अनेक कारचालक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात त्यामुळे अपघात होतात त्यात अनेक जण जीवही गमावतात. गेल्या काही काळात समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती हलगर्जीपणामुळेच कार अपघातात दगावल्या आहेत. परिणामी, वाहन आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रस्ते-वाहतूक नियमांनुसार गाडी चालवताना सीट बेल्ट वापरणं अत्यावश्यक आहे. पण तरीही लोकं ऐकत नाहीत. यासाठी केंद्र सरकारने काही नियम सक्तीचे केलेत. ज्याचा थेट परिणाम कारच्या किंमतींवर होणार आहे. यांचा एकमेकांशी काय आणि कसा संबंध आहे हे जाणून घेऊयात. पुढच्या वर्षीपासून कार्सच्या किंमतीत वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय, ‘पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून प्रवासी वाहनांच्या एम1 कॅटगरीत सहा एअरबॅग्ज असणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.’ केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरूवातीलाच एक अध्यादेश काढला होता. त्यानुसार सहा एअरबॅग्जचा नियम याच वर्षीच्या ऑक्टोबरपासून लागू होणार होता. परंतु, यामुळे कार्सच्या निर्मितीमूल्यावर ताण येईल असं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतर्फे सांगितलं गेलं. यासाठीच नियमाचा फेरविचार व्हावा, असं निवेदन देण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यासंदर्भात ट्विट केलंय. ‘ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसमोरच्या ग्लोबल सप्लाय चेनच्या अडचणी आणि त्यांचा परिणाम याचा विचार करून प्रवासी गाड्यांना सहा एअरबॅग्ज बंधनकारक असण्याच्या नियमाची अंमलबजावणी पुढच्या ऑक्टोबरपासून करण्याचा निर्णय घेतलाय,’ असं ट्विटमध्ये म्हटलंय. अध्यादेशानुसार एम 1 कॅटेगरीतील (8 सीटर गाड्या) वाहनांसाठी किमान सहा एअरबॅग्ज असणं अनिवार्य आहे. या नियमाचा परिणाम बजेट आणि मिड रेंज्ड वाहनांवर होईल. या वाहनांमध्ये मागील प्रवाशांसाठी एअरबॅग्ज नसतात. पण या नियमांच्या अंमलबजावणीनंतर प्रवाशांच्या सुरक्षेत वाढच होईल. सध्या प्रवासी वाहनांसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य आहेतच. पण अतिरिक्त चार एअरबॅग्ज बसवण्याची सरासरी किंमत 8000-10000 रुपये होईल. प्रत्येक एअरबॅगची किंमत 1800-2000 रुपयांपर्यंत असते. याशिवाय कार कंपन्यांना वाहनांच्या मॉडिफिकेशनवरही खर्च करावा लागेल. परिणामी, वाहनांच्या किंमतीत 30,000 रुपयांनी वाढ होईल. मागील महिन्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना महराष्ट्रातील पालघरनजीक घडली. या दुर्घटनेनंतर सरकारने रिअर म्हणजे कारमधील मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींनाही सीट बेल्टचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. ‘रोड सेफ्टी वाढवण्यासाठी लोकांनी आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मागच्या सीटवर बसलेल्यांना सीट बेल्टची गरज नाही. ही एक मोठी समस्या आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही सीटवर बसणार्यांनी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. मी चार मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांतून प्रवास केलाय. मी फ्रंट सीटवर होतो,तेव्हा माझ्या लक्षात आलं, की एक क्लिप आहे ज्यामुळे बेल्ट न लावल्यास अलार्म वाजत नाही. मी अशा प्रकारच्या क्लिपवर बंदी आणली आहे. या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी रस्ते-वाहतूक मंत्रालय अभिनेते, क्रिकेटर्स आणि मीडियाची मदत घेत आहोत,’ अशी प्रतिक्रिया गडकरींनी मिस्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.