मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! आता स्मार्टफोनवरच समजणार मातीचं आरोग्य

शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! आता स्मार्टफोनवरच समजणार मातीचं आरोग्य

जमिनीचं आरोग्य तपासणं सोपं.

जमिनीचं आरोग्य तपासणं सोपं.

माती परीक्षणासाठी शेतकऱ्यांना आता लॅबमध्ये जाण्याची गरज नाही.

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : देशाने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली असली तरी आजही देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे. मात्र कृषीक्षेत्रात आजही अनेक समस्या असून, शेतकरी (Farmers) या समस्यांना तोंड देत शेती करत आहेत. शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (Technology) वापर वाढावा, यासाठी सरकारसह संशोधन संस्था पुढाकार घेताना दिसतात. भरघोस पीक उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य (Soil health) चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. या अनुषंगाने माती परीक्षणावर (Soil Testing) शेतकऱ्यांनी भर द्यावा, याकरिता सरकार मोहिम राबवत असते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक शेतकऱ्यास माती परीक्षण आणि पर्यायाने जमिनीच्या आरोग्याविषयीची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. लवकरच स्मार्टफोनवरच मातीचं आरोग्य समजणार आहे.

जमिनीचं आरोग्य तपासण्यासाठी स्मार्टफोनचा कॅमेरा कसा उपयुक्त ठरू शकतो, याविषयी संशोधन केलं जात आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने  डाऊनटूअर्थच्या अहवालाचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार  संशोधकांच्या पथकाने इमेजवर आधारित मातीतील सेंद्रिय घटकांच्या मूल्यांकनाचे म्हणजेच इमेज बेस्ड सॉइल ऑरगॅनिक मॅटरचे (SOM) महत्त्वपूर्ण वर्णन केलं आहे. जमिनीच्या सुपीकतेचे मूल्यांकन करण्यासाठी हे वर्णन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संशोधकांद्वारे विकसित करण्यात येत असलेले हे मोबाईल अॅप (Mobile App) लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून, यामुळे मातीतील सेंद्रिय घटक आणि जमीन सुपीकतेच्या स्थितीचे तातडीने अनुमान लावता येणार आहे.

पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत स्मार्टफोनवरील अशा प्रकारचे प्रतिमा किंवा इमेज (Image) विश्लेषण फायदेशीर आहे. कारण पारंपारिक पद्धतींना मर्यादा आहेत, तसंच त्याचे परिणाम हे मर्यादित आहेत. लॅबमध्ये परीक्षणासाठी महागडी उपकरणं गरजेची असतात. तसंच मातीच्या नमुन्यांचा संग्रह आणि त्याच्या हाताळणीकरिता अधिक परिश्रम घ्यावे लागतात, त्याचप्रमाणे यासाठी वेळदेखील अधिक खर्च होतो. या तुलनेत एका स्मार्टफोन इमेजच्या माध्यमातून एसओएमची तातडीने तपासणी किंवा मूल्यांकन करणं सोपं आहे.

हे वाचा -  Aadhaar कार्ड सोबत ठेवण्याचं टेन्शन नाही, फोनमध्ये डाउनलोड करा mAadhaar

आफ्रिकन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॉन्ट न्युट्रिशनचे डॉ. कौशिक मुजुमदार यांनी सांगितलं, की एसओएम डेटा मिळवण्याचा एक सोपा मार्ग असून त्याचा वापर पीक उत्पादक क्षेत्रांमधील अचूक डेटावर आधारित शेती पुढे नेण्यासाठीची संधी म्हणून होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी पोषण व्यवस्थापन आणि त्यासंबंधी निर्णय घेण्याची सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होती.

या संशोधनासाठी भारतातील पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) अभ्यास करण्यात आला. यात राज्यातील तीन कृषी हवामानविभागातील मातींचे नमुने अभ्यासले गेले. मातीच्या रंगातील (Soil Color) फरकांचे विश्लेषण करून एसओएम स्थिती मोजण्यासाठी प्रगत मॉडेलचा वापर करण्यात आला. हे तंत्र मातीचा पोषक स्तर, मातीची गुणवत्ता आणि तिच्या आरोग्याशी संबंधित अन्य वैशिष्ठे निर्धारित करते.

संशोधकांनी एक नवी पद्धत त्यानंतर विकसित केली. त्यात इमेजमध्ये दिसणारी माती आणि अन्य घटकांचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीत सुधारणा केली गेली. एसओएम हे तंत्र मातीतील घटकांविषयी योग्य अंदाज बांधण्यात सक्षम ठरले आहे. मशीन लर्निंगव्दारे (ML) संशोधकांनी या मॉडेलला जाणूनबुजून आव्हान देत त्रुटी ओळखण्याचं आणि त्या सुधारून अचूकता राखण्याबाबत प्रशिक्षित केलं आहे.

हे वाचा - इथं 580 रुपये किलो मिळतंय ‘बचपन का प्यार’; खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांग

मातीची छायाचित्रे घेऊन त्याबाबतच्या सविस्तर शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी हे एक पाऊल असून, याचे रुपांतर उद्योग क्षेत्रात होण्यासाठी अधिक संशोधन व्हावे, असे मत संशोधक व्यक्त करत आहेत. या पुढील टप्प्यात मॉडेलच्या माध्यमातून माती नमुना छायाचित्रांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यास प्रारंभ केला जाईल. कारण जमिनीतील मातीचा प्रकार, पोत, ओलावा आणि परिस्थितीचा परिणाम अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी असे एमएल मॉडेल विकसित केले जाऊ शकते.

First published:

Tags: Farmer, Mobile app, Technology