जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / आंध्र प्रदेशातील पहिली Solo Bike Rider आहे मराठमोळी महिला! Biker Mom ला पाहून म्हणाल वय फक्त आकडा

आंध्र प्रदेशातील पहिली Solo Bike Rider आहे मराठमोळी महिला! Biker Mom ला पाहून म्हणाल वय फक्त आकडा

आंध्र प्रदेशातील पहिली Solo Bike Rider आहे मराठमोळी महिला! Biker Mom ला पाहून म्हणाल वय फक्त आकडा

बाईक रायडींगच्या सेकंड इनिंगने मी 47 व्या वर्षी, आंध्र प्रदेशातील पहिली महिला सोलो बाईक रायडर झाले. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता, मला माझा आनंद पुन्हा गवसला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

आमच्या काळात सोशल मीडिया नव्हतं यासाठी मी आभार मानते. त्यामुळे किमान दोन अडीच वर्ष माझं सिक्रेट राहिलं. पण, शेवटी जी भिती होती, तेच झालं. माझा पराक्रम घरच्यांना कुठूनतरी समजला. अन् त्याच वर्षी माझ्या लग्नाचा बार उडवून दिला. माझ्या स्वप्नांचा, इतक्या वर्षांच्या मेहनितीचा क्षणात चुराडा झाला. यात माझ्या कुटुबांची चूक नव्हती. कारण, त्या काळात मुलींना अशा गोष्टी करणे स्वप्नात सुद्धा मान्य नव्हतं. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. हाय, फ्रेंड्स.. माझं नाव वैशाली कुलकर्णी-मोरे, मी मूळची पुणेकर. पण, आता आध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथेच स्थायिक झालेय. मला बाईकचं पहिल्यापासूनच भारी आकर्षण, त्यामुळं वयाच्या 15 व्या वर्षीच मी बाइक चालवायला शिकले. पुण्यात माझ्या कॉलेजजवळ बाईक चालवणाऱ्या मुलांचा ग्रुप होता. त्यांना पाहून खऱ्या अर्थानं मला बाईक रायडींगचं वेड लागलं. वयाच्या 18 व्या वर्षी मला पक्क लायसन्स मिळालं. माझ्या ग्रुपमधील मुली काय बोलतात यापेक्षा ती मुलं बाईक वर करत असलेले स्टंट पाहण्यात मला रस होता. त्यातील एका ग्रुपकडे मलाही स्टंट शिकवा यासाठी विचारणा केली. तर त्या मुलांनी माझी खिल्ली उडवली. तू मुलगी आहेस, आम्ही जे करतो ते तू करू शकत नाहीस. त्यांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी मी उद्युक्त झाले. त्या ग्रुप मधील 2 मुलांनी मला सपोर्ट करत शिकवायला तयार झाले. त्या दिवसापासून कॉलेजनंतर मोटारसायकलवर स्टंट शिकणे हा रोजचा दिनक्रम झाला. जेव्हा माझ्यात मुलांप्रमाणे स्टंट करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, तेव्हा मी डर्ट बाइकिंगमध्येही उतरले. अगदी पुरुषांप्रमाणे मीही हवेत गाड्या उडवू लागले. माझ्या शालेय आणि कॉलेज दिवसांमध्ये अनेक खेळ खेळले होते. याचा फायदा मला निर्भयपणे बाईक रायडींग करण्यात झाला. सर्वात मोठा अडथळा हा होता की मी अत्यंत रूढीवादी ब्राह्मण कुटुंबातून येते. माझ्या घरी या सर्व गोष्टींना परवानगी नव्हती. माझ्या घरच्यांना फार दिवस माझ्या बाईक रायडींग कौशल्याबद्दल माहिती नव्हतं. पण, कधी ना कधी हे कळणार होतं, याची भिती होतीच. अन् जे व्हायचं नाही तेच झालं. माझ्या वडिलांना कुठूनतरी कळलं. त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण होताच माझं लग्न करायचं ठरवलं. लग्न झालं, मातृत्व आलं, मी माझ्या पतीची बदली होईल त्या सर्व शहरांमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करत राहिले. 24 वर्षांच्या माझ्या व्यस्त जीवनात बाईक रायडींग जणू विसरुनच गेले. सेकंड इनिंग.. दरम्यानच्या काळात मला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी नाईविलाजाने मला इंटरनॅशनल स्कूल मधील माझ्या प्रशासकीय पदावरून स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. रिकव्हरीदरम्यान, माझा मोठा मुलगा, साहिल, जो त्याचं करिअर दुसर्‍या शहरात सुरू करण्यास तयार होता, त्यानं मला माझ्या आवडीकडे परत जाण्यास आणि पुन्हा काम न करण्यास सांगितलं. त्याला वाटलं की मी माझ्या मुलाच्या आणि पतीच्या स्वप्नांची काळजी घेण्यासाठी आपल्या इच्छांचा त्याग केलाय. आता माझी पुन्हा जगण्याची वेळ आली होती. तेव्हा वयाच्या 47 व्या वर्षी मी माझी पहिली बाईक खरेदी केली. अन् बाईक रायडींग सुरू झालं. मी काही महिने जवळपासच्या ठिकाणी गाडी चालवण्याचा सराव केला. त्यानंतर माझी पहिली सोलो राईड विशाखापट्टणम ते शिर्डी करण्यासाठी मी सज्ज होते. बाईक रायडींगच्या सेकंड इनिंगने मी 47 व्या वर्षी, आंध्र प्रदेशातील पहिली महिला सोलो बाईक रायडर झाले. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता, मला माझा आनंद पुन्हा गवसला होता. मला नवी ओळख मिळाली.. पुन्हा बाईक रायडींग म्हणजे निखळ स्वातंत्र्याची जावीण होती. यामुळे माझ्यातील आत्मविश्वास आणखी वाढला. मी पूर्वीपेक्षा निडर आणि स्ट्राँग झाले. लांब पल्ल्याच्या राईड करता याव्या यासाठी मी माझ्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. यामुळं माझीच मला नव्यानं ओळख झाली. याहीपेक्षा मला नवी ओळख मिळाली. मी जे काही मिळवलं आहे, तरुण महिलांसाठी बाइकिंग क्षेत्रात जे काही करायचं आहे, ते पाहण्यासाठी माझे बाबा आज जिवंत हवे होते, असं मला नेहमी वाटतं. आपला देश विविधतेने नटला असल्याचं आपणा सर्वांनाच माहिती आहे. मोटारबाइकिंगमुळे मला तो जवळून पाहाता येतो. अनोळखी व्यक्तींना भेटता येतं, पिंकाथॉन अॅम्बेसेडर म्हणून ब्रेस्ट कन्सर विषयी जनजागृती करता येते. वय हा फक्त एक आकडा आहे प्रत्येक राईडमध्ये मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तो एक समृद्ध करणारा अनुभव असतो. मला प्रसिद्ध पर्यटन स्थळांव्यतिरिक्त आपल्या देशातील काही अनपेक्षित, सुंदर ठिकाणं पाहायला मदत होते. माझ्या या पॅशनमुळे मला देशभरातील काही अद्भुत व्यक्तिमत्त्वांची ओळख झाली, ज्यांनी मला प्रेरणा दिली. बाईक रायडींगने मला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणं, सहनशीलता, खाद्यपदार्थ, संस्कृती यांच्यात मिसळायला शिकवलं. प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे, नम्र राहणे, सर्वात महत्वाचं पाय नेहमी जमिनीवर ठेवायला, प्रवासाचा आनंद लुटायला, भेटलेल्या अनोळखी लोकांच्या गोष्टी ऐकायला शिकवलं. माझ्या प्रवासाच्या अनुभवातून मी करुणा, सहानुभूती, दयाळूपणा, इतर प्रवाशांना मदत करणे, तरुण पिढी आणि माझ्या पिढीला माझे अनुभव शेअर करायला शिकले. वय हा फक्त एक आकडा आहे. जर तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी असाल तर, व्यक्ती कोणत्याही वयात त्यांचा छंद किंवा आवड जोपासू शकते. आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकते. आई तिच्या मुलांप्रती तिचं कर्तव्य पूर्ण करू शकते. त्या बदल्यात मुलं तुम्हाला तुमचा आनंद शोधण्यात मदत करतील. तीनं मला माणसात आणलं.. मोटारबाइकिंगने मला नेतृत्व, सांघिक भावना, गोष्टींचं उत्तम नियोजन, जोखीम कशी घ्यायची, आव्हानांचा सामना कसा करायचा आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनोळखी ठिकाणी कसं जायचं हे शिकवलं. बाईकने मला एक चांगली माणूस, कर्तव्यदक्ष आई, जीवनातील गोष्टींची अभ्यासक, एक चांगली शिक्षक आणि इतर लोकांना जज न करणारी बनवलं. Living the real life beyond four walls, the pages outside my books and outside the box. लोक म्हणायचे हिला वेड लागलंय मी वयाच्या 47 व्या वर्षी 24 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर पुनरागमन केलं. जेव्हा माझ्या वयाच्या महिला दुचाकी वाहनांवरून फोर व्हिलरकडे जाण्यास प्राधान्य देतात. बाईक चालवण्याची माझी आवड जोपासण्यासाठी मी 2015 मध्ये आपल्या सो कॉल्ड समाजाच्या विरोधात गेले. माझ्या स्वतःच्या नातेवाईकांना, मित्रांना वाटले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली असून मला वेड लागलंय. बऱ्याच जणांनी तर मला अ‍ॅबनॉर्मल घोषित केलं. माझ्या पॅशनबद्दल बोलायला लोकांना संकोच वाटायचा. पण, मी काय करत होते, हे मला पक्क ठावूक होतं. लोकं काय बोलतात याकडे दुर्लक्ष करुन बाईक रायडींग सुरू ठेवण्यावर मी ठाम होते. कारण, मला माहित होतं, की मी काही चुकीचं करत नाहीय. मी व्यवसायाने एक शिक्षक असून मी माझ्या वर्गात जेंडर स्टिरियोटाइप तोडण्याबद्दल सांगायचे, तेच आचरणात आणण्याचं ठरवलं होतं. समाजाची मानसिकता बदलायची म्हटलं तर कुणाला तरी हे शिवधनुष्य उचलणं भाग होतं. जर पुरुष आचारी म्हणून स्वयंपाक करू शकतात, तर स्त्रिया देखील आवड म्हणून बाईक चालवू शकतात. आयुष्यातील सर्वात कठीण काळ.. सेकंड इनिंगमध्येही मी जोरदार पुनरागमन केलं खरं. पण, माझ्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय याची मला काहीच कल्पना नव्हती. मार्च 2017 मध्ये माझा भीषण अपघात झाला. सात ठिकाणी फ्रॅक्चर आणि डाव्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. एकूण 8 महिने बेडरेस्टवर होते. मला फिजिओथेरपी करावी लागली. या आठ महिन्यात कितीतरी वेळा माझ्या मनाने स्वप्नांचा पाठलाग केला. आता कुठे सुरुवात केली होती. मला बाईक चालवता येईल का? असे असंख्या प्रश्न रोज पडायचे. पण, मीही लगेच हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. डाव्या घोट्यात असलेल्या प्लेट्स, स्क्रूसह गिअर टाकणे आणि गाडीचं वजन झेपण्यासाठी तब्बल 22 महिने वाट पहावी लागली. अपघातानंतर माझा घोटा आजही 100% पूर्ववत होऊ शकला नाही. पण, तरी तो मला बाईक चालवण्यापासून रोखू शकला नाही. अशा परिस्थिती मी माझ्या मर्यादित हालचालींसह गिअर्स बदलण्याचा माझा स्वतःचा मार्ग शोधला. मी आजही माझ्या घोट्याला बळकट करण्यासाठी रोज व्यायाम करते. माझ्या घोट्यातील सर्व प्लेट्स आणि स्क्रू काढून टाकण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये माझ्या घोट्याची दुसरी शस्त्रक्रिया झाली. बरे होण्यासाठी मला एक महिन्याच्या बेड रेस्टवर ठेवण्यात आलं. मी त्या वेळेचा उपयोग जानेवारी 2020 मध्ये माझ्या मोठ्या राइडसाठीच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी केला. अपघात बाईक चालवताना नाही, तर.. एक सांगायचं राहिलंच.. हा अपघात बाईक चालवताना झालेला नाही. मी माझी एक राइड पूर्ण करून रेल्वे स्टेशनवर बाईक घेण्यासाठी गेले होते. तेव्हा प्लॅटफॉर्मवरून घसरुन रुळावर आदळल्यानंतर माझा डावा घोटा दुखापतग्रस्त झाला. माझ्या दुखापतीनंतर, मी दोन लांब राईड्स केल्यात. आणखी काही लांबच्या राइड्समध्ये करणार होते, पण त्याच काळात कोरोना साथ सुरू झाल्याने रद्द कराव्या लागल्या. पण या वर्षी, मी माझा 54 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका दिवसात 54 किमी चालले. माझ्या रायडिंग क्लबच्या सदस्यांसोबत आमच्या लडाख राईडची तयारी केली. आंध्र प्रदेशातील पहिला महिला रायडिंग क्लब. It’s all in the mind and how determined you are. Nothing is impossible. Challenges are part of life and we need to be strong willed to conquer our fears. प्रत्येक किलोमीटर memorable डिसेंबर 2015 पासून मी केलेल्या सर्व 47,000 किलोमीटच्या रायडिंगपैकी एक अविस्मरणीय अनुभव सांगणं माझ्यासाठी फार कठीण आहे. कारण, प्रत्येक राइड memorable आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक किलोमीटर माझ्यासाठी खास आहे. पण, जर मला माझी सर्वात अविस्मरणीय राईडची निवड करायची झाली तर… कोरोमंडल कोस्ट (विशाखापट्टणम) ते कोकण कोस्ट (गोवा) व्हाया कन्याकुमारी असेल. त्या प्रवासात माझी सहकारी विशेष होती पहिलं तर दुखापतीनंतर 3600 kms ची ती माझी पहिली लांबलचक राइड होती. दुसरं म्हणजे, मी नेहमी कॅन्सरच्या जागृतीसाठी बाईक चालवत असते, या वेळी कॅन्सर सर्व्हायव्हर असलेली रायडर मैत्रीण माझ्यासोबत होती. जिच्यावर स्टेज 2 ब्रेस्ट कन्सरचे उपाचार सुरू होते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावातील रस्त्यांवरून जाताना आम्हाला वाटेत काही अतिशय सुंदर, निर्मळ, प्राचीन आणि अज्ञात ठिकाणं दिसली. या ठिकाणचं निसर्गसौंदर्य एखाद्या परिपूर्ण पेंटिंगसारखे मंत्रमुग्ध करणारं होतं. या राइड दरम्यान माझ्या आदर्श व्यक्तीमत्वापैकी एक असलेले दिवंगत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मंडपम येथील स्मारकाला भेट देता आली, हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक अनुभव बनला. मी गोवा येथे WIMA (महिला आंतरराष्ट्रीय मोटरसायकल संघटना) भारताची मुख्य सदस्य म्हणून माझ्या पहिल्या मोटरसायकल राष्ट्रीय रॅलीला उपस्थित राहिले. यावेळी देशाच्या विविध भागातून आलेल्या इतर महिला रायडर्सना भेटले. तो एक उत्साहवर्धक अनुभव होता. त्या अनुभवाने जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला माझ्या सर्व राईड्स अद्भुत आणि सुंदर अनुभवांनी भरलेल्या आहेत. काही आव्हानात्मक असल्या तरी मला कधीही वाईट अनुभव आला नाही, उलट मला एक चांगला रायडर होण्यासाठी, माझ्या प्रवासाची योजना अधिक चांगल्या प्रकारे करायला शिकवलं. या विशिष्ट अनुभवाने माझ्या व्यक्तिमत्त्वावर मोठी छाप सोडली. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. हा अनुभव माझ्या पहिल्या सोलो राइडचा आहे. कारण, तुमच्या आयुष्यातील कोणतीही पहिली गोष्ट शेवटपर्यंत आठवणीत असते. चुकीचा अंदाज बांधला अन्.. विशाखापट्टणम ते शिर्डी या 1850 किलोमीटरच्या माझ्या पहिल्या सोलो राईडवर मी निघाले होते. जुलै महिना सुरू असल्याने पावसाळा ऐन मोसमात होता. एका दिवसात अंतर कापण्याच्या माझ्या क्षमतेचा मी जास्तच अंदाज लावला होता. त्यावेळी मी 19 नाही तर 47 वर्षांची आहे, याचा मला विसर पडलेला. तेव्हा मी एका दिवसात 600/700 किमी चालवत असे. माझ्या राईडच्या चौथ्या दिवशी मला पुण्याला पोहोचायचं होतं, पण मुसळधार पाऊस, खराब हवामान आणि बराच वेळ दोन्ही बाजूला निवारा नसल्यामुळे मी लोणीच्या बाहेर कुठेतरी अडकले. रोबोट सारखा दिसणारा विचित्र व्यक्ती आडोसा म्हणून मी एका झाडाखाली आसरा घेतला. तिथून हाकेच्या अंतराव एक झोपडी होती. ज्यात चुलीवर एक महिला भाकरी भाजत होती. दोन मुली बाहेर डोकावून हसत-हसत लपाछपी खेळत होत्या. त्यांचं लक्ष माझ्याकडे म्हणजे एका विचित्र दिसणाऱ्या व्यक्तीकडे गेलं. जो रोबोट सारखा पोशाख घालून झाडाखाली उभा होता. (माझ्यावरील सुरक्षा उपकरणं) मी मूळची महाराष्ट्रातील असल्याने मी तिथूनच मोठ्या आवाजात त्या महिलेला विचारलं कशाची भाकरी करताय? बाजरी की ज्वारी?माझा आवाज ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. लगोलग तिनं झोपडीत बोलावलं. माझं सामान पॅक असल्याने सुरक्षित होतं. पण, बूट, जॅकेट आणि डेनिम्स आणि टी शर्ट भिजला होता. बाईक लॉक केली अन् टाकीवरची बॅग घेऊन झोपडीत शिरले. माझ्या टँक बॅगमध्ये माझा नाईट सूट आणि टॉयलेटरीज होती. “कंदील, काही मेणबत्त्या आणि चुलीच्या प्रकाशात माझ्या लक्षात आलं की झोपडी लहान होती पण अतिशय नीटनेटकी होती. आतमध्ये एक पुस्तकांचं छोटं कपाट होतं. जीवन हेच शिक्षण आहे मी झोपडीत शिरले तेव्हा… त्या बाईने मला माझे ओले कपडे आणि चिखलाचे बूट सुकवण्यासाठी काही पेपर अंथरले. तर काही पेपर बुटात ठेवले जेणेकरुन सकाळपर्यंत कोरडे होतील. (पोस्ट ग्रॅज्युएट आणि शिक्षक असूनही, मी ही युक्ती अशा व्यक्तीकडून शिकले जी पूर्णपणे अशिक्षित होती. जे तुम्हाला सांगते की शिक्षण हे जीवनासाठी प्रशिक्षण नाही, तर जीवन हेच शिक्षण आहे. आणि तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाकडून शिकण्यासाठी तयार असलं पाहिजे) थोडी विसावल्यानंतर मी त्या महिलेची गोष्ट ऐकली. ती रस्ता बनवण्याच्या टोळक्यात मजूर म्हणून काम करत होती. तिच्या दारुड्या पतीने तिला आणि त्यांच्या दोन मुलींना वाऱ्यावर सोडून पलायन केलेलं. आपल्या 8 आणि 6 वर्षांच्या त्या दोन मुलींना ती जवळच्या शाळेत पाठवते, जे दोन्ही बाजूंनी 10 किमी अंतर असेल. मुलींना चांगलं शिक्षण देऊन त्यांचं भविष्य उज्वल करण्याची तिची इच्छा होती. घासातला घास भरवला.. दिवसभरात प्रत्येकी एक भाकरी हे त्यांचे एकमेव जेवण होतं, जे ते लसणाच्या चटणीसोबत घ्यायचे. पण त्या दिवशी त्या बाईने तिची भाकरी माझ्यासोबत वाटून घेतली. त्यातही मला भाकरीचा मोठा भाग दिला. जगण्यासाठी मूलभूत स्त्रोत असूनही सर्वात उदार, दयाळू आणि देणारे लोकच खऱ्या अर्थाने श्रीमंत असू शकतात. चुकून भेटलेल्या त्या महिलेमुळे माझ्या डोक्यावर आश्रय, हृदयात ऊब आणि पोटात अन्न होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, माझे बूट आणि इतर गोष्टी सुकल्या होत्या. वर्तमानपत्रांनी आपलं काम चोख बजावलं होतं. (मुलींना वाचनाचा सराव आणि चालू घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी त्या बाईने जवळच्या गावातून जुने पेपर आणले होते). मी काही रोख रक्कम देऊ केली असता तिने घेण्यास नकार दिला. मी आजही त्या फोनची वाट बघतेय पण, जेव्हा मी माझे सर्व रंगीबेरंगी पॅड आणि स्टेशनरी देण्याची ऑफर दिली. (माझ्या सोलो राईडमध्ये मला स्केचिंग, लेखन, जर्नलिंग आवडते. स्केच पेन, कलर पेन्सिल, पेन इत्यादी नेहमी माझ्या टँक बॅगमध्ये असतात) तेव्हा त्या दोन मुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला. आजही मुलींच्या चेहऱ्यावरील हसू मला जसच्या तसं आठवतंय. माझ्या नकाशावर बसून त्यांनी माझा लांबचा प्रवास पाहिला. मी ज्या शहरातून आले त्याबद्दल काही प्रश्न विचारले. मी माझा फोन नंबर त्यांना दिला. काही मदत लागली तर नक्की सांगा. तुमच्या मुली शिकून मोठ्या झाल्यावर नक्की कळवा असं सांगून मी जड मनाने निरोप घेतला. मी अजूनही त्या फोनची वाट बघतेय. कधीतरी पुन्हा त्या हसण्याचा आवाज येईल आणि फोनच्या दुसऱ्या टोकाकडून आनंदाची बातमी समजेल. मला खात्री आहे की त्या झोपडीतील मुलींना शिक्षणाचे खरं मूल्य माहित होतं. त्यांना शिकण्याची इच्छा होती. ही घटना मला सतत शिकत राहण्यासाठी आणि इतरांशी दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते. बाईक रायडींग म्हणजे मेडिटेशन बाईक चालवणे माझ्यासाठी ध्यानासारखं आहे. समाजाने त्याकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि त्याला केवळ पुरुषप्रधान कौशल्य समजू नये अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाईक चालवायची आहे. एक दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात फिरण्याची इच्छा आहे. मी आत्तापर्यंत 15 राज्ये फिरली असून उरलेल्या राज्यांमधूनही मी लवकरच प्रवास करू करणार आहे. कॅन्सर जनजागृती, जननेंद्रियाची स्वच्छता आणि मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी माझ्या छोट्याशा मार्गाने समाजात योगदान देण्याचा उद्देश आहे. तरुणांना, महिलांना एक उत्तम उदाहरण म्हणून प्रभावित करणे आणि माझ्या प्रवासात भेटलेल्या सर्व प्रेरणादायी व्यक्तींकडून प्रभावित होणं माझ्यासाठी मनोरंजक आहे. मी आतापर्यंत सुमारे 39000 किमी एकटीने आणि उर्वरित 8000 किमी महिला रायडर्ससह कव्हर केलंय. आगामी प्लॅन.. या वर्षी माझ्या 5 क्लब सदस्यांसह लडाख प्रदेशात उमलिंगला पास (जगातील सर्वात उंच रोड) ची राइड जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित आहे. (क्लबचे नाव - विझाग वुमन मोटारबायकर्स) डिसेंबर - महाराष्ट्र एक्सप्लोरेशन - सोलो (यापूर्वी न केलेली ठिकाणे) नियोजित आहे. - वैशाली कुलकर्णी-मोरे, पहिला महिला सोलो बाईक रायडर (आँध्र प्रदेश) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात