूर्ण मंदिरात चांगलेच वजन होते, त्यांचे वडील पूर्वी मंदिराचे मुख्य पुजारी होते त्यांच्या पश्चात त्यांची जागा काली कृष्णा यांनी घेतली होती. मुख्य मंदिरात गेल्यावर गुरुजींनी आम्हाला एका कडेला थांबवले, गाभाऱ्यातील गुरुजींना आम्ही महाराष्ट्रातील पुण्यातून बुलेट गाडी चालवत जगन्नाथाच्या दर्शनाला आलो आहोत ते आवर्जून सांगितले, आतील पुजाऱ्यांनी आम्हाला विशेष वागणूक देत देवाला लावण्यात येणारा काळा टिक्का आम्हा सर्वांच्या कपाळावर लावून मंत्रपठण केले आमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रार्थना केली, सुमारे 15 ते 20 मिनिटे आम्ही गाभाऱ्यात थांबलो होतो, आमचे दर्शनाचे पूर्ण समाधान झाल्यावरच आम्ही तिथून बाहेर पडलो. मंदिरामध्ये कृष्ण त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या लाकडी अर्धवट कोरलेल्या मुर्त्या गाभाऱ्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अतिशय सुंदर अशा त्या मुर्त्या होत्या. जगन्नाथाची वार्षिक यात्रा, रथयात्रा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. प्रसादाचे पावती करून प्रसाद बुक केला. काली कृष्णांनी आम्हाला जगातील सगळ्यात मोठी रसोई असलेल्या जिथे रोज जगन्नाथा साठी 56 भोग तयार केले जातात आम्हास तो भटारखाना दाखवला. तिथे पारंपारिक पद्धतीने लाकडावर अन्न शिजवले जाते. एका भल्या मोठ्या बिल्डिंगचे 32 रुम्स मध्ये साडेचारशे आचारी आणि त्यांचे साडेतीनशे मदतनीस असे एकूण आठशे कर्मचारी मिळून हजारो लोकांचा प्रसाद तयार करतात. दिवसातून देवाला सात वेळा प्रसाद अर्पण केला जातो, प्रत्येक वेळी आठ वेगवेगळे पदार्थ देवाच्या नैवेद्यात असतात असे एकूण 56 पदार्थ देवाला रोज अर्पण केले जातात. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तोच प्रसाद सर्व भक्तांना यांना देण्यात येतो. चुलीवर पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक केला जातो, स्वयंपाक करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो, मातीचे एकावर एक सात भांडे ठेवून त्यावर पदार्थ शिजवले जातात, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वात वरील भांड्यातील पदार्थ आधी शिजतो, त्यानंतर खालून वर भांड्यातील पदार्थ शिजतात. पदार्थ शिजताना त्यावर साक्षात लक्ष्मी देवी देखरेख करते अशी मान्यता आहे, त्यामुळे पदार्थ शिजवताना ते बंद खोलीत शिजवले जातात, आचारी सोडून तेथे कोणीच नसतं. हे सगळं बघता बघता दुपारचे दोन वाजत आले होते, कोणार्कला जाण्याचा प्लान कॅन्सल केला. पुन्हा केव्हातरी सूर्य मंदिर पदरात पाडून घेऊ अशी मनाची समजूत घालून काली कृष्णा गुरुजींचे आभार मानून त्यांना दक्षिणा देऊन पुन्हा परत भेटण्याचे वचन देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. पुरी येथील प्रसिद्ध खाजा हा पदार्थ आम्ही एन्जॉय केला, आदिवासी लोकांनी बनवलेले चांदीचे तारेतील दागिने पाहिले, थोडी खरेदी करून मंदिराबाहेर गजा भाऊंचा फेसबुक लाईव्ह चा कार्यक्रम घेऊन आम्ही हॉटेल कडे प्रयाण केले. काले कृष्णा गुरुजी मंदिरातील प्रसाद आमच्यासाठी हॉटेलवर पाठवून देणार होते. आम्ही हॉटेलवर पोहोचलो जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती, तेवढ्यात गुरुजी आले मी देवाला चढवलेला प्रसाद आमच्यासाठी छोट्या मातीच्या भांड्यात मधून घेऊन आले होते. हा प्रसाद जमिनीवर बसूनच ग्रहण करायचा अशी रीत असल्याने आम्ही हॉटेलच्या टेरेसवर केळीच्या पानांवर हा प्रसाद वाढून घेतला आणि आठ प्रकारचे वेगवेगळे पदार्थ खूप आवडीने खाल्ले खूप आवडीने खाल्ले. प्रसाद अतिशय स्वादिष्ट होता, प्रसादाने सर्वांचे पोट तुडुंब भरलं, हॉटेलमध्ये दिलेली खाण्याची ऑर्डर आत्ता जेवणे शक्यच नव्हते, तेच ऑर्डर आम्हाला संध्याकाळच्या जेवणात द्या असे सांगून आम्ही हॉटेलवर विश्रांतीसाठी गेलो. संध्याकाळी बीच वरती फेरफटका मारायला गेलो, अनेकविध छोटी-छोटी दुकाने बीच वरती लोकांनी थाटलेली होती, थोडी खरेदी करून हॉटेलवर परतलो अतिशय थंड वातावरण होते. जेवून गप्पा मारत झोपी गेलो. उद्या मिशन कलकत्ता आमची वाट पाहत होते. जी क्यू राईड मधील दुसऱ्या मेट्रो शहराकडे आम्ही उद्या प्रयाण करणार होतो, अंतर जवळपास पाचशे किलोमीटर होते. ओरिसातील रस्ते खुप मोठे नव्हते, बऱ्याच ठिकाणी रस्ते सिंगल होते, दिवसभर गाडी चालवून रात्री आठच्या सुमारास कोलकत्ता गाठले. सिटी ऑफ जॉय नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलकत्ता शहरातील रस्ते खुपच भव्य आणि दिव्य होते. एक जमान्यात ब्रिटिशांची राजधानी म्हणून कलकत्ता शहर प्रसिद्ध होते, कोलकत्यात आजही ब्रिटीश काळातले इमारती, ब्रिज, राजवाडे आपले वैभव टिकवून आहेत. आम्ही हॉटेल शोधत-शोधत हावडा ब्रिज जवळ पोहोचलो, खूपच गर्दीचा परिसर असलेल्या ठिकाणी हॉटेल्स भरपूर होती. परंतु, पार्किंगची व्यवस्था खूप कमी ठिकाणी होती. शेवटी एक हॉटेल पसंत पडले, आम्ही इतक्या लांबून आल्याचे कळल्यावर त्यांनी आमचे चांगले स्वागत केले. जेवण करून आम्ही झोपी गेलो. गाड्यांचे पार्किंग म्हणजे फुटपाथ होते, आम्हा सर्वांच्या गाड्या आम्ही फुटपाथवरच ठेवल्या होत्या, हॉटेलचे वाचमन त्यावर रात्री लक्ष ठेवणार होते. सकाळी नाश्ता करून प्रसिद्ध अशा विक्टोरिया पॅलेसला आम्ही भेट दिली. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे उत्तम स्मारक आणि व त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे सुंदर असे वस्तुसंग्रहालय, थोडक्यात त्यांचा जीवनपट या विक्टोरिया पॅलेस मध्ये उभा केला गेला आहे. तिथून आम्ही कालीघाट या ठिकाणी कालीमातेचे गंगेकाठी असलेले पुरातन मंदिर पाहण्यासाठी गेलो, दुपारच्यावेळी मंदिर बंद असल्याने आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. तिथून आम्ही दक्षिणेश्वर काली मंदिराकडे रवाना झालो रस्त्यावर प्रचंड ट्राफिक होते. सन अठराशे 55 मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. अतिशय रमणीय असे हे कालीमातेचे मंदिर आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना काली मातेने या ठिकाणी दर्शन दिल्याचे ऐकिवात होते. संध्याकाळी परतताना जगप्रसिद्ध असा हावडा ब्रिज पाहिला. पुढच्या दिवशी आम्ही कोलकत्ता ते बिहार मधील औरंगाबाद प्रवास करणार होतो. सुमारे पाचशे वीस किलोमीटरचे अंतर उद्या आम्हाला कापायचे होते. कोलकत्ता सोडल्यावर बिहार मध्ये जाताना भरपूर मोठी औद्योगिक शहरे लागली. संध्याकाळच्या वेळी खूप ट्राफिक मध्ये अडकलो होतो, कसेबसे औरंगाबादला पोहोचलो रात्रीचे 11 वाजून गेले होते, हायवेपासून थोडे आत मध्ये हॉटेल मिळाले. इतक्या लांबचा बुलेट वरून आम्ही केलेला प्रवास जेव्हा हॉटेल मालकाने ऐकला तेव्हा त्याने प्रेमाने आमच्या जेवणाची व्यवस्था केली. पुढच्या दिवशी आम्हाला वाराणसी गाठायचे होते. उद्या कापायचे अंतर जेमतेम 185 किलोमीटर होते उशिरा निघालो तरीही सहा वाजायच्या आसपास वाराणसीला पोहोचलो. हॉटेलवर सामान टाकून फ्रेश होऊन लगेच काशी विश्वनाथाचे दर्शनाला निघालो माननीय पंतप्रधान मोदींनी नव्याने विकसित केलेल्या कॉरिडोरचे उद्घाटन जवळ येउन ठेपले होते खुद्द पंतप्रधान येणार असल्याने मंदिरातील कामाची जय्यत तयारी चालू होती. एकेकाळी स्मगलिंग करून अन्नपूर्णा देवीची मूर्ती परदेशात पाठवण्यात आली होती, सरकारने ती मूर्ती नुकतीच दुसऱ्या देशातून पुन्हा मिळवली तिची प्रतिष्ठापना काशी विश्वनाथ त्याच्या मंदिरातच केली गेली आहे, तिथे आम्हाला आज दर्शन घडणार होते. गंगा आरतीचा महान सोहळा आम्ही पाहिला हा संपूर्ण सोहळा पाहून मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. तीन तास रांगेत उभे राहून आम्ही काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. आज आम्ही सर्वांनी डोक्याला कपाळभर चंदन गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि अंगावर महाकालचे चित्र असलेले सद्रे परिधान केले होते, हे सगळे वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. गंगा आरतीचा महान सोहळा आम्ही पाहिला हा संपूर्ण सोहळा पाहून मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला सर्व बुलेट गाड्यांचे सर्विसिंग करून घ्यायचे होते त्यानुसार हॉटेलपासून जवळच असणाऱ्या रॉयल इन्फिल्डच्या शोरूमला आम्ही भेट दिली. सर्वांच्या गाड्या आम्ही उभे राहून सर्व्हिसिंग करून घेतल्या. उद्या आम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असल्याने त्यांनी प्रायोरिटीने गाड्या दुरुस्त करून दिल्या. भरत सरांच्या गाडीचा टायर दोन-तीन ठिकाणी चिरलेला दिसल्याने त्यांच्या गाडीचा टायर बदलला, मी आणि भरत सरांनी टायर बाहेरून आम्ही शोधून आणला. हिमालयन गाडीचा टायर साइज थोडासा वेगळा असल्याने टायर मिळवताना थोडा त्रास झाला. चार पाच दुकाने शोधल्यावर आम्हाला एकाच ठिकाणी हा टायर मिळाला तोही एकच शिल्लक होता. गाड्या सर्विसिंग करून परत होटेल वर आलो. आज प्रसिद्ध अशा काशीचाट भांडार या दुकानाला आम्ही भेट देणार होतो, संपूर्ण वाराणसीमध्ये सर्वात चविष्ट चाट याच दुकानात इथे मिळते. सर्वांनी येथील चाट आणि मावा कुल्फी एन्जॉय केली, वाराणसी मधील खायच्या पानाचे दुकान जे पाहिले, आम्ही येथील बनारसी पान एन्जॉय केले . गंगेचे पाणी, देवांचे कॉइंस, छोट्या छोट्या भेटवस्तू खरेदी करून आम्ही हॉटेल गाठले. उद्याचा दौरा इटावापर्यंत होता, वाराणसी ते इटावा अंतर 480 किलोमीटर होते, सकाळी लवकर प्रवास चालू केला. दिवसभर गाडी चालवून संध्याकाळी साडेआठच्या सुमारास कानपूर गाठले, संपूर्ण कानपूर शहर बायपास होईल इतका मोठा एक फ्लाय ओव्हर आम्ही पास केला. पुढे गेल्यावर पेट्रोल भरायला थांबलो. पूर्वीच्या काळी कानपूरचा इटावा हा रस्ता लुटमारीसाठी खूप प्रसिद्ध होता. आमचे एक फॅमिली फ्रेंड अनिता कानपूरची आहे, पेट्रोल भरून झाल्यावर तिला सहजच फोन केला तुमच्या गावाला आलोय कानपूरला, तिने कानपूरला त्यांच्या घरी जायला सांगितले, सगळे जण आमच्या घरी जा, रात्रीचा प्रवास करू नका, इटावा प्रवास करणे रात्रीचा किती असुरक्षित आहे आहे हे तिने समजावून सांगितले. परंतु, आम्ही इटावा पर्यंत न जाता मधेच रस्त्यात थांबू असे तिला सांगितले, त्याप्रमाणे रात्री पुढे प्रवास न करता आम्ही ओरिया या शहरात मुक्काम करायचे ठरवले. हायवे लगत एक छान हॉटेल मिळाले, हॉटेलच्या जीएमने आमचं जंगी स्वागत केलं, त्यांच्या हॉटेलच्या समोर आल्या आल्या त्यांनी आमचे भरपूर फोटो काढले, आम्ही महाराष्ट्रातून आलोय ते पण बुलेट वर हे कळल्यावर त्यांनी लोकल न्यूज चॅनलच्या रिपोर्टरला बोलावले. आमची मुलाखत घेण्यास सांगितले. आमच्या सर्वांच्या गाड्या सुरक्षित पार्किंग मध्ये ठेवून घेतल्या, गाडीवरचे सामान नाही काढले तरी चालेल, तुमच्या सामानाला कोणी हात लावणार नाही, रात्री पार्किंगला कुलूप लावले जाते त्यामुळे बिनधास्त राहा असे त्याने सांगितले. हॉटेल बुकिंगची फॉर्मलिटी तुम्ही सकाळी करा आत्ता तुम्ही दमून आले आहात मस्त जेवण करा आणि झोपा असा प्रेमळ सल्ला द्यायला तो विसरला नाही. उत्तम जेवण दिले. सकाळी त्यांचा निरोप घेऊन आम्ही इटावाच्या दिशेने रवाना झालो. आज आम्ही भारतातील 2 अप्रतिम अशा महामार्गांवर गाडी चालवणार आहोत, एक म्हणजे लखनऊ आणि दुसरं आग्रा महामार्ग. इटावाच्या पुढे आम्ही लखनऊ वरून आलेल्या आग्र्याला जाणाऱ्या मार्गाने गाडी भन्नाट चालवली. टू व्हीलरला या हायवेवरती टोल आहे, आग्र्याला कधी पोहोचलो कळलेच नाही. जी क्यू राईड मधल्या तिसरा मेट्रोच्या दिशेने म्हणजेच भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीला आम्ही निघालो. आग्र्याला पेट्रोल भरून आम्ही जगप्रसिद्ध अशा ताज एक्सप्रेस हायवे किंवा याला यमुना एक्सप्रेस वे म्हणतात अशा रस्त्यावरून भन्नाट वेगाने गाडी चालवत दिल्ली नजीक पोहोचलो. आग्रा दिल्ली हाय एकूण 166 किलोमीटरचा आठ लेनचा भारतातील सर्वात उत्तम महामार्ग आहे. इमर्जन्सी काळा मध्ये किंवा युद्ध जन्य परिस्थिती या मार्गाचा उपयोग लढाऊ विमानांना धावपट्टी म्हणून करता येतो. भारताचे सुखोई-30 या विमानाने यमुना एक्सप्रेस वे वर लँडिंग आणि टेक ऑफ केले आहे. याही रस्त्यावर दुचाकीसाठी टोल आकारण्यात येतो. आम्ही संध्याकाळी सातच्या सुमारास पहाडगंज या ठिकाणी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी इंडिया गेट वर जाऊन फोटो काढणे आणि थोडे दिल्ली फिरणे हे ठरले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी दिल्लीमधील प्रसिद्ध सिताराम या छोले भटूरेच्या दुकानावर धडक मारली. मनसोक्त छोले-भटूरे लस्सी एन्जॉय केली. तेथून आम्ही इंडिया गेट वर गेलो आमचे सर्वांचे फोटो काढले, काही काम चालू असल्याने आम्हाला इंडिया गेटच्या जवळ जाता आले नाही. तेथून आम्ही महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराष्ट्र सदनला भेट दिली, तेथे असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही लाल किल्ल्यावर आलो. आता थोडा वेळ चांदणी चौकात फिरायचे, चांदणी असे ठिकाण जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. चालून पाय दुखतील पण दुकाने संपत नाही, खवय्यांची येथे चंगळ आहे, पाणीपुरी देसी घी की जलेबी दौलत की चार्ट असे अनेक पदार्थ तिथे लोक आवडीने खातात. छोटे छोटे गिफ्ट खरेदी केले, आता पाय बोलू लागले होते, सायकल रिक्षात बसलो आणि परत चांदणी चौकात आलो, हॉटेलवर पोहोचलो. आता वेध लागले होते ते आमचा चौथा आणि शेवटचा टप्पा अर्थात मुंबईचे. सकाळी ब्रँच करून दिल्ली सोडली, हरियाणा राज्यात प्रवास करीत आज राजस्थान गाठायचे होते. आमचे आजचे टारगेट जयपुर होते, आम्ही लवकरच जयपूरला पोहोचलो, खूप दमलो नसल्याने अजून पुढे जायचे ठरले, अजमेर शरीफजवळ आम्ही मुक्काम केला. आजचे रायडींग साधारणत चारशे पंधरा किलोमीटर झाले. हायवे लगतच चांगले हॉटेल मिळाले. सकाळी उठून उदयपूर मार्गे आम्ही गुजरात मधील राजधानीचे ठिकाण म्हणजेच गांधीनगरला पोहोचलो. उदयपूर ते गुजरात सीमा रस्ता अप्रतिम होता. आम्ही रायडिंग खूप एन्जॉय केले. आज जवळपास 530 किलोमीटरचे अंतर पार करायचे होते, गुजरातची सीमा सुरू झाल्यावर संपूर्ण हायवेचे दुरुस्तीची कामे फ्लाय ओव्हरची कामे चालू होती, आम्हाला गाडी चालवताना या रस्त्याने आमचे खूप परीक्षा घेतली जवळपास दोनशे किलोमीटरचा रस्ता खराब होता, अनेक ठिकाणी डायव्हरजन्स नीट नव्हते, कधी एकदा मुक्कामी थांबतोय असे झाले होते. संपूर्ण साडेसहा हजार किलोमीटर प्रवासात सर्वात खराब महामार्गाच्या पट्टा आम्हाला गुजरातमध्ये लागला. रात्री अकरा वाजता हॉटेल मिळाले आले आणि आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशीचा टप्पा गांधीनगर ते मुंबई असा होता, अंतर साडेपाचशे किलोमीटर होते, ते उद्या मुंबईला पोहोचणार याचा प्रचंड आनंद होता, मुंबईला गेल्यावर गेटवे ऑफ इंडियाला जाऊ असे ठरले होते. अहमदाबाद-मुंबई या महामार्गावरील गर्दी नेहमीचाच विषय आहे, अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्ग असून आम्हाला तो वापरता आला नाही. कारण तो दुचाकीसाठी नाही. खूप ट्राफिक मधून गाडी चालवत आम्ही मुंबई जवळ मनोर याठिकाणी मुक्काम केला. आज जवळपास 460 किलोमीटर गाडी चालवली. दुसऱ्या दिवशी भगत ताराचंद हॉटेलमध्ये मनसोक्त जेवण करुन मुंबईकडे प्रयाण केले, गर्दीतून गाडी चालवत गेटवे ऑफ इंडिया गाठले. आमच्या चार मेट्रोच्या लिस्टमध्ये चौथ्या मेट्रोला आम्ही भेट दिली होती. मनसोक्त फोटो काढले पुण्याच्या दिशेने निघालो. नवी मुंबईमधील कामोठे पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सीनियर पोलीस इन्स्पेक्टर स्मिता जाधव यांनी आम्हाला आवर्जून पोलीस स्टेशनला बोलवले होते, आम्हा सर्वांचे त्या कौतुक करणार होत्या. त्यांचे पती आणि आमचे सर्वात सीनियर रायडर भरत जाधव या सर्वांचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गरमागरम कॉफी पिऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. आम्ही खंडाळा क्रॉस करून लोणावळा गाठले, बरेच दिवसांनी जुन्या घाटातून प्रवास करीत होतो. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आमचे परममित्र प्रशांत अनंत कारके, श्रीकांत धनगर यांनी आमचे जंगी स्वागत करायचे ठरविले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, तसेच आमचे मित्र अमोल भोईटे आमचे स्वागत करायला आमचं कौतुक करण्यासाठीदुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आवर्जून उपस्थित राहणार होते. त्यामुळे आम्ही लोणावळा ऐवजी कारल्या मध्ये गजा भाऊंचे मित्र त्यांच्या हॉटेलवर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी थेट भक्ती-शक्ती ला जायचे ठरले. कारल्यात पोचायला रात्रीचे बारा वाजले असले तरी आमच्यासाठी गरमागरम भाकरी आणि गावरान चिकनचा मेनू त्यांनी तयार करून ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो जवळपास संपूर्ण भारताला आम्ही चक्कर मारून आलो आलो होतो. आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय खडतर मोहीम आम्ही पार पाडली होती. आता प्रतीक्षा होती उद्या पुण्यात पाऊल टाकायची. आता अंतर फक्त तीस किलोमीटर राहिले होते, आम्ही जेवूनच कारल्या मधून निघालो. आमच्यासाठी त्यांनी आज आवर्जून बिर्याणीचा बेत केला होता. शेवटचा मुक्काम आमचे मित्र गजाभाऊ यांच्यामुळे एकदम मेमोरेबल झाला. त्यांच्या मित्रांनी आमच्याकडून एकही रुपया न घेता हे आमच्यासाठी मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली. तुम्ही इतकी मोठी कामगिरी बजावून आला आहात, आम्हाला तुमचं थोडं तरी कौतुक करू द्या असे त्याने प्रेमाने सांगितले. रस्त्यामध्ये कान्हे फाट्यावर काही मित्रांनी आमचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.  बरोबर साडे चार वाजता आम्ही निगडीतील प्रसिद्ध भक्ती-शक्ती चौकात पोहोचलो. टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये आमचे स्वागत करण्यात आले. राजू मिसाळ यांच्या हस्ते सर्व रायडर्सचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ पेढे देऊन सत्कार करण्यात आला. घरच्या मंडळींनी मित्रांनी आणलेले केक कापून सर्वजण आमच्या आनंदात सहभागी झाले होते. गजाननचे निगडीतील मामा त्यांचे कुटुंबीय, अथर्वचे आई बाबा आजी आजोबा भाऊ, माझ्या दोन्ही मुली, मला कायम बाईक रायडिंगसाठी प्रोत्साहन देणारी माझी अर्धांगिनी सर्वजण तसेच अमोलचे आई वडील पत्नी आणि छोटा मुलगा आवर्जून उपस्थित होते. आरबीपीचे मिलिंद, योगेश, श्रीकांत, करण तसेच आमचे सायकल रायडिंग ग्रुपमधील भुजबळ सर, अमोल भरेकर उपस्थित होते. माझं एम एच बारा ग्रुपमधील महेश खालकर, निलेश मोहिते, राहुल जोरी, अभिजीत ताम्हणे, सुधीर झेंडे, राहुल अरणकल्ले, जाधव, राहुल शिरसागर, तसेच माझ्या सोसायटीतील मित्रवर्य प्रवीण आणि त्याचे कुटुंबीय, नरेश आणि त्याचे कुटुंबीय, ललित आणि त्याचे कुटुंबीय सर्वजण आवर्जून उपस्थित होते. मित्रवर्य ललित त्याची मुलगी चिकू हिने आमच्या रायडिंग वरती ती एक उत्तम विलो ग तयार केला. प्रशांतने या कार्यक्रमासाठी मीडियाला बोलावले होते. आम्ही जी क्यू राईड मधून काय शिकलो. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्या भाषा पेहराव खाण्याच्या सवयी सर्व काही भिन्न आहे आहे. परंतु, भारतीय म्हणून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. संपूर्ण प्रवासात आम्हाला कोणाकडूनही कणभर त्रास झाला नाही, आम्ही जिथे जिथे गेलो तेथे आवर्जून सर्व लोकांनी आमची मनापासून चौकशी केली, आम्हाला सदिच्छा दिल्या, आमच्या सुखकर प्रवासासाठी सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी प्रार्थना केली, भारतामध्ये सर्व कोणत्याही जाती जमातीच्या लोकांना गुण्यागोविंदाने राहायचे आहे, परंतु, मूठभर लोक धर्माच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करतात. संपूर्ण भारतामध्ये भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. मनुष्य धर्म हाच सर्वात मोठा धर्म असून माझ्या भारताचे भविष्य नक्कीच उज्वल आहे हेच संपूर्ण जी क्यू राईड मध्ये भारताची प्रगती पाहून जाणवले. माझ्या भारताला महान का संबोधले जाते याचे उत्तर मिळविण्यासाठी तुम्हाला भारत भ्रमण करणे आवश्यक आहे. बाईकवर फिरल्याने तुम्हाला खऱ्या भारताची ओळख होते. खरा भारत बघायचा असेल तर बुलेटवर फिरणे यासारखा दुसरा आनंद कोणताही नाही. - रायडर संतोष होनकरपे, रायडर गजानन सरकाळे, रायडर भरत जाधव, रायडर अथर्व कोकीळ, रायडर अमोल मोरे (मुक्कामपोस्ट पुणे) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात