पेड्डापल्ली, 12 जुलै : एखाद्या व्यक्तीला दृष्टी नसेल तर ती कोणत्या अडचणींचा सामना करते, याची डोळस व्यक्ती कल्पनाही नाही करू शकत. दृष्टिहीन लोकांची अडचण जाणून तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील 18 वर्षांच्या श्रीजानं एक इनोव्हेशन केलं आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या श्रीजानं ‘ब्लाइंड आय हेल्प स्टिक आणि कॅप’ नावाचं डिव्हाईस तयार केलं आहे. तिच्या या इनोव्हेशनला इन्स्पायर अवॉर्ड, इंटिंटा इनोव्हेशन स्पेशल अवॉर्ड, रिस्क स्पेशल अवॉर्ड आणि रॉयल बुक ऑफ रेकॉर्ड्स स्पेशल रिकग्निशन यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय, इंटरनॅशनल सायन्स फेअरसाठी देखील तिची निवड झाली आहे.
श्रीजानं तयार केलेली ब्लाइंड आय हेल्प स्टिक आणि कॅप सेन्सरच्या मदतीनं कार्य करतात. जेव्हा एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीच्या मार्गात अडथळा येतो तेव्हा ब्लाइंड आय हेल्प स्टिक त्या व्यक्तीला सावध करण्यासाठी आवाज करते. त्यामुळे संबंधित व्यक्ती आपल्या मार्गातील अडथळा टाळू शकते. मार्गातील अडथळ्यांची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे ती व्यक्ती आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी अधिक आत्मविश्वासानं चालते. श्रीजानं तयार केलेली कॅपदेखील अशाच प्रकारे कार्य करते. एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीच्या मार्गात अडथळा आल्यास कॅपमध्ये बसवलेला सेन्सर तो अडथळा ओळखतो आणि आवाज करून त्या व्यक्तीला पूर्वसूचना देतो. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या श्रीजाचे वडील प्रकाश हे कापड्यांचा व्यवसाय करतात आणि तिची आई सुजाता कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी शिवणकाम करते. श्रीजाला लहानपणापासून नवनवीन गोष्टी शोधण्यात जास्त रस होता. मुलीतील हा गुण हेरून तिच्या पालकांनी तिला ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीची देखील पर्वा केली नाही. श्रीजाचे पालक आपल्या मुलीच्या कामगिरीमुळे आनंदी आहेत. “आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान वाटतो. आम्ही श्रीजाला तिच्या भविष्यातील प्रकल्पांमध्येही प्रोत्साहन देऊ”, असं तिचे पालक प्रकाश आणि सुजाता म्हणाले. आपल्या देशात मुलांना प्राथमिक शाळेपासूनच विज्ञानाचे धडे दिले जातात. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा आणि त्यांनी संशोधनकार्यात उत्स्फूर्तपणे योगदान द्यावं, हा त्या मागचा उद्देश आहे. श्रीजासारखे अनेक विद्यार्थी विज्ञानाची कास करून नवनवीन संशोधन करत आहेत. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनांमध्ये त्यांनी केलेलं संशोधन बघायला मिळतं. या विद्यार्थ्यांचं संशोधन बघितल्यानंतर शिक्षणाचा उद्देश साध्य झाल्यासारखं वाटतं