9पल्या आवडीलाच करिअर म्हणून निवडणारे लोकं जगात खूप कमी आहे. याबाबतीत मी मला भाग्यवान समजतो. आज मी स्वतः डिझाईन केलेलं प्रोडक्ट देशभर प्रसिद्ध आहे. पण, इथपर्यंतचा प्रवास सोप नव्हता. खूप वर्षांची मेहनत आणि रात्रंदिवस एक करुन इथपर्यंत पोहचलो आहे. पण, याची सुरुवात माझ्या छंदामुळे सुरु झाली. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर अशोक जगे, आपल्या सर्वांना काही ना काही छंद असतात, कोणाला क्रीडा क्षेत्रात रुची असते तर कुणाला कला क्षेत्रात. तशी मला बाईक रायडिंगची आवड आहे. या सर्वांची सुरुवात झाली माझ्या लहानपणी. मी शाळेत असताना वडिलांनी एक बाईक घेतली, बजाज M 80. मी खूपच जास्त एक्सायटेड होतो. कारण, मला पहिल्यापासून गाड्यांचं भारी आकर्षण. वडिलांनी मला बाईक वरून खूप फिरवलं. लहान असल्यामुळे मला पुढे बसवायचे. तेव्हा जो छान गार वारा लागायचा तो अजूनही आठवतो. माझं लक्ष सतत वडील बाईक कशी चालवतात ह्यावरच असायचं. त्यावेळेस माझ्या मनात बाईक रायडिंगबद्दल इंट्रेस्ट खूप वाढला. आता मी स्वतः बाईक कधी शिकतो आणि चालवतो असं वाटू लागलं होतं. मला अजिबात पेशन्स नव्हते. आमच्या शेजारचे काका माझ्या मोठ्या भावाला रोज बाईक चालवायला शिकवत आणि मी सुद्धा त्यांच्या सोबतच असे. तेव्हा माझे पायसुद्धा बाईकवरून पुरत नव्हते. पण, त्या काकांनी मला सुद्धा बाईक चालवायला शिकवलं. एके दिवशी घरी कोणी नसताना मी गुपचूप चावी घेतली आणि क्लासला एकटाच बाईक घेऊन निघालो, तेव्हा बाईकचा मेन स्टँड सुद्धा लावता येत नव्हता.
ही बाईक माझ्या लाइफच एक टर्निंग पॉइंट ठरली पण एकट्याने बाईक जेव्हा चालवली तेव्हा समजलं की हे वाटतं तेवढं सोपं नाही, ही एक जबाबदारी आहे. नंतर जसा मी मोठा झालो आमची बाईक जुनी झाली, त्यामुळे आम्ही ती विकून टाकली. आता माझ्याकडे लायसन्स होतं, पण बाइक नव्हती. बाईक चालवायला मिळावी म्हणून मित्रांकडे मागायचो किंवा मामा कधी घरी आला की त्याची बाईक घेऊन एक राउंड मारायला नक्की जायचो. एक छोटासा राऊंड मारून पण मी खूप खुश व्हायचो. मी ठरवलं होतं जसं शिक्षण पूर्ण होईल आणि फर्स्ट जॉब लागेल, मी सर्वात आधी बाईक घेईन आणि तसंच झालं. जॉब लागला आणि मी माझी फर्स्ट बाईक घेतली, यामाहा FZS 150. ही बाईक माझ्या लाइफच एक टर्निंग पॉइंट ठरली.
करिअरला मिळालेली नवी दिशा लहानपणापासून मला नवीन प्रोडक्ट बनवण्याची आणि डिझाईन करण्याची खूप आवड होती. म्हणून आईवडिलांनी मला इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं आणि मी ऑटोमोबाईल इंजिनिअर झालो. जॉब लागला होता, बाईक घेतली होती आणि मी त्या बाईक वर खूप फिरायचो. पण फक्त शॉर्ट डिस्टन्स. मला बाईक रायडिंग बद्दल प्रोफेशनल नॉलेज असं काहीच नव्हतं, रायडींग ग्रुप पण असतात हे पण माहित नव्हतं. मी माझ्या बाईकसाठी काही कस्टमाइज्ड प्रोडक्स डिझाईन केले होते. त्यामुळे ती खूप आकर्षक दिसायची. तसंच मी अजून एक प्रॉडक्ट डिझाईन केलं होतं ते म्हणजे फिंगर वायपर. फिंगर वायपर हे एक हेल्मेट वायपर होतं, जे पावसामध्ये बाइक चालवताना खूप उपयोगाचं होतं. या प्रॉडक्टच्या मदतीने पावसामध्ये बाईक चालवताना हेल्मेट वर उडणार चिखल आणि पाणी सहजतेने साफ करता येत होतं. असं प्रॉडक्ट पूर्ण भारतामध्ये एकही नव्हतं. हे प्रोडक्ट एवढे छान होतं की मी त्याचं प्रोडक्शन करून मार्केटमध्ये विकायचे ठरवले. माझा हेतू एवढाच होता की हे प्रॉडक्ट प्रत्येक रायडरपर्यंत पोहोचलं पाहिजे, ज्याला याची गरज आहे. मला या प्रॉडक्टचा रिस्पॉन्स खूप छान आला, सर्व ऑटोमोबाईल पोर्टल्स, वेबसाईट वर माझं आर्टिकल आलं.
स्वतःचं बाईक मोडिफिकेशन वर्कशॉप सुरू केलं महाराष्ट्र टाइम्स, ठाणेवैभव सारख्या वर्तमानपत्रात माझ्या फोटोसोबत आर्टिकल छापून आलं. आता मला पूर्ण भारतामधून मागणी यायला सुरुवात झाली, एवढेच नाही तर UK, US आणि ऑस्ट्रेलिया मधून सुद्धा ऑर्डर्स आले. अजून आनंदाची बातमी म्हणजे वर्देंची सारख्या नामांकित कंपनी मधून मला जॉब ऑफर आली. वर्देंची ही कंपनी बाईक मोडिफिकेशनसाठी खूप फेमस होती. तिथे काम करणं हे माझं एक स्वप्न होतं. तिकडे मी बाईक मोडिफिकेशन शिकलो आणि लवकरच माझं स्वतःचं बाईक मोडिफिकेशन वर्कशॉप सुद्धा सुरू केला. बाइकिंग हे माझं पॅशन आहे आणि तेच मी माझं करिअर म्हणून निवडलं याचा मला खूप आनंद आहे. अन् माझी डोंबिवली रायडर्स क्लबमध्ये एन्ट्री झाली बरेच रायडर्स लाँग राईडला जाण्याआधी माझ्याकडून त्यांच्या बाईकमध्ये मोडिफिकेशन्स करून घ्यायचे. यामुळे बाईक राईडला फेस होणारे प्रॉब्लेम्स मला समजायचे आणि ते प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी मी वेगवेगळे प्रोडक्स डिझाईन करू लागलो. मी ठरवलं की माझे नॉलेज आणि स्किल्स बाईकिंग कम्युनिटीसाठी वापरायचे. मी जसं रायडर सोबत इंटरॅक्ट करू लागलो तसे मला समजले की लाँग राईडला जाण्यासाठी रायडर्स खूप मोडिफिकेशन्स करून घेतात आणि मी कधी लाँग राईड न केल्यामुळे मला त्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणून मी ठरवलं की आपण एक रायडिंग ग्रुप जॉईन करूया म्हणजे मला पण लॉंग राईड करता येईल आणि त्या ग्रुप मेंबर्सकडून सुद्धा खूप काही शिकता येईल. फेसबुकवर बरेच ग्रुप शोधले. पण, काही ऍक्टिव्ह नव्हते तर काही फक्त महाग स्पोर्ट्स बाईकचे ग्रुप होते. पण एक ग्रुप होता जो मला योग्य वाटला, डोंबिवली रायडर्स क्लब म्हणजे DRC.
DRC म्हणजे सेफ्टी ला नो कॉम्प्रोमाइज DRC हे एक रजिस्टर्ड क्लब होता, ऍक्टिव्ह सुद्धा होता आणि मुख्य म्हणजे जॉईन करण्यासाठी अमुकअमुक बाईक हवी अशी कोणतीही अट नव्हती. मी लगेचच त्यांचा नंबर शोधून त्यांना कॉल केला आणि फॉर्मलीटीज कम्प्लीट करून जॉइन पण केले. DRC जॉईन केल्यावर मला समजलं खरं बाईक रायडिंग काय असतं, ग्रुप रायडींगची शिस्त काय असते, सेफ्टी काय असते आणि त्याची किती गरज आहे. मुख्य म्हणजे रायडिंग आणि रेसिंग यामधला फरक मला समजला. DRC म्हणजे सेफ्टी ला नो कॉम्प्रोमाइज. DRC सोबत राइड करून मला पण बऱ्यापैकी अनुभव आला आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. मी काही लाँग डिस्टन्स राइड त्यांच्यासोबत केल्या जसं गोवा, मालवण, कूर्ग, गोकर्णा आणि उत्तराखंड. DRC सोबत राईड करताना निर्धास्त होऊन राईड एन्जॉय करता येते. कारण, कोणाची पण बाईक ब्रेक डाऊन झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला कोणी एकटं सोडून जाणार नाही याचा विश्वास आहे. आणि हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण, मला याचा अनुभव आला आहे.
पहिल्याच ग्रुप राईडमध्ये भितीदायक अनुभव DRC सोबत माझी फर्स्ट राईड होती, आम्ही भंडारदारा डॅम येथे गेलो होतो. ही एक शॉर्ट राईड होती. येताना रात्र झाली, आम्ही सर्व कसारा घाटातून जात होतो तर अचानक एक वळण गेल्यानंतर माझ्या पुढचे दोन रायडर स्लिप होऊन पडले. आणि मी सुद्धा पडता पडता वाचलो. एक मेंबर तर बाजूने जाणाऱ्या ट्रक खाली जाता जाता वाचला. हे सर्व पाहून मी खुप घाबरलो होतो पण बाकी मेंबर्सने एकदम शांतपणे परिस्थिती सांभाळली. दोन्ही मेंबर्सला थोडंच लागलं होतं, फर्स्ट एड किट सोबत होती, त्यामुळे लगेचच औषधोपचार केला. यामधून आम्ही सावरतच होतो, तेवढ्यात मागून जोरात आवाज आला बघितलं तर एक काका आणि काकू बाईक वरून सिम पोर्ट वर स्लिप होऊन पडले होते. आम्ही लगेचच त्या दोघांना रस्त्याच्या कडेला घेतलं आणि त्यांची बाईक सुद्धा बाजूला घेतली. कारण, मागून भरधाव वाहनं येतच होती. त्या दोघांना सुद्धा हलकं खरचटलं होतं आणि मुका मार लागला होता. आमच्यासोबत काही महिला रायडर्स होते, त्यांनी काकूंना औषधोपचार केला आणि थोडा धीर देऊन शांत केलं. ज्या ठिकाणी सर्व पडले होते तिकडे जाऊन आम्ही बघितलं तर समजलं रस्त्यावर तेल सांडलं होतं. सर्व मेंबर्सने लगेच त्यावर माती टाकली जेणेकरून अजून कोणी स्लिप होणार नाही आणि कुठला अपघात होणार नाही.
थोड्या वेळाने आम्ही सर्वजण तेथून निघालो. पण, मी अजून सुद्धा थोडा घाबरलेला होतो. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्ता नीट दिसत नव्हता त्यामुळे माझा स्पीड कमी झाला. एका मेंबरला ते समजलं त्यांनी मला सांगितलं की बिनधास्त होऊन चालव आणि तू कम्फर्टेबल आहेस त्या स्पीडला चालव, मी आहे तुझ्यासोबत. बाकी लोक पुढे गेले तरी चालेल आणि त्यांनी पूर्णवेळ माझ्यापुढे बाईक चालवून मला रस्ता दाखवला. आम्ही सर्व सुखरूप घरी पोचलो. हे सर्व पाहून मनात एकच विचार आला की आपण एकदम योग्य ग्रुप जॉईन केला आहे. उत्तराखंड राईड म्हणजे अनुभवांचा खजिना आत्तापर्यंतची माझी अविस्मरणीय आणि सर्वात लांब राईड म्हणजे DRC सोबत केलेली उत्तराखंड राईड. साधारण 17 दिवसांची ती राईड होती. प्रत्येक राईड काहीतरी नवीन शिकवून जाते, या राईडला माझी ENDURANCE लेवेल टेस्ट झाली असं म्हणू शकतो. सतत तीन दिवस राईड करून आम्ही हरिद्वारला पोचलो, जे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं आणि जसजसे पुढे गेलो तापमान एकदम कमी होत गेलं. ओली मध्ये तर मायनस मध्ये होतं. एवढ्या थंडीमध्ये राईड कधीच केली नव्हती, त्यामुळे हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. तसं तयारीने गेलो तर होतो पण तरी बाईक वर हवा खूप लागते त्यामुळे थोडा वारा कुठून तरी लागायचाच. आमच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांना सर्वात जास्त थंडी लागत होती, डबल सॉक्स आणि हॅन्ड ग्लोज घालून सुद्धा पूर्ण सुन्न पडले होते. क्लच आणि ब्रेक ऑपरेट करणेसुद्धा कठीण वाटत होतं. त्यात ते रस्ते नागमोडी वळणाचे त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि हळू चालवायला लागत होतं. अजून एक चॅलेंज म्हणजे तिकडे सतत रस्त्यावर दरडी कोसळण्याची, रस्त्यात कुठे ना कुठे दगडी पडलेली दिसायची. ते तिकडे एकदम कॉमन होतं. काही स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की गाडी चालवताना गाणी ऐकू नका, सतर्क रहा लक्ष ठेवा कुठूनही थोडासा जरी आवाज आला तरी लगेच सावध व्हा. लवकरच आम्ही त्या क्लायमेटला ऍडजेस्ट झालो आणि एकदम एन्जॉय करून राईड करायला लागलो.
गाडी चालवताना दिसणारे सुंदर दृश्य, बर्फाचे डोंगर, डोंगरकपारीला वसलेली छोट छोटी गावं, तिकडचं राहणीमान, डोंगराखालून वाहणाऱ्या नद्या, खाली उतरलेले ढग, ढगातून येणारा हलकासा सूर्यकिरण, हे सर्व बघून एवढ्या लांब आल्याचा एक समाधान वाटलं. स्वर्ग कधी बघितला नाहीये पण तो जणू असाच असावा असे वाटलं. अंगातलं थकवा पूर्ण निघून गेला होता आणि एकदम फ्रेश वाटत होतं. एका गावातून पास होताना एक छोटीशी गोष्ट बघितली ती सांगू इच्छितो. सगळे गाव डोंगराच्या कडेला वसलेली आहेत, त्यामुळे तिकडे मोठं मैदान असं नाहीच. पण तिकडे छोट्याशा जागेत काही मुलं क्रिकेट खेळत होती. मी विचार केला की क्रिकेट खेळताना बॉल जर थोडा लांब गेल तर थेट दरीतच जाईल. मग हे खेळतात कसे? पण नीट बघितलं तेव्हा समजलं की त्यांनी बोलला एक दोरी लावून एका ठिकाणी बांधून खेळत होते. मी असं कधी विचार पण केला नव्हता. आजूबाजूची परिस्थिती कशी पण असो, त्यावर मार्ग आपण नक्कीच काढू शकतो हे समजतं.
मी मुद्दामहून युट्युब वर अपघाताचे व्हिडीओ पाहतो बाईक रायडिंग थोडं रिस्की वाटलं तरी माझ्या घरच्यांचा मला पाठिंबा आहे. पण, ते नेहमी मला प्रश्न विचारतात की भीती नाही वाटत का एवढ्या लांब तुम्ही बाईक वर जाता? तर मी त्यांना एवढंच सांगतो की सेफ्टी गिअर्स घालूनच राइड करतो, त्यामुळे भीती तर वाटत नाही आणि माझ्या वडिलांनी सुद्धा मला काही टिप्स दिल्या आहेत, ज्या मी नेहमी लक्षात ठेवतो आणि फॉलो करतो. त्यांच्या त्या टिप्स मला नेहमी उपयोगी येतात. काही लोक विचारतात तुला रायडिंगबद्दल एवढी माहिती कशी, एवढा कॉन्फिडन्स कसा आला. आपल्याला सांगितलं जातं की दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, तसच मी नेहमी युट्युब वर एक्सीडेंटचे व्हिडिओ मुद्दाम बघतो. ते बघून मन विचलित होतं, भीती वाटते पण ते बघून समजतं की चुका कुठे होतात आणि त्या कशा टाळू शकता. ते व्हिडिओ बघून हे समजते की छोटी चूक सुद्धा किती महाग पडू शकते. बाईक चालवताना सुद्धा ते व्हिडिओ आठवतात आणि कधी बाइकचा स्पीड वाढवला असेल तर तो आपोआपच कमी होतो. माझं एवढं म्हणणं असतं की बाईक ही एक मशीन आहे, नेहमी ती आपल्या कंट्रोल मध्ये असावी, आपण तिच्या कंट्रोलमध्ये जाता कामा नये. बाईक तेवढेच पळवा जेवढी अर्जंट सिच्युएशन मध्ये थांबू शकता. बाईक पळवण्या पेक्षा थांबवणं शिकणं जास्त गरजेच आहे असं मला वाटतं.
बाईक रायडिंगने मला आयुष्य जगायला शिकवलं बरेच वर्ष झाली राईड करतो आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास बाईक वर केला आहे. अजूनही करतो आहे. प्रवास करताना खूप काही शिकलो, कधी एखाद्या शांत रोडवर मंद गतीने बाईक चालवताना मिररमध्ये बघितलं की सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात. बाईक रायडिंग माझ्यासाठी नुसतं PASSION नाहीये ती माझ्यासाठी STREES BUSTER THERAPY आहे. बाइक चालवताना मी सर्व काही विसरून जातो आणि मला एकदम FREE झाल्यासारखं वाटत. माझं मन फक्त पॉझिटिव्ह गोष्टींना FOCUS करतो, खूप ॲक्टिव आणि क्रिएटिव्ह असतं. मला आयुष्यात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ते बाईक राईड करताना नक्की सापडतं. माझ्या करीअरची सुरुवात ज्या प्रॉडक्टमुळे झाली तो म्हणजे हेल्मेट वायपर. त्या प्रोडक्टची पण आयडिया आणि डिझाईन बाईक चालवताना आली होती. MOTOTRENDZ हा आमचा ब्रँडनेम आहे, या नावाने आज पूर्ण भारतातून आमच्या प्रॉडक्टला मागणी आहे. आम्ही मोटरसायकल ॲक्सेसरीज डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो, सगळे प्रॉडक्ट रायडर्ससाठी डिझाईन केले जातात. बऱ्याच लोकांची इच्छा असते की लदाख राईड करावी किंवा कश्मीर टू कन्याकुमारी राईड करावी, माझी मात्र ही इच्छा आहे की भारतातल्या वेगवेगळ्या सुंदर रस्त्यांवरून मला बाईक चालवायची आहे. बाईक रायडिंगने मला आयुष्य जगायला सुद्धा शिकवलं. स्पीड ब्रेकर आला की आपण ते हळूच क्रोस करून पुन्हा स्पीड पकडून पुढे जातो तसाच लाईफ मध्ये प्रॉब्लेम आल्यावर थोडं स्लो होऊन प्रॉब्लेमला सामोरे जाऊन पुन्हा स्पीड पकडून पुढे जायचे असते. राईडला निघाल्यावर डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत कितीही प्रॉब्लेम आले तरी त्यावर मात करून तिकडे आपण पोचतो. तसेच आयुष्यात कितीपण संकटं आली तरी त्यावर मात करून पुढे जायचं असतं. बाईक ही माझ्यासाठी फक्त एक मशीन नसून एक इमोशन आहे. Riding gives me feeling of being alive. - सागर अशोक जगे, बाईक रायडर, डोंबिवली तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.