माझे पप्पा मला नेहमी सांगतात. बेटा कोणत्याही वाहनावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेऊ नको. शेवटी काहीही केलं तरी ते मशीन आहे. कधीही दगा देऊ शकतं. पप्पांच्या या वाक्याचा अर्थ मला तेव्हा नीट समजला नव्हता. मात्र, महाबळेश्वरच्या राईडवर असताना जो प्रसंग माझ्यासोबत घडला, त्याने मला आयुष्यभराचा धडा मिळाला.. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. मी अनिष गणपत कांबळे, मुंबईतील माहीम भागात राहतो. दुचाकी आणि गाड्या चालवायची आवड लहाणपणापासुनच होती. मी इयत्ता पाचवीत असतानाच फोर व्हिलर चालवायला शिकलो. आता तुम्ही म्हणाल याचे पाय क्लच, ब्रेक, अॅक्सीलेटरपर्यंत कसे पोहोचले? तर यासाठी मी एक जुगाड शोधलेला. सीट वर माझ्यामागे 3 उशी घेऊन मी गाडी चालवायचो. वाहनांबद्दल इतकं आकर्षण होतं, की मला कोणी गाडी शिकवण्याची गरज पडली नाही. वडील जेव्हा गाडी चालवायचे तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्ट विचारुन घेतली. याचा काय उपयोग? यानं काय होतं? असेच कित्येक दिवस गेले. त्यानंतर मी स्वतः गाडी चालक्यला शिकलो. वडिलांसोबत कुठे बाहेर फिरायला जायचो तेव्हा पप्पा समोरुन बोलायचे तू चालव गाडी मी आहे. तेव्हा तर माझे लायसन्स पण नव्हते.
बारावी पास झाल्यानंतर लायसन्स काढुन मी पहिल्यांदा अलिबागला गेलो. मित्रांना विश्वास होता की हा चांगला गाडी चालवतो. म्हणून त्यांनी कोणी हातात गाडी घेतली नाही. त्यानंतर हळूहळू फिरायचा छंदच लागला. नवनवीन जागा शोधुन त्या एक्सप्लोअर करायला लागलो. यातच माझे राईड पार्टनर एक सचिन आणि दुसरा किंग म्हणजे रोहन. आम्ही तिघे रात्री अपरात्री राईडला निघायचो. कधी महाबळेश्वर तर कधी नाशिक, ठिकाण कुठलंही असो आम्ही किती तासांचा प्रवास? किती तासात पोहोचू याचा विचार कधीच केला नाही. असे करत आम्ही नाशिक, नगर, पुणे, सातारा, महाबळेश्वर अशी पर्यटन स्थळे पायदळी तुडवली. आमच्या तिघांचेही प्लॅन पण अचानाक-भयानक असायचे. कारण सोमवार ते शनिवार ऑफीस ते घर असं शेडुल होतं. त्यातून वेळ काढून शुक्रवारी रात्रीच बाईक राईडला निघायचो. मग शनिवार रविवार हे दोन दिवस फिरुन रविवारी संध्याकाळपर्यंत घरी यायचं. असेच करुन दिवसेंदिवस राईडचे दिवस वाढत चालले होते. कारण बाईक प्रेमी झाल्यावरच कळते बाईक चालवायची मजा काय असते.
अन् घरी Himalayan आली माझी पहिली बाईक Honda CBR होती ती मी 2014 ते 2017 पर्यंत चालवली. पण, विकायचं कारण असे की 2017 मध्ये ऑगस्ट महिन्यात भरपावसात माझा आयुष्यातला पहिला अपघात झाला. त्यातून मी थोडक्यात वाचलो. नाही म्हणायला थोडीफार दुखापत झाली. बाईकचंही इतकं काही नुकसान झालं नव्हतं. त्या वेळेस पप्पा बोलले की ही बाईक विक आपण दुसरी घेऊ. पण, मी नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात पुन्हा अपघात झाला. त्यानंतर मात्र काही करुन ती बाईक विकली आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रॉयल इनफिल्डची Himalayan बाईक घेतली.
आयुष्यभराचा धडा मिळाला.. Himalayan आल्यानंतर पुन्हा एकदा बाईक रायडींग मोठ्या जोमाने सुरू झालं. जानेवारी 2018 ला 3 दिवसांच्या राईड वर गेलो. पहिले सुरत रस्त्यावर एक लेकसाईड सीन करायचा होता. पण, त्याच दिवशी तिथुन निघाल्या वर कल्याण वाडा रोडला अचानक बाईक बंद पडली. बाईक बंद पडल्याचे कारण समजू शकलो नाही. माझ्या नशीबाने जवळच गॅरेज मिळालं. बाईक तपासून मेकॅनिकने बॅटरी चार्ज नसल्याचं सांगितलं. त्याने 1 तासात चार्ज करुन दिली. तिथून निघाल्यावर कल्याण शिळफाटा पार केल्यानंतर पनवेलला पुन्हा बंद पडली. कसंबसं गॅरेज शोधून त्याला दाखवलं तर त्याने बॅटरी गेल्याचं सांगितलं. नवीन बॅटरी टाकून मी महाबळेश्वरच्या रस्त्याला निघालो. दिवसाची वेळ होती, थोडं पुढे गेल्यानंतर तळेगावजवळ परत बाईक बंद पडली. आता माझा संयम सुटत चालला होता. दरवेळी गॅरेज शोधणे, बाईक ढकलत नेणे माझ्या जीवावर आलं होतं. पण, काय करणार? दुसरा पर्याय नव्हता. या गॅरेजवाल्याने सांगितले तुम्हाला गाडी चालू करुन देतो. पण, तुम्ही हॉर्न आणि लाईट लावू नका, बाईक परत बंद पडेल. आता तर माझे इंडीकेटर लागले. कारण, सूर्य मावळतीला गेला होता.
थांबलो तरी बाईक चालूच ठेवायचो.. संध्याकाळच्या 7:30 वाजता पुण्यातून बिनालाईट आणि हॉर्न शिवाय महाबळेश्वरला निघालो. दुसऱ्या गाड्यांच्या उजेडाचा मला सहारा घ्यावा लागत होता. अशात समोरुन गाडी आल्यावर तर काहीच दिसत नव्हतं. अंदाजानेच गाडी चालवावी लागायची. मी अशा परिस्थितीत अडकलो होतो की धड मागे जाता येईन की पुढे. गाडीचा वेगही कमी होता. आम्हाला तिथं पोहचायला रात्रीचे 11:30 वाजले. आमचा मित्र परीवार आधीच पुढे गेला होता. मग, त्यांना माझी अवस्था काय झाली हे सांगितलं. त्यानंतर पुढील 3 दिवस आम्ही फोरव्हिलरनेच फिरलो. मुंबईला येताना मी आणि माझी मैत्रिण आम्ही सोबत निघालो. परतीच्या प्रवासात माहाबळेश्वर वरुन निघाल्यावर वाईला पेट्रोल भरले. आम्ही जिथे कुठे चहा घेण्यासाठी थांबायचो तेव्हा बाईक चालूच ठेवायचो. हॉर्न आणि लाईटचा उपयोग करायचा नाही, असा क्षण माझ्या आयुष्यात पहिल्यादाच घडला. त्यावेळेस देवाचे नाव घेत मुंबई गाठली. तेव्हा कुठे जीवात जीव आला. मुंबईला येताना आम्हाला रात्र झाली होती. आम्ही 3 दिवस फिरुन आलो, पण हॉर्न आणि लाईटचा वापर केलाच नाही.
त्यानंतर तशी चूक कधीच केली नाही त्या घटनेनंतर कधीही बाईक राईडसाठी निघाण्याआगोदर बाईक पूर्णपणे चेक करुन निघायला लागलो. थोड्याच दिवसात मी माझा स्वतःचा बाईक राईड क्लब सुरू केला. 3 फेब्रुवारी 2019 ला GEAR GODS नावाच्या क्लबची स्थापना झाली. या क्लबच्या माध्यमातून नवीन लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. दर महिन्यात 1 दिवस किंवा 2 दिवसाच्या राईडला घेऊन जायला लागलो. हे करत असताना लोकांनी मला HIMALAYAN BABA म्हणून हाक मारायला सुरुवात केली. मलाही ते नाव आवडलं, मीही ते स्वीकारलं. आता मला HIMALAYANBABA याच नावानं ओळखतात. माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रवासाचं श्रेय मी माझ्या पप्पाना देतो. कारण, त्यांनी विश्वास ठेवला म्हणून तर मी प्रवास करायला शिकलो. - अनिष गणपत कांबळे, बाईक रायडर, मुंबई (Insta ID - himalayanbaba_1991) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.