मी जेव्हा आमच्या हनिमून ट्रिपबद्दल सांगते, तेव्हा लोक डोक्याला हात लावून एकच वाक्य बोलतात. अशी कुठं हनिमून ट्रिप असते का? आणि जेव्हा लव्ह स्टोरी विषयी बोलते तेव्हा डोक्याला लावलेला हात माझ्यासमोर जोडतात. कारण, दोन्ही ठिकाणी आम्ही सामान्य समज मोडले आहेत. तुमचाही गोंधळ होतोय ना? काळजी करू नका, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगते. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. ही गोष्ट 2009 सालातील आहे. तेव्हा मी 16 वर्षांची असेल. रस्त्याच्या कडेने जात असताना माझ्या शेजारुन भर्रकन एक मोटारसायलक गेली. मी एकदम दचकलेच. भरधाव जाणाऱ्या दुचारीकीस्वाराकडे पाहताना माझ्या मनात एक प्रश्न आला की मुली का गाडी चालवत नाही? त्याकाळी महिला बाईक चालवत नव्हत्या असं नाही. पण, त्याचं प्रमाण फार कमी होतं. अनेक दिवस झाले, पण हा प्रश्न काही माझी पाठ सोडायला तयार नव्हता. तेव्हाच मी बाईक चालवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसात जिद्दीने मोटारसायकल चालवायला शिकले. मी बाईक चालवायला शिकले खरं पण त्यानंतर लोकांचे टोमणे, टिप्पणी ऐकायला मिळायला लागली. माझ्या पालकांनी मला बाईक चालवण्याची परवानगीच दिलीच कशी? इथपर्यंत काहींनी प्रश्न विचारले. पण, माझ्या आई-वडिलांचा माझ्यावर विश्वास होता. त्यांनी मला नेहमीच सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य दिलं.
लोकं झोपायचे तेव्हा माझा सराव सुरू व्हायचा.. सुरुवातीला माझा भाऊ मला मोटरसायकल चालवायला शिकवत होता. कधी-कधी तो कामावरून रात्री उशिरा घरी यायचा. तोपर्यंत मी जागीच राहायचे. कधी एकदा बाईक घरी येतेय आणि मी शिकतेय असं मला व्हायचं. त्यामुळे लोकांच्या झोपेच्या वेळी माझा बाईक चालवण्याचा सराव होत असे. आमचा वॉचमन मला क्लच आणि बाईक संतुलित करायला शिकवायचा. हळूहळू मला त्याची सवय झाली. आता मी एकटीच आत्मविश्वासाने बाईक चालवायला शिकले. त्यानंतर मला स्वतःची बाईक घेण्याचे वेध लागले. माझ्या आई-वडिलांनाही मोटारसायकल घेण्यासाठी पटवून दिले.
स्वप्नांवर पाणी फेरले.. सर्व काही ठीक चालले होते. पण एके दिवशी माझ्या भावाचा बाईक अपघात झाला. यात त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. तेव्हापासून आम्ही मोटरसायकलबद्दल चर्चा करणे बंद केले. पण, बाईक घेण्याचा माझा विचार मात्र मी सोडला नव्हता. मला मिळणाऱ्या पॉकेटमनीतून मी चिकाटीने पैसे वाचवू लागले. मी ज्याची वाट पाहत होते तो दिवस अखेर उजाडला. 3 वर्षांनंतर माझ्या आईने निर्णय घेतला की ती मला बाईक घेईल. मोटारसायकल निवडण्यासाठी मी शोरूमला भेट दिली तो दिवस मला अजूनही आठवतो. माझ्या पालकांच्या खिशाला जड जाऊ नये म्हणून मी बाईकची किंमत पाहून निवड केली. मी माझ्यासाठी स्वस्त आणि चांगला पर्याय निवडला. त्यावेळी मी बजाज कंपनीची 150 CC ची पल्सर घेतली. माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान होता. ते अभिमानाने माझ्या मागे बसायचे. माझ्या आयुष्यातील मोटारसायकलचा अध्याय अशा प्रकारे सुरू झाला.
अन् मी प्रेमात पडले मी माझ्या वडिलांना सांगितले की मला माझ्या मोटरसायकलवरून दमणला 150 किमी जायचे आहे. त्यांनी होकार दिला. पण, जाताना काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, आपले केस असे बांध की कोणाला कळू नये की हेल्मेटच्या आत मुलगी आहे की मुलगा. आईवडिलांच्या समर्थनाने माझा आत्मविश्वास वाढला होता. मोठ्या हायवेवर मोटारसायकल चालवणे माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. या प्रवासात मी पहिल्यांदाच मनमोहक दृश्ये, शांत ढग आणि मंत्रमुग्ध करणारा सूर्यास्त अनुभवला. मला त्यादिवशी जाणवलं की मी बाईक चालवण्याच्या प्रेमात पडले आहे. आता मी हिच्याशिवाय राहू शकत नाही.
कोकणचा निसर्ग मुसळधार पावसात ही माझी पहिली मोटारसायकल राईड होती. सर्वांनी मला घरी राहण्याचा सल्ला दिला. पण, मला माहित होते की मी खूप सुंदर काहीतरी गमावणार आहे. त्यामुळे सर्वांचा विरोध पत्करुन मी कशेडी घाटातून कोकणात आले. कोकणासारखे सुंदर मी कधीच पाहिले नाही. पावसाळ्यात निसर्गाचे रंग बदलताना पाहून माझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त झाल्याचे समाधान मिळाले. माझ्या दृष्टीकोनातून कोकणच्या सौंदर्याला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. चंडिकादेवी मंदिर, गोपाळगड किल्ला, गणपतीपुळे मंदिर, जयगडची जेटी, दाभोळची जेटी, डोंगर आणि समुद्रकिनाऱ्यांमधले रस्ते, आरे वारे बीचचे 180 डिग्रीचे दृश्य, सर्व काही माझ्या मनात खोलवर रुजले आहे. या सहलीने मला चिकाटी, संयम आणि कधीही हार न मानण्याची शिकवण दिली. मला जाणवले की हीच वेळ आहे लांब टूर सुरू करण्याची.
दक्षिण भारत मोटरसायकल टूर संस्कृतीतील विविधतेचा अनुभव घेण्यासाठी 4 राज्यांतून 10 दिवसांचा दौरा आम्ही आखला. आम्ही दोन टप्प्यात कन्याकुमारीला पोहचणार होतो. पहिल्या दिवशी उत्साह खूप चांगला होता. त्यामुळे मुंबई ते चित्रदुर्ग हे 800 किमी अंतर आम्ही एका दिवसात पूर्ण केलं, हे माझं पहिलं यश होतं. आता दुसऱ्या टप्प्यात आम्हाला पुन्हा 800 किमी गाठायचं होतं. मात्र, कालच्या प्रवासाने थकल्याने उठायला उशीर झाला. एका हायवे ढाब्यावर स्वादिष्ट दक्षिण भारतीय नाश्ता करून आम्ही सकाळी 10.30 ला सुरुवात केली. एका दिवसात 800 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी आम्हाला निघायला उशीर झाला होता. सुरुवातीला आम्हाला वाटले की आम्ही अर्धेच अंतर पार करू आणि मध्येच कुठेतरी विश्रांती घेऊ. पण रामेश्वरमला पोहोचण्याचा उत्साह इतका जास्त होता की अंधार पडूनही आम्ही गाडी हाकत राहिलो. आम्ही रामेश्वरमला जाण्यासाठी पंबन ब्रिज ओलांडला तेव्हा मध्यरात्रीचे 1.30 वाजले होते. शेवटचे 25 किमी खूप महत्वाचे होते. कारण मला बाईक चालवताना डोळ्यांवर खूप झोप आली होती. अशा परिस्थितीत देखील आम्ही आमचं लक्ष्य गाठल्याचा आनंद आम्हाला जास्त होत होता. आनंदाच्या भरातच आम्ही श्रीलंकेतील शेवटचे बेट शोधण्याच्या दिशेने निघालो. धनुषकोडीला गेलो. दोन्ही बाजूंनी समुद्र असलेले कधीही न संपणारे सरळ रस्ते ही आमच्यासाठी खूप मोठी भेट होती. आमची सगळी मेहनत फळाला आली होती. समुद्रात सूर्यास्त होण्यापूर्वी आम्ही पंबन पुलावर पोहोचण्यासाठी वेग वाढवला. रामेश्वरम-पंबन ब्रिजमधील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एकावरून सूर्यास्त पाहताना लाटांचा आवाज आणि केशरी गुलाबी आकाशामुळे स्वर्ग पृथ्वीवर आल्याचा भास निर्माण झाला. दक्षिण भारतातील प्रवासादरम्यानचा हा आमच्या सर्वोत्तम अनुभवांपैकी एक होता.
आधी बाईकच्या प्रेमात, मग त्याच्या.. नंतर मी माझ्या मोटरसायकलवरून इंडिया फॉरेस्ट फेस्टिव्हलला गेले होते. बाइकर म्हणून एखाद्या कार्यक्रमात जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मला नवीन लोकांना भेटायला, बोलायला खूप आवडतं. यामुळे माझ्या या कार्यक्रमात खूप मित्र तयार झाले. त्यातला एक प्रसाद बोरकर. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही आयुष्याचा जोडीदार शोधत नसता तेव्हा तुम्हाला असा जोडीदार मिळतो जो फक्त तुमच्यासाठी बनला आहे. आणि मी प्रसादला भेटले. आमची मैत्री वाढली, एकत्र बाईकवर राईड करू लागलो. या प्रवासात आम्हाला जाणवले की आमच्यात अनेक गोष्टींत साम्य आहे. अगदी खाण्यापासून मोटरसायकलच्या प्रेमापर्यंत. आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचं प्रेम पाहून घरच्यांनीही लगेच होकार दिला. आणि 3 जानेवारी 2021 पासून बाईकवरुन सुरू झालेला आमचा प्रवास आता अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्यासाठी सुरू झाला.
अशी कुठं हनिमून ट्रिप असते का? आम्ही ज्यावेळी आमच्या हनिमून ट्रीपबद्दल कोणाला सांगतो, त्यावेळी समोरचा डोक्याला हात लावून एकच वाक्य बोलतो. अशी कुठं हनिमून ट्रिप असते का? लोकं हनिमूनसाठी देशापासून विदेशापर्यंत फ्लाईट, ट्रेन, बस, खाजगी कार इत्यादी वाहनांनी जातात. आम्ही मात्र बाईकवरुन हनिमून ट्रिपला गेलो होतो. तेही दोन वेगवेगळ्या बाईक्स. आता बोला! आम्ही आमच्या मोटरसायकल गुवाहटीमध्ये आणल्या. प्रसाद त्याच्या रॉयल एनफिल्डवर तर माझ्याकडे KTM ड्यूक 390 होती. आम्ही थोडे उशिरा उठलो आणि हॉटेलमधून सकाळी 9.30 च्या सुमारास निघालो. शहर नुकतेच जागे होत होते. हायवेची सुरुवात मेघालय आणि आसामच्या सीमेवरून जाते. चहूबाजूंनी लांबलचक झाडे आणि निसर्गावर स्वार झाल्याचा अनुभव येतो. पुढे सरळ रस्ते आणि आजूबाजूला काहीच पाहायला नसल्याने महामार्ग थोडे कंटाळवाणे वाटले. आम्ही नाश्त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर थांबायचे ठरवलं. गरम फुलके आणि भाजी ही एक मेजवानी होती. जसजसे आम्ही ठिकाणे ओलांडत गेलो तसतसे हवामान बदलत राहिले.
आम्हाला 50 मीटरवरीलही दिसत नव्हतं अरुणाचल प्रदेशात बाईक चालवणे आव्हानात्मक होते. कारण, भूस्खलनामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तीन दिवसांच्या राईडने आमची राइड तवांगच्या दिशेने सुरू झाली. तवांग त्याच्या अस्पर्शित सौंदर्यासाठी ओळखले जाते. आम्हाला आमच्या हनिमूनला ते अनुभवायचे होतं. सर्वात कठीण भाग म्हणजे सेला पास पार करणे. जानेवारी महिना होता, जेव्हा बर्फवृष्टी खूप होते. आम्ही अत्यंत प्रतिकूल हवामानातही हार न मानण्याचा निर्णय घेतला. तवांग गाठण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला आव्हान देत राहिलो. आल्हाददायक वातावरणात आम्ही दिरांगमधून बाईक चालवली. पण जसजसे सेला खिंडीजवळ पोहोचलो तसतसे हवामान खराब झाले. हिमवर्षाव सुरू झाल्याने दृश्यमानता खूपच कमी झाली होती. आम्हाला 50 मीटरवर पाहणेही अवघड झाले. बर्फामुळे बाईक अधूनमधून स्लिप होऊ लागल्या. आम्ही आमच्या ब्लूटूथ हेडफोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात होतो. आम्ही थांबून आमच्या मागील टायरला नायलॉनच्या दोऱ्या बांधण्याचं ठरवलं. एवढ्या उंचीवर दम लागणे साहजिक आहे, आम्ही एकमेकांना बुस्ट करत होतो. पुन्हा खडतर प्रवास सुरू झाला.
हनिमूनवरुन परतल्यानंतर आमच्या बेडरुमच्या दरवाजावर आम्ही भारताचा नकाशा लावला.. आम्ही सेला खिंडीत वर पोहोचलो आणि लक्षात आलं की सैन्य दलाने (BRO) वाहतूक थांबवली आहे. आमच्या अंगात थर्मल, शर्ट आणि जॅकेट असूनही थंडी जाणवत होती. आम्ही आमच्यासोबत गरम पॅक देखील ठेवले होते. आम्हाला वाटले की आम्ही पुन्हा सुरुवात करू. पण, हवामानाची स्थिती बिघडली आणि सैन्याने रहदारीला पायथ्यावरील गावात परत जाण्यास सांगितले. बर्फवृष्टीमुळे आमचे कपडे ओले झाले होते, थंड पाय आणि हाताने आम्ही निराश होऊन पायथ्याकडे परत आलो. आम्ही तवांगला कसे गेलो असतो या शक्यतांची कल्पना करत राहिलो. पण, म्हणतात ना निसर्गासमोर आपण कुणीच नाही. तवांगला पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल आणि वर्षाच्या हंगामात परत येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. अशी आमची हनिमून राईड होती, साहसांनी भरलेली, पर्वतांमधली चाय डेट आणि खूप आठवणी जपणारी. आम्ही मुंबईला परत आलो. तेव्हा आवर्जून बेडरूमच्या दारावर भारताचा रोडमॅप चिकटवला. प्रसाद बोरकर यांच्यासारखा नवरा मला लाभला हे माझं भाग्य समजते. संपूर्ण भारतभर मोटरसायकल चालवण्याचं आमचं स्वप्न आहे. हा नकाशा याचीच आठवण आम्हाला करुन देत असतो.
त्या दिवशी माझ्या बाईक रायडींगचा मला जास्त अभिमान वाटला एके दिवशी मी माझ्या बाईक वर बसलेली असताना माझ्या जवळून जात असलेल्या एका लहान मुलीने तिच्या बाबांना म्हटलं.. बाबा, बाबा.. मी तिच्यासारखं होईन आणि बाईक चालवायला शिकेन. तिच्या बाबांनाही या गोष्टीच कौतुक वाटलं असावं. त्यांनीही हो, बाळा.. म्हणत तिला टाळी दिली. हा प्रसंग मला बाईक चालवण्यासाठी प्रेरणा देतो. अजूनही बाईक चालवणे हे पुरुषाच काम समजलं जातं. माझ्यामुळे अनेक मुली, महिलांना प्रेरणा मिळतेय ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या घटनेनंतर मी महिलांना बाईक चालवायला शिकवू लागले. दर रविवारी माझ्या पल्सर वर मी त्यांना दुचाकी चालवायला शिकवू लागले. त्यांच्यात कर्तृत्वाची भावना दिसते तेव्हा आपल्या कामाचं समाधान वाटतं. माझ्या या कामाचा गौरव म्हणून शिवम हाउसिंग सोसायटीने माझा सत्कार केला. तेव्हा माझे पालक आनंदाने भारावून गेले होते. माझे आई-वडील अंजली दळवी आणि नरेश दळवी हे माझे आधारस्तंभ आहेत. माझ्या संपूर्ण प्रवासात ते मला साथ देत असतात. - रसिका दळवी-बोरकर, बाईक रायडर. तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.