Home /News /technology /

Mobile Apps मुळे खरंच डास पळून जातात? जाणून घ्या सत्य

Mobile Apps मुळे खरंच डास पळून जातात? जाणून घ्या सत्य

सध्या काही मोबाइल अ‍ॅप्सही डासांना पळवून लावण्याचा दावा करत आहेत. खरोखरच मोबाइलवरच्या अ‍ॅपमुळे (Mosquito Killer Apps) डास जातात का, याबाबत जाणून घेऊ या.

मुंबई, 4 ऑगस्ट : सध्या सगळीकडे ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काहीशा विचित्र अशा वातावरणामुळे डासांचा कहरही वाढला आहे. अचानक ऊन, मधूनच पाऊस असं वातावरण आहे. या वातावरणात डासही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. डासांना पळवून लावण्यासाठी काही ना काही उपाय अवलंबले जात आहेत. डास पळवण्यासाठी उदबत्ती किंवा डासांना पळवून लावणारा गंध हवेत सोडणारी विजेवरची उपकरणं आदींचा वापर केला जात आहे. सध्या काही मोबाइल अ‍ॅप्सही डासांना पळवून लावण्याचा दावा करत आहेत. खरोखरच मोबाइलवरच्या अ‍ॅपमुळे (Mosquito Killer Apps) डास जातात का, याबाबत जाणून घेऊ या. तंत्रज्ञानाच्या मदतीनं काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. आता डासांपासून सुटका करण्यासाठीही पारंपरिक उपायांसोबत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे. गुगल प्ले स्टोरअर (Google Play Store) किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर डासांना पळवून लावण्यासाठी काही अ‍ॅप्स असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक युझर्स ती अ‍ॅप्स डाउनलोड करतात; मात्र खरोखरच त्यामुळे डास जातात का याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता सत्य समोर आलं. हे अ‍ॅप ऑन केल्यावर डास जवळही फिरकणार नाहीत, असा दावा डेव्हलपर करतात. जवळपास सगळी अ‍ॅप्स एकसारख्या पद्धतीनेच काम करतात. या अ‍ॅप्समध्ये लो फ्रिक्वेंसी साउंड (Low Frequency Sound) वापरला जातो. त्यामुळे डास दूर पळतात. अ‍ॅपमध्ये जाऊन लो अल्ट्रासॉनिक साउंड (Ultrasonic Sound) असा पर्याय यूजर निवडू शकतात. हा आवाज खूपच कमी असतो. त्यामुळे माणसांना त्याचा काहीही त्रास होत नाही, असा या कंपन्यांचा दावा आहे. याची सत्यता तपासली असता अशा प्रकारे अ‍ॅप वापरून डास दूर जात नसल्याचं समोर आलं. ते वापरून पाहणाऱ्याकडून काही सकारात्मक उत्तर आलं नाही. उलट अ‍ॅपच्या आवाजाबाबत त्यांनी तक्रार केली. या अ‍ॅप्सवर खूप जास्त जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे अ‍ॅप सुरू केल्यावर लगेचच थोड्या वेळात जाहिरातींनी यूजर त्रस्त होतो. ग्राहकांना जाहिराती दाखवणं हाच अशा अ‍ॅप्सचा मुख्य उद्देश असतो. यामुळे अ‍ॅप विकसित करणाऱ्यांना फायदा होतो. अशी अ‍ॅप्स बनावट असू शकतात. त्यातून मोबाइलमध्ये एखादा व्हायरस जाऊन खासगी माहिती बाहेर जाऊ शकते. यूजरनी अशा प्रकारे कोणत्याही अ‍ॅपची माहिती न घेता ते मोबाइलमध्ये डाउनलोड करू नये. यामुळे मोबाइलवरची महत्त्वाची माहिती लीक होऊ शकते. डासांना घालविण्यासाठी कोणत्याही अ‍ॅपचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय व दुकानात उपलब्ध साधनांचा वापर ग्राहकांनी करावा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
First published:

पुढील बातम्या