आजपर्यंत मी भारतातील 11 राज्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश तर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि स्कॉटलॅन्ड सारख्या परदेशात 4 वेगवेगळ्या देशांमध्ये मिळून 78000 किलोमीटर सायकलिंग पूर्ण केली आहे. इतका प्रवास करुनही माझ्या मनाला एक खंत नेहमी टोचत असते. आजही मला माझ्या त्या निर्णयाचं वाईट वाटतं. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. हाय फ्रेंड्स, मी डॉ. पवन सत्यनारायण चांडक, मला सायकलिंगची लहानपणापासून अजिबात आवड नव्हती. मात्र, एका शिबीराने माझ्यात आमुलाग्र बदल झाला. मला सायकलिंगची खरी प्रेरणा चंद्रपूर जिल्ह्यातून मिळाली. 2012 साली श्रमसंस्कार छावणीसाठी मी तिथं गेलो होतो. यावेळी बाबा आमटे यांनी आयोजित केलेली सायकल यात्रेची डॉक्युमेंट्री पाहिली. या माहितीपटाने मी खूप प्रभावित झालो. जर बाबा आमटे 1986, 1989 मध्ये युवकांना घेऊन भारत जोडोचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर आणि ओझा ते अरुणाचल प्रदेश प्रवास करू शकतात तर आपण का नाही? असा विचार माझ्या मनात आला. भले बाबांनी सायकल नाही चालवली. पण, त्यांची प्रेरणा होतीच. मग मी विचार केला की आपण एड्स जनजागृती हा संदेश घेऊन संवादातून जनजागृती करावी. शासकीय पातळीवर जनजागृती होते. पण, संवादातून केलेल्या जनजागृतीचा प्रभाव मोठा आहे. यातूनच पहिली 14 किलोमीटरची सायकल रायडींग कृषी विद्यापीठ सुरू केली. श्रमसंस्कार शिबिरातून परत परभणीला आल्यावर नियमित सायकलिंग सुरु केली. सुरुवातीला बलसापर्यंत जायचो, येताना पाय दुखल्याने अक्षरशः हातात सायकल घेत थोडी चालवत मग सायाळापर्यंत रोज 18 किमी, पुढे इठलापूर देशमुख आणि एके दिवशी सरळ पोखर्णी पर्यंत जाऊन येऊन 44 किमी सायकलींग केली. त्या दिवशी बायकोकडून पाय दाबून घेतले. पुढे वाटले आता बस फक्त नियमित 18 किमी सायकल करायची बाकी लांब सायकलिंग नको बाबा.
भाग मिल्खा भाग आणि जो जिता वही सिकंदरमधून प्रेरणा एके दिवशी फरहान अख्तरचा ‘भाग मिल्खा भाग’ आणि सहजच टीव्हीवर ‘जो जिता वही सिकंदर’ चित्रपट पाहल्यावर काय स्फूर्ती आली कि एकदा रविवारी सकाळी 6 वाजता निघून धसाडी अंगलगाव येथे गोदावरी नदी किनारी सायकलवर भ्रमण करून 60 किमी सायकलिंग करून घरी 10 वाजता परतलो. 60 किमी सायकलिंग त्या वेळची माझी वैयक्तिक उच्च सायकलिंग. अश्या पद्धतीने नियमित सायकल कधी राहाटी पूल, झिरो फाटा, झरी, देवगाव फाटा, दैठना, लिमला, ताडकळस, मिरखेल, यशवाडी, आरळ अशी सायकलिंग चालू केली. साध्या सायकलवर एक व्हायचे ताशी 15 किमी पेक्षा अधिक वेग यायचा नाही, सायकल वजनाला जड असल्याने लांबच्या प्रवासात अवघड जायची. आणि लांब सायकलिंग करून परत येताना समोरून हवा ज्याला ‘हेड विंड’ म्हणतो ती असल्याने घामाघूम व्हायचो. माझे सायकलिंग मधील गुरु डॉ केदार खटींग: एकलव्याने कसे मनोमन द्रोणाचार्यला न भेटता गुरू मानले होते तसे मी डॉ केदार खटिंग यांच्या सायकलिंगचे किस्से माझ्या पेशंट, मित्रांकडून ऐकत होतो. पण इतक्या मोठ्या सायकलिस्टला भेटायची हिम्मत होत नव्हती. मग काय नियमितपणे त्यांना न भेटता केवळ त्यांचा आदर्श समोर ठेऊन मनोमन त्यांना गुरू मानून रोज 30-40 किमी सायकलवर सराव करू लागलो. बघता बघता 40-50 किमी सायकलिंग जमू लागल्यावरच मग एकदा सहज इंटरनेटवर त्यांचा नंबर शोधून त्यांना भीतभीत कॉल केला की सर उद्या सायकलिंगला सोबत जाऊ का? त्यांनी लगेच होकार दिला. त्या रात्री उद्या डॉ. खटींग आणि डॉ. भालेराव सरांसोबत सायकलिंगला गेल्याची स्वप्ने पाहत मी झोपलो. सकाळी 5 वाजताच सरांच्या 1 फोननेच तयार होऊन त्यांना जॉईन झालो तेव्हा सर्वप्रथम मी ट्रेक अर्थात इंपोर्टेड बाईक/सायकल पाहिली.
पहिला तांत्रिक अडचणीचा अनुभव: मी डॉ खटींग सरांच्या वेगाने दांडी व पांयडल मारत सायकल चालवत होतो पुढे मांडाखळी, इंद्रायणी देवी, दफवाडी, उमरी सोडले भारसस्वाडा रस्त्यावर अचानक कड्कन आवाज झाला आणि पाहतो तर काय माझ्या सायकलची चेन तुटली होती. मला यायला वेळ लागलेला दिसून डॉ खटिंग सर देखील मागे आले. त्यांनी चेन जोडण्याचा प्रयत्न केला. पण, न जमल्याने शेवटी डॉ खटिंग सरांनी देखील मला त्यांच्या सायकलच्या दांडीवर बसवून ऐका हाताने सायकल धरत भारस्वाडापर्यंत आणले. तिथे अनेकांनी जीपवर सायकल टाकून परभणी जायचा सल्ला दिला. पण मला तो मला मान्य नव्हता. शेवटी तिथेच एका सायकलवाल्याकडे चेन जोडून सायकलवरच 10 वाजता परभणीला पोहोचलो. असा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केलेला 60 किमी सायकल प्रवास. ट्रेक सायकल घायचा निर्णय: जड वजनाची सायकल, लोखंडी फ्रेम, फिक्स्ड गियर यामुळे लांब प्रवासात घामाघूम होणे, चेन तुटण्याची भीती, चढावर दांडी मारल्याने गुडघे व मांडीच्या स्नायू व लिगामेंटला होणारी इजा या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून इंपोर्टेड सायकल घ्यायचा निर्णय घेतला. ट्रेक 3700 सायकलची किंमत 27500/ होती. इतकी मला न झेपणारी होती. शेवटी वडिलांच्या क्रेडिट कार्डवर घेतली आणि रोज 1 हजार प्रमाणे 27 दिवस जमा करून 22 ऑगस्टला पुण्याहून माझी ड्रीम सायकल ट्रेक 3700 घरी आणली. त्यादिवशी आनंदाने सर्व मित्रांना सायकलवरच पेढे वाटलॆ.
जावई बापू आणि सायकलवर? : तिजच्या सणनिमित्त बायको माहेरी गेली असल्याने तिला ट्रेक सायकल घेतल्याचे सांगितलेच नव्हते. मग सरप्राइज म्हणून शुक्रवारी ठरवले दुपारचे क्लीनिक करून ‘तिज’हा आमचा मारवाडी समाजातील सण असतो, ज्यात पूजेसाठी नवरा सासुरवाडीला जातो. मग काय काढली सायकल आणि थेट सेलूला 50 किमी सायकल चालवत सासुरवाडीला पोहोचून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. जावई बापू आणि सायकलवर? आमच्या सासरेबुवानी मार्केट कमीटीतील सर्व व्यापारी, हमाल यांना माझी सायकल कौतुकाने दाखवली. दुसऱ्या दिवशी सायकल चालवत वेळेवर घरी पोहोचलो. एकदा असाच किशोरजी व्यास यांची भागवत कथेसाठी मानवत, पाथरी मार्गे ढालेगावला गेलतो सासरवाडीतील सर्व मंडळींना भेटलो. पहिल्यांदाच एकाच दिवशी 110 किमी सायकलिंग करण्याचा अनुभव. सेंच्युरी मारून घरी आल्यावर एक वेगळाच उत्साह असायचा. पूर्वी सारखा घामाघूम होणे, पाय किंवा गुडघे दुखणे बंद झाले. एकदा कंबर दुखीचा त्रास सुरु झाला होता. थोडा अभ्यास आणि फिजियो डॉ केंद्रेकरची भेट यातून असे निदर्शनात आले कि सिटची उंची आणि हॅण्डरबारची भूमिती कुठे तरी चुकतेय. त्याला तांत्रिकदृष्टया दुरुस्त करून पाठीचे व्यायाम करून हा कंबर दुखीचा त्रास देखील नाहीसा झाला.
सायकलिंग मधून मिळालेले मित्र: जीवनरेखा बालगृहातील सामाजिक कार्याच्या निमित्ताने डॉ शिवा आयथॉल आणि मुकेश पैठनेची झालेली ओळख पुढे माझे कायमचे सायकलिंग पार्टनर म्हणून झाली. पुढे मी आणि मुकेशने सोबत अनेक सायकलिंग मोहिमा केल्या. ज्यात मुंबई कोंकण, परभणी पंढरपूरवारी, पुणे महाबळेश्वर सायकल मोहिमांचा समावेश आहे. डॉ शिवा आयथॉल सर तर माझे कायमच सायकलिंगचे सोबती आहेत. केवळ सायकलिंग नाही तर सामाजिक कार्य असो व जीवनात येणारे चढ उतार असो ते मला नेहमीच मार्गदर्शन करतात. कैलास तिथे, डॉ संदीप कार्ले, डॉ चंद्रशेखर भालेराव, डॉ गणेश चव्हाण, डॉ विवेक कुलकर्णी, खापरे सर, विक्रम शिंदे, सचिन घोघरे, रवी मौर्य, रमेश मुंदडा या मित्रांचे सायकलिंग मधील योगदान व सहवास नेहमीच आनंददायी राहिला. सायकलिंगमुले प्रशासकीय अधिकाऱ्यांची ओळख आणि सामाजिक कार्यात वाटा: श्री एस पी सिंग परभणीतील कर्तव्यदक्ष कलेक्टर त्यांना केवळ सायक्लीस्ट तथा उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर व महेश वदडकर यांच्यामुळे भेटू शकलो. या भेटीत ओळखी दरम्यान त्यांना एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनसाठी करत असलेल्या कार्याबद्दल सांगितले. त्याचा परिणाम लगेच जिल्हा पुरवठा अधिकारी वेणीकर सर व तहसीलदार पवार मॅडम यांनी बालगृहास भेट देऊन 18 मुलांचे केवळ काही तासात अंत्योदय कार्ड काढून दिले. त्यांना 1 रु दराने 35 किलो गहू व 2 रु दराने तांदूळचा लाभ मिळवून दिला.
तसेच मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची देखील परभणी नांदगाव सायकलिंग मुळेच ओळख झाली. पुढे आरोग्यविषयक व्याख्यान असो अथवा एचआयव्ही बाधितांनी तयार केलेल्या गणपती प्रदर्शन त्यांची नेहमीच सामाजिक कार्यात मदत झाली आहे. सायकल रेस मधून जनजागृती: रेस वगैरेची मला तितकी आवड नाही पण सायकलिंग मधून भटकंती आणि त्यातून सायकलवर एड्स व पर्यावरण जनजागृती संदेशाचा बोर्ड लावून जनजागृती व्हावी या उद्देशने मी आजवर परभणी सेलू जिंतूर अश्या 135 किमीची राष्ट्रीय स्तराची रेस, नाशिक पेलोटॉन 150 किमी रेस, परळी सायक्लोथॉन 100 किमी रेस मध्ये भाग घेऊन एड्स विषयी जनजागृती केलीय. उन्हाळा आणि सायकलिंग: उन्हाळ्यात सकाळी 4 वाजता उठून आम्ही दर रविवारी परभणी वसमत, जिंतूर, निमगिरी, औंढा, गंगाखेड, सेलू, पाथरी असे प्रत्येक रविवारी 100 किंमी सायकलिंग करू लागलो. घोस्ट राईड: वसमतच्या रेल्वे पुलावर भूत असल्याच्या अनेक दंत कथा ऐकल्या होत्या. मग काय मी, डॉ खटिंग, डॉ शिवा सर रात्री 1 वाजता परभणीहून सायकलवर निघून 3 वाजता वसमत, मालेगाव मार्गे साडे चारला नांदेडच्या तरोडा नाक्यावर पोहोचून परत सकाळी 8 वाजता परभणीला पोहोचलो. अश्या प्रकारे परभणी नांदेड परभणी 140 किमी नाईट सायकलिंग केली होती. ज्याला आम्ही सहज ‘घोस्ट राईड’ असे नाव दिले होते. परंतु, आम्हाला वसमतला कोणतच भूत भेटलं नाही.
200 किमी ब्रेव्हेट: अशीच उन्हाळ्यात नाईट सायकलिंगचा अनुभव म्हणून मी आणि डॉ केदार खटिंग सरांनी पुणे येथील ब्रेव्हेट स्पर्धेत भाग घेतला. ज्यात पुणे पिरंगुट, टेमघर लवासा हुन परत बालेवाडी मार्गे लोणावळा हुन परत पुणे असा 200 किमी 4 वेगवेगळ्या घाटातून नाईट सायकलिंगचा अनुभव घेतला. ज्यात टीम स्पिरिटचा महत्वाचा सहभाग असल्याने आलेल्या प्रत्येक तांत्रिक अडचणी पंचर असो किंवा रात्री पाणी संपणे, थकल्यावर धाब्यावर केलेले शवासन मजा आली होती. पुढे नांदेड बोधन नांदेड 200 किमी आणि नांदेड उमरखेड नांदेड अशी 200 किमी ब्रेव्हेट मध्ये यशस्वी सहभाग घेतला. या ब्रेव्हेट दरम्यान जो पायाला तीव्र स्वरूपाचा वात आला तेव्हा डॉ उमेश भालेराव सरांनी ओआरएस हायड्रेशनचा सल्ला मोलाचा ठरला. सायकलिंग मधून एचआयव्ही एड्स व पर्यावरण विषयी जनजागृती: बाबा आमटेंच्या भारत जोडो यात्रेच्या फिल्म मधून प्रेरणा घेवून पहिली जनजागृती यात्रा मुंबई अलिबाग मुरुड जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, आंजर्ले, दापोली लाडघर, दाभोळ, जयगड, गणपती पुळें, रत्नागिरी पावस असा 390 किंमी सायकल प्रवास सागरी मार्गातील घाट, डोंगर मार्गातून केला. ज्यात मुंबई येथील सायकलिस्ट मित्र रवी कुमार मौर्य, पुणे येथील राजेश कौशिक ज्यांची फेसबुकमुळे ओळख झाली आणि परभणीचा मुकेश पैठणे यांची सोबत लाभली.
कौटुंबिक जबाबादारीमुळे सायकलिंगला थोडी विश्रांती: 1 ऑगस्ट 2015 ला अत्यंत प्रतिकूल अश्या आरोग्य स्थितीत 8व्या महिन्यातच मला दुसरी मुलगी शर्वरी झाली. 8 व्या महिन्यात झाल्याने तिला श्वास घेण्यास त्रास असल्याने ती तब्बल 2 महिने नवजात कक्षात होती. दुसरीकडे माझी पत्नी देखील सिरीयस होती. सायकलिंगमुळे ओळख आणि मैत्री झालेले डॉ राजगोपाल कालानी, डॉ संदीप कार्ले, डॉ राठोड यांनी तिची काळजी घेतली तर डॉ नाईक सरांनी माझ्या पत्नीला झालेला न्युमोनियावर उपचार केले. या दरम्यान कौटुंबिक जबाबदारीमुळे सायकलिंग बंदच होती. दोघे सुखरूप घरी असल्यावरच परवानगी घेऊनच सायकलिंग चालू केली. त्या निर्णयाबद्दल आजही मला खंत वाटते सायकल रायडींग दरम्यान मी कधीही बॅकअप वाहन सोबत ठेवत नाही. कारण, त्यातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश साध्य होत नाही. बॅकअप वाहन म्हणजे तुम्ही सायकल चालवून एकडीकडे पर्यावरण वाचवण्याचा संदेश देता तर दुसरीकडे तुमचे वाहन मात्र पर्यावरणात प्रदूषक घटक सोडत असते. त्यामुळे मला हा प्रकार चुकीचा वाटतो. मात्र, जून महिन्यात पुणे-महाबळेश्वर दरम्यान रात्री 8 वाजल्याने पाचगणी 6 किलोमीटर बाकी असताना आम्ही Dehydrate झाल्याने एका Pick up Bollero वाल्याला लिफ्ट मागून पसरणी घाट राहिलेला पार केला. पण आजही त्या 6 किमीसाठी बॅकअप वाहन वापरल्याची खंत वाटते.
अविस्मरणीय ट्रीप मी आतापर्यंत महाराष्ट्रासह जगभरात 78 हजार किलोमीटर प्रवास केला आहे. या सर्व ट्रीप मी कधीही विसरू शकणार नाही. मात्र, त्यातील काही ट्रिप ह्या अविस्मरणीय आहेत. त्यातीलच 2015 मध्ये केलेली सोलो विदर्भ सायकल यात्रा. त्यात मेळघाटच्या पोपटखेड व धारणीच्या जंगलात केलेला सायकल प्रवास खूपच वेगळा अनुभूती देणारा होता. केवळ निसर्गाचा आवाज असलेला 45 किमीचा जंगल प्रवास होता. या प्रवासात केवळ 2 वेळा दुचाकी दिसली. अस्वलांची भीती वाटत होती. पण, सुदैवाने अस्वल कुठेही दिसले नाही. बँगलोर कन्याकुमारी सायकलिंगच्या शेवटच्या दिवशी त्रिवेंद्रम ते नागरकोईल दरम्यान 4 तास वादळी पावसाने गाठल्याने अडकून बसलो होतो. परंतु, उघडक्यावर निसर्गाने दिलेली साथ, आकाशात इंद्रधनुष्य व रंगांची उधळण, फिल्टर कॉफी व बरेच काही भविष्यात: हैदराबाद ते रामेश्वर, नागपूर ते पुरी, पाटणा ते काठमांडू या सायकल मोहीम येत्या काही दिवसांत करायच्या आहेत. झिरो बजेट सायकलिंगकडे माझा भर माझ्या पुणे पंढरपूर सायकल वारीचा 3 दिवसांचा खर्च 702/- रुपये होता. त्यात रेल्वे तिकीट 350, सायकल लगेज चार्ज 125, येताना बस भाडे 150, सायकल भाडे 50 होते. केवळ 1,35,000 मध्ये तिकीट, व्हीजा, हॉटेल खर्च सोबत 17 दिवसांत मी स्कॉटलॅन्ड, इंग्लंड, जर्मनी व फ्रांस मध्ये 2 वेगवेगळ्या व्हीजासह प्रवास केला होता. हा प्रवास विमान, रेल्वे असा मिक्स होता. 3250 रुपयात मी वाघा बॉर्डर ते उज्जैन 1320 किमी सायकल प्रवास 9 दिवसांत केला होता.
आजवर 78000 किलोमीटर सायकलिंग पूर्ण: आजपर्यंत मी एड्स आणि पर्यावरण जागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ इत्यादी विषयावर भारतातील 11 राज्ये - महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि तर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड व स्कॉटलॅन्ड सारख्या परदेशात 4 वेगवेगळ्या देशांमध्ये 78000 किलोमीटर सायकलिंग पूर्ण केली आहे. कुटुबियांचा पाठींबा लाखमोलाचा: सर्वात महत्वाचे म्हणजे या सायकलिंगसाठी मला घरून वेळोवेळी मिळालेला सपोर्ट माझी आई, माझे सायकलिस्ट वडील सत्यनारायण चांडक, माझी पत्नी आशा, बाबा आज सायकलिंगला गेले नाही का असे विचारणारी माझी मुलगी प्रचिती, शर्वरी आणि स्कॉटलंडमध्ये सायकलिंग करणारा माझा लहान भाऊ पंकज यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आरोग्यास फायदा: आज धावपळीच्या जीवनात कळत नकळत वाढलेल्या अपेक्षामुळे येणारा ताणतणाव नाहीसा होण्यास सायकलिंगने मदत झाली आहे. माझा दमा, ऍलर्जी, सर्दी सायकलिंगमुळे आटोक्यात आली आहे. - डॉ. पवन सत्यनारायण चांडक, सायकल रायडर, परभणी, तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.