मुंबई, 18 डिसेंबर : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही होत आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कौटुंबिक असो वा कार्यालयीन काम, सर्वत्र संपर्काचे ते सोपे माध्यम बनले आहे. त्याच्या मदतीने एखाद्याला मेसेज करणे, कॉल करणे आणि व्हिडिओ कॉल करणे सोपे झाले आहे. मात्र, अनेक लोक फसवणूक करण्यासाठी याचा वापर करत आहेत. असाच एक प्रकार तुमची झोप उडवू शकतो.
व्हॉट्सअॅप मेसेजच्या मदतीने एखाद्याचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. कौटुंबिक असल्याचे भासवून फसवणूक करणारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची खाती रिकामी करत आहेत.
ऑस्ट्रेलियात गेल्या 3 महिन्यांत अशा गुन्ह्यांची संख्या 10 पटीने वाढली
द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, 'Hi Mum' नावाचा घोटाळा सध्या ऑस्ट्रेलियात चर्चेत आहे. या घोटाळ्यामुळे 2022 मध्ये ऑस्ट्रेलियातील शेकडो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे 57 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलिया कंझ्युमर अँड कॉम्पिटिशन कमिशन (ACCC) च्या मते, गेल्या 3 महिन्यांत घोटाळ्यांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत 10 पट वाढ झाली आहे.
वाचा - Tweet एडिट करता येणार; DP बदलला तरी ब्लू टिक गायब, Twitter मध्ये हे मोठे बदल
हाय मम घोटाळा काय आहे?
फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे पीडितांशी संपर्क साधला आणि नंतर कुटुंबातील सदस्य असल्याचे दाखवून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला. आपला फोन हरवला आहे किंवा खराब झाला आहे, असे सांगून फसवणूक करणारे व्हॉट्सअॅपवर कुटुंबातील सदस्य किंवा मित्र असल्याचे भासवतात. यानंतर, नवीन नंबरवर संपर्क साधून भावनिक संदेश लिहिण्याचा प्रयत्न करतात. पीडित व्यक्तीचा विश्वास जिंकल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी आपल्याला पैशांची गरज असल्याचे सांगितले. कोणतीही शहानिशा न करताच लोक पैसे ट्रान्सफर करतात आणि जाळ्यात अडकतात.
सध्या भारतात हाय मम घोटाळ्याची कोणतीही तक्रार नाही
मात्र, सध्या तरी भारतात हाय मम घोटाळ्याची अशी एकही तक्रार आलेली नाही. ही प्रकरणे ऑस्ट्रेलियात नोंदली गेली आहेत. मात्र, आपण आधीच सावध राहायला हवे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Whatsaap