आतापर्यंत आपण एका लग्नाची दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, वेगळी गोष्ट अशा अनेक कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. ही देखील एका लग्नाचीच गोष्ट आहे. पण, जरा वेगळी. वऱ्हाड जेव्हा कांदिवलीहून अंधेरीकडे विवाहस्थळी येत होतं. तेव्हा रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष त्यांच्याकडे गेल्यावाचून राहत नव्हते. वधु-वराला पाहून प्रत्येकजण थबकून जात होता. कारणही तसच होतं. आतापर्यंत त्यांनीही असं वऱ्हाड कधी पाहिलं नसेल. मी अंकिता कारेकर उर्फ डिंपी, पेशाने एक ग्राफिक डिझायनर पण मला खरी ओळख मिळाली ती बाईक रायडिंग या माझ्या आवडीमुळे. मी मूळची बोरिवलीची, आई-बाबा, मोठी बहीण आणि मी अशी आमची छोटी आणि आनंदी कुटुंबं. मला बाईक रायडींगचं तुफान वेड आहे. हा माझा श्वास आहे, म्हटलं तरी चालेल. आता श्वास चालू ठेवायचं म्हटलं तर आयुष्याचा जोडीदारही तसाच हवा ना? योगायोगानंही घडलंही तसच. आयुष्याचा जोडीदार… 2018 साली आमची एका राईड दरम्यान भेट झाली. दोघंही बाईकप्रेमी. त्यामुळे मैत्री व्हायला दुसरं कारण लागलं नाही. त्यानंतर अनेक राईडदरम्यान भेटत गेलो. मैत्री वाढत होती. 2019 मध्ये मुंबईवरुन स्पिती लेह ते पुन्हा मुंबई असा 24 दिवसांचा प्रवास झाला. एकूण 24 दिवसांच्या या राईड मध्ये मी एकूण 8 राज्यांमधून जवळपास 7000 किलोमीटर बाईक चालवली. मला माझ्या मित्रांनी बऱ्याच लोकांसारखी बाईक ट्रेन मधून दिल्लीपर्यंत नेण्याचा सल्ला दिला होता. पण, माझा हट्ट होता की मला पूर्ण राईड बाईकवरूनच करायची आहे आणि मी ती तशीच केली. ही राईड खूप खडतर होती. यात माझ्या मित्राने म्हणजे आताच्या नवऱ्याने खूप चांगली साथ दिली. आम्ही ऐकमेकांची खूप चांगली काळजी घेतली. जर आम्ही आयुष्यभर सोबत राहिलो तर हा प्रवास आणखी भन्नाट होईल याची जाणावी आम्हाला यावेळी झाली. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
म्हणून वऱ्हाड बाईक वर.. आमची ओळख बाईकमुळेच झाली, बाईकच्या प्रवासातच आमचं प्रेम बहरलं. आमच्या नात्याला बाईकनेच आकार दिला. म्हणून आता प्रत्येक शुभकार्यात आम्हाला आमच्या बाईकची उपस्थिती महत्त्वाची वाटते. याच कारणामुळे आमचं लग्न दुसऱ्या मजल्यावर असूनही लग्नमंडपात आमच्या बाईक उपस्थित होत्या. विशेष म्हणजे वऱ्हाड देखील बाईक वरुनच विवाहस्थळी पोहचलं.
बाईकवरुनच का? लग्नमंडपात प्रवेश करताना नवरी मुलगी घोड्यापासून बाईकपर्यंत अनेक साधनांवर बसून आलेली तुम्ही पाहिली असेल. मात्र, यात एक गोष्ट समान असते. ती म्हणजे मुलगी नेहमी नवरदेवाच्या मागे बसलेली असते. दुसरं असं की मला अनेकांनी विचारलं होतं, काय मग एन्ट्री बाईकवरुन का? त्यात तर प्रश्नचं नव्हता. पण, कधी पाठवणीला नवरी मुलगी स्वतः बाईकवरुन जातानाची कदाचित मी पहिलीच असेल. आणि पाहिलंही असेल तर नवरी पाठीमागे बसलेली दिसेल. वर लिहल्याप्रमाणे माझी बाईक मला माझ्या सोबतच हवी होती. कुटुंबाला आश्चर्याचा धक्का जेव्हा आम्ही आमच्या स्वतःच्या बाईकवरुन घरी येणार असा विचार कुटुबियांसमोर मांडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. आम्हाला एकच प्रश्न आला, नवरी मुलगी अशी बाईकवरुन घरी कशी येणार? जर ती बाईकवर मागे बसून जाऊ शकते तर स्वतः बाईक चालवत घरी का येऊ शकत नाही? आमच्या या उत्तराने घरच्यांचं समाधान झालं. त्यानंतर आम्हाला आनंदाने परवानगी मिळाली.
नियमांचं पालन.. अनेकदा आनंदाच्या भरात आपण नियमांचं उल्लघन करत असल्याचं जाणवत नाही. इथं मात्र, आम्ही याची जाणीवपूर्वक काळजी घेतली. आम्ही वऱ्हाडातील सर्व बाईक रायडर्सने सुरक्षा उपरकरणे वापरली होती. कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियम मोडले नाहीत. सर्व बाईक रायडर्सना हेल्मेट अनिवार्य होतं. आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होईल, अशी गोष्ट घडू दिली नाही. पण, जेव्हा आम्ही कांदिवलीहून अंधेरीला जात होतो, तेव्हा सर्वजण आमच्याकडे आकर्षित होत होते. अनेकांनी तर मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. आमचा लग्नसोहळा 24 एप्रिल 2022 रोजी नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत कांदिवली येथील ग्रोवेल्स 101 मॉलमध्ये उत्साहात पार पडला.
सामाजिक बदल सामान्यापणे आपल्याकडे नवरी मुलगी लग्न करुन सासरी जाताना नवरदेवासोबतच्या वाहनात किंवा त्याच्या पाठीमागे बसून जाते. पण, आजची मुलगी स्वतंत्र आणि आधुनिक विचारांची आहे, असं मला वाटतं. तिला मागे बसण्यापेक्षा सोबत चालायला जास्त आवडतं. हा संदेश लोकापर्यंत पोहचावा हाच उद्देश या पाठीमागे होता. - मी अंकिता कारेकर उर्फ डिंपी, बाईक रायडर प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.