रोतांग पासचा अवघड टप्पा, स्तितीची नागमोडी वळणं, हिमालयातली खडतर पण रोमांचक ठिकाणं किंवा गुळगुळीत राष्ट्रीय महामार्ग मलाही आता खुणावतायत. बुलेट शिकल्यापासून अजून तरी मी कुठे लांब राईडला गेले नाहीये. हिंमत होत नाही म्हणा किंवा अजून योग आला नाही म्हणा. पण एक मात्र नक्की बुलेटमुळे नव्याने आनंद गवसला. ज्या वयात महिला दुचाकीवर मागे बसायला घाबरतात. त्या वयात मी बुलेट शिकण्याचं धाडस केलं, पूर्ण हात सोलवटून निघाल्याच्या खुणा पाहिल्या की हे प्रकर्षानं जाणवतं. पण तो दिवस आणि रोज मी बुलेट चालवण्याचा आजचा दिवस यात जसं किलोमीटरमध्ये अंतर कापलंय तसंच मी मानसिकपण बरंच अंतर कापलंय. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील हा तिसरा भाग. एखादी छोटीशी गोष्टही आपलं जगणं समृद्ध करु शकते, आपल्या आत्मविश्वासात कमालीची भर घालू शकते असा अनुभव मला आला. ठरवून 38व्या वर्षी दुचाकी, बुलेट शिकले असं काही झालं नाही. कॉलेजवयात कधीतरी मनात येऊन गेलं होतं की बुलेट चालवून पाहू. पण ते स्वप्न त्याच काळात मागे पडलं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या रेसमध्ये मी उडी घेतली. मुंबईत राहायला येणं, दुचाकी किंवा बुलेट शिकण्याचं निमित्त ठरलं. ऑफिसला जाण्यासाठी टॅक्सी कशाला म्हणून घरी विषय झाला एक दुचाकी घेऊन टाकू आणि ऍक्टिव्हा घरी आली. तीची डिलीव्हरी आली तेव्हा तीही चालवायला येत नव्हती पण हट्टानं प्रयत्न करुन एका आठवड्यात ती शिकले आणि ऑफिसला नेऊ लागले. आता मात्र माझं ते जुनं, कॉलेजवयातलं स्वप्न पुन्हा मनात रुंजी घालू लागलं होतं. घरासमोरच्या इमारतीच्या छोट्याशा मोकळ्या जागेत रोज रात्री पल्सर शिकायला सुरूवात केली. आधी वजन पेलता येणे, बाईक बॅलन्स करणे, गेअरचा अंदाज येणे यात एक-दोन दिवस गेले. ती मोकळी जागा तशी अरुंदच होती, त्या जागेत रोज गोल-गोल 4-5 चकरा मी मारायचे. तिसऱ्याच दिवशी बाईक मोकळ्या जागेतून बाहेर काढली आणि गल्लीत चालवायला लागले. सुरुवातीला यु टर्न घेताना बाईकवरुन उतरायचं-गाडी फिरवायची आणि पुन्हा बसुन फेरी मारायची असं करावं लागलं. आणि मग छोट्याश्या जागेतून यु टर्नही शिकले.
..अन् मेल्याहून मेल्यासारखं झालं जसजसं बाईक जमत होती, तसतसा आत्मविश्वास वाढत होता. आमच्या घराजवळच एक असा रस्ता आहे जिथे बाईक किंवा कार शिकायला येणाऱ्यांची वर्दळ असते. एकदा ऑफिसमधल्या माझ्या सहकाऱ्याला सोबत घेऊन मी पल्सरवरुन सरावासाठी तिथे गेले. बाईक चालवायला लागून 10 दिवस झाले होते, एकदाही पडले नव्हते. पण त्यादिवशी ‘आता काय येते मला बाईक’ या नादात गाडी टर्नला वळवली आणि बॅलन्स गेला. बाईक पडली.. मी तर पडलेच पण माझा सहकारीही पडला. सुदैवाने आम्हाला काही दुखापत झाली नाही. पण मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण निर्धाराने, लगेचच दुसऱ्या दिवशीपासुन मी पल्सर ऑफिसला ने-आण करु लागले. धडपडणे, गर्दीत सांभाळून बाईक चालवणे, किक मारताना अनेकदा पायाला लागणे, गेअर अडकणे हे सगळे प्रकार झाले. खूप टेन्शन यायचं सुरूवातीला. अखेर ‘ती’ आली आता वेळ होती घरी रॉयल एनफिल्ड घेण्याबाबत विषय काढण्याची. बुलेट महाग असल्याने, कशाला इतका खर्च या मुद्यावरुन थोडा वेळ लागला कन्व्हिन्स करायला पण अखेर रॉयल एनफिल्स 350सीसी (सँड स्ट्रॉम) बुक केली. RE घरी आल्यापासून आजपर्यंतचा दिवस स्वप्नवतच आहे. WHAT A FEELING…..किती-किती ऐकलं होतं राईड करणाऱ्यांकडून त्यातल्या काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवता आल्या तर काही गोष्टी खोट्या ठरल्या. बुलेट चालवताना काय सुख आहे हे शब्दात व्यक्तच करता येणार नाही.
‘सफर का आनंद लो’ एक वर्ष होत आलं आता… खूप दूरवर राईडला अजुन गेलेले नाही, पण मुंबईपासून 50-100 किमीच्या टप्प्यात खूप फिरुन आले. ‘सफर का आनंद लो’ हे वाक्य बुलेट राईड करणारा अनुभवू शकतो. बुलेट शिकत असताना आणि सध्या रोज चालवत असतानाही आजुबाजुच्यांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळतो ते बघून बरं वाटतं. अनेक बुलेट रायडर्सनी माझं कौतुक केलं, मला प्रोत्साहन दिलं की, चालव बिनधास्त.. मस्त फिरुन ये…, इमारतीतल्या सगळ्या तरुण बाईकर्सनीही आश्चर्य व्यक्त करतानाच खूप कौतुक केलं. काहींनी काळजी घे हेही आवर्जुन सांगितलं. ऑफिसला येताना येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक बाईकर्सनीही थंब दाखवून मेरा हौसला बढाया… इतकंच काय टॅक्सी ड्रायव्हर्सकडून तर माझ्याकडे कौतुकाने बघणे, मला बढियाँ बेटी म्हणणे असा प्रतिसाद होता. पंजाबी ड्रेस घालुन निघाले तर वळुन-वळुन बघतात गाडीचालक आणि बाईकवाले.. विस्मयाने, कौतुकाने… या मुंबईनं… हजारो स्वप्न घेऊन येणाऱ्यांपासून ते अगदी पोटाची खळगी भरायला येणाऱ्या गरीबापर्यंत अनेकांना खुल्या दिलानं स्विकारलं आहे तसंच मला माझ्या बुलेटसह खुल्या मनानं कौतुक करत स्विकारलं याचा आनंद आहे. - सुवर्णा जोशी, न्यूज अँकर तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.