Home /News /technology /

तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? या सोप्या ट्रिक वापरून तपासा

तुमच्या हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना? या सोप्या ट्रिक वापरून तपासा

हॉटेलच्या रूममध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक हालचाली टिपण्यासाठी छुपा कॅमेरा (Hidden Camera) बसविण्याचा प्रकार समोर आल्याचे आपण पाहतो. कसं चेक करायला अनोळखी ठिकाणी राहायला गेल्यावर कॅमेरा आहे की नाही

मुंबई, 5 जुलै : अनेकदा कामासाठी किंवा पर्यटनाच्या निमित्ताने आपल्याला देशा-परदेशात प्रवास करावा लागतो. अशावेळी राहण्याकरिता आपण हॉटेलचा (Hotel) पर्याय निवडतो. परंतु, अनेकदा हॉटेलच्या रूममध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक हालचाली टिपण्यासाठी छुपा कॅमेरा (Hidden Camera) बसविण्याचा प्रकार समोर आल्याचे आपण पाहतो. अशावेळी नक्कीच आपल्या मनात असुरक्षितता निर्माण होते. आपण ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत, तेथील रूममध्ये असा काही प्रकार नाही ना? असा प्रश्न देखील मनात उपस्थित होतो. मात्र, हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा बसवलाय की नाही, हे पडताळून पाहण्यासाठी काही ट्रिक्स (Tricks) आहेत. जाणून घेऊया त्याविषयी... जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये थांबतो तेव्हा तेथील रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना अशी भीती आपल्या मनात निर्माण होते. हॉटेलच्या रूम्समध्ये छुपा कॅमेरा लावून व्हिडीओ तयार केल्याच्या घटना अनेकदा आपल्याला बातम्यांमधून समजतात. त्यामुळे कोणत्याही हॉटेलमध्ये चेक इन करण्यापूर्वी तेथील रूम्स मध्ये छुपे कॅमेरे लावले नाहीत ना, हे तपासणं महत्वाचं आहे. हे तपासल्यानंतरच तेथे खासगी आणि अमूल्य वेळ तुम्ही घालवू शकता. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेथील रूम्समध्ये छुपे कॅमेरे नाहीत ना, हे तपासण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटं खर्च करावे लागतील. त्यानंतर सोप्या ट्रिक्स च्या मदतीने तुम्ही याबाबत शहानिशा करू शकता. लाईट बंद करुन पहा रूममध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम रुममधील सर्व दिवे (Lights) बंद करा आणि रुममध्ये सर्वत्र अंधार आहे ना याची खात्री करा. सामान्य नजरेने रूममधील कॅमेरा आपण पाहू शकत नाही. परंतु, कॅमेरात पाहिल्यानंतर त्याच्या काचेवर पडणाऱ्या प्रकाशामुळे आपल्याला कॅमेरा असल्याची खात्री पटू शकते. त्यानंतर ज्या ठिकाणी संशय येतो त्या सर्व ठिकाणांची पाहाणी करावी. यामुळे कॅमेराला तुम्ही कैद करु शकाल. तपासणी आवश्यक हॉटेलच्या रूम मध्ये छुपा कॅमेरा नाही ना, हे तपासण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वस्तूंमध्ये कॅमेरा लपवला जाण्याची शक्यता आहे, अशा सर्व वस्तुंची बारकाईने तपासणी करा. रूममधील ज्या सामानावर तुम्हाला संशय आहे, असे सामान बाजूला ठेवा किंवा झाकून ठेवा. नंतर तुम्ही हॉटेलमधील कर्मचाऱ्याला बोलावून असे संशयित सामान रूमबाहेर घेऊन जायला सांगू शकता. हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करताच सेटटॉप बॉक्स, करनेट पाईप, नाईट लॅम्प, स्कायलाइट, गेट हॅण्डल, फ्लॉवरपॉट, टेबल वरील वस्तू, घड्याळ, स्मोक डिटेक्टर, एसीचे पॉवर अॅडप्टर, अलार्म सेंन्सर, टेलिफोन या वस्तू बारकाईने तपासून घ्या. त्याचबरोबर बाथरुममधील काचा, टुथब्रश बोल्डर, खिडक्या, टॉवेल बार, नळ आदी गोष्टींची बारकाईने तपासणी करा. फ्लॅश लाईटचा (Flash Light) वापर करा जर तुम्ही रूममधील कोणत्याही काचेवर फ्लॅश लाईट मारला तर त्याचे रिफ्लेक्शन पडतात. यामुळे देखील कॅमेरा विषयी माहिती मिळू शकते. यासाठी रूममधील सर्व लाईटस बंद करुन तुम्ही फ्लॅश लाईटची मदत घेऊ शकता. तसेच अनेक रूम्समध्ये एक ब्लिंक होणारा किंवा सतत चमकत राहणारा दिवा असतो. लाईट बंद करुन हा चमकणारा दिवा कशाचा आहे, याचा शोध तुम्ही घेऊ शकता किंवा ब्लिंक होणाऱ्या दिव्याच्या ठिकाणी तपास करु शकता. ब्लूटुथ (Bluetooth) किंवा वायफायची (Wi-Fi) घ्या मदत सध्याच्या वापरात असलेल्या बहुतांश कॅमेरांमध्ये ब्लूटुथ किंवा वायफायचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही ब्लूटुथ किंवा वायफाय सुरु करुन देखील छुप्या कॅमेराबाबत माहिती मिळवू शकता. अशावेळी काही गडबड वाटल्यास सावध व्हा. तसेच या व्यतिरिक्त कोणालाही फोन लावून आवाज चेक करा. कारण काही वेळा एखादे आणखी डिव्हाईस त्या भागात असेल तर एक वेगळा आवाज ऐकायला मिळतो. यातून छुप्या कॅमेराचा शोध लागू शकतो. अॅप्लिकेशनची (Application) मदत घेऊ शकता सध्या यासाठी अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. यामुळे तुमच्या आसपास असलेल्या अन्य डिव्हाईसची माहिती तुम्हाला मिळू शकते. इंटरनेटवरुन तुम्ही छुपा कॅमेरा शोधणारी अॅप्लिकेशन डाऊनलोड करु शकता.
First published:

Tags: Camera

पुढील बातम्या