Home /News /technology /

नैसर्गिक आपत्तीत कारचं नुकसान झालं तर विम्याचे पैसे कसे मिळतात?

नैसर्गिक आपत्तीत कारचं नुकसान झालं तर विम्याचे पैसे कसे मिळतात?

सध्या पावसाळ्याचा हंगाम (Monsoon Season) सुरू आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे झाडं, झाडाच्या फांद्या पडून, किंवा भूस्खलनामुळे, दरड कोसळल्यामुळे वाहनांवर (Vehicle) दगड-माती कोसळून त्यांचं नुकसान झाल्याच्या घटना घडतात.

मुंबई, 31 जुलै : सध्या पावसाळ्याचा हंगाम (Monsoon Season) सुरू आहे. या काळात अनेकदा जोरदार वारे, पुरामुळे मालमत्तेचं (Property) नुकसान झाल्याचं आपण पाहतो. या कालावधीत वादळी वाऱ्यामुळे झाडं, झाडाच्या फांद्या पडून, किंवा भूस्खलनामुळे, दरड कोसळल्यामुळे वाहनांवर (Vehicle) दगड-माती कोसळून त्यांचं नुकसान झाल्याच्या घटना घडतात. कोकणात, तसंच पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या पुरामध्येही बऱ्याच वाहनांचं नुकसान झालं आहे. वाहनांचं नुकसान झाल्यास आपल्याला सर्वांत पहिला आधार असतो तो विम्याचा. तुम्ही तुमच्या कारचा (Car) विमा (Insurance) काढला असेल, तर अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहनाचं नुकसान झाल्यावर विमा कंपनीकडून सगळी भरपाई मिळते, असा समज असतो; मात्र इन्शुरन्सचा कोणता प्रकार तुम्ही निवडला आहे, यावर नुकसानभरपाई मिळणार की नाही, हे अवलंबून असतं. नैसर्गिक आपत्तीत कारचं नुकसान झाल्यास विम्यासाठी क्लेम (Claim) आणि अन्य प्रक्रिया कशी करावी, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मोटार वाहन अधिनियमानुसार, प्रत्येक गाडीसाठी विमा असणं बंधनकारक आहे. यात थर्ड पार्टी इन्शुरन्सदेखील वैध ठरतो. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळायला हवी असेल, तर तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज असलेला इन्शुरन्स असण्याची आवश्यकता असते. तुमच्याकडे थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल आणि तुमच्या वाहनाचं नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं, तर त्याच्या भरपाईसाठी तुम्ही क्लेम करू शकत नाही. त्यामुळे यासंबंधीचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा (Comprehensive Policy) घेतला असेल आणि नैसर्गिक आपत्तीत वाहनाचं नुकसान झालं, तरच तुम्ही भरपाईसाठी क्लेम करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असेल तर पावसाळ्यात झाड पडल्यानं, भूस्खलन झाल्यानं वाहनाचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी तुम्ही क्लेम करू शकता. नैसर्गिक आपत्तीत वाहनाचं नुकसान झाल्यास तातडीने इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधावा. कंपनीने सांगितलेल्या नियमांचं पालन करावं. आपत्तीग्रस्त वाहनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणंही आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनीने मागितलेली कागदपत्रंही द्यावी लागतात. त्यानंतर तुम्ही नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका जास्त असलेल्या प्रदेशातल्या वाहन चालकांनी तरी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी काढणंच जास्त श्रेयस्कर आहे. कारण नैसर्गिक आपत्तीत वाहनाचं नुकसान झाल्यास भरपाईसाठी क्लेम करता येतो. अन्यथा पॉलिसी असूनही नुकसानाच्या वेळी काहीही उपयोग होत नाही.
First published:

Tags: Car, Insurance, Monsoon

पुढील बातम्या