मुंबई 05 नोव्हेंबर : साधारणपणे एखाद्या व्यक्तीनं दुसरी कंपनी खरेदी केली तर ती व्यक्ती आपल्या सोयीसाठी नवीन कंपनीत एखादा दुसरा बदल करते. हे बदल करताना कंपनीचे ग्राहक आणि कर्मचारी नाराज होणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाते. कारण, कंपनीशी संबंधित हे दोन घटक नाराज झाले तर याचा थेट परिणाम कंपनीच्या भविष्यावर होऊ शकतो. मात्र, ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे नवीन सर्वेसर्वा एलॉन मस्क याला अपवाद ठरत आहेत. गेल्या आठवड्यात एलॉन मस्क यांनी ट्विटरची प्रदीर्घ काळापासून रखडलेली पर्चेसिंग डील पूर्ण केली.
कंपनीचा कारभार हाती येताच मस्क यांनी कशाचीही पर्वा न करता कंपनीत विविध बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. मस्क यांनी सात दिवसांच्या कार्यकाळात सात मोठे बदल केले आहेत. रॉयटर्स या न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी कर्मचारी कपात, पेड ब्लू टिक, कंटेट काउन्सिलची निर्मिती, जाहिराती आणि होमपेजशीसंबंधित बदल केले आहेत. ‘लाइव्ह मिंट’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ट्विरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील आपल्या सात दिवसांच्या कार्यकाळात पुढील सात बदल केले आहेत.
1) ब्लू टिकसाठी 8 डॉलर्स: ट्विटर आता युजर्सच्या अकाउंटला ब्लू टिक देण्यासाठी आठ डॉलर्स इतकं शुल्क आकारणार आहे. या पेड सबस्क्रिप्शन मध्ये युजर्सला ब्लू टिक व्हेरिफिकेशन, प्रत्युत्तरांमध्ये व्हेरिफिकेशन प्रायॉरिटी, मेन्शन्स आणि सर्च या सुविधा दिल्या जातील. या शिवाय, युजर्स मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ साईटवर पोस्ट करू शकतील. ज्यांना पेड सबस्क्रिप्शन घेणं परवडेल अशा युजर्सना शुल्क आकारण्याच्या आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मस्क यांनी अनेक ट्विट पोस्ट केले आहेत. या सबस्क्रिप्शन शुल्कामुळे कंटेट क्रिएटर्सना रिवॉर्ड्स देण्यासाठी पैसा उभे राहतील, असा मस्क यांना विश्वास आहे. पैसे उभे करण्यासाठी कंपनीला जाहिरातदारांवर अवलंबून राहावं लागणार नाही.
2) कर्मचारी कपात: एलॉन मस्क यांनी कंपनीचा पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल, कायदेशीर व्यवहार आणि पॉलिसी चीफ विजया गड्डे यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना काढून टाकलं. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी कंपनीतील सुमारे अर्धे कर्मचारी म्हणजेच सुमारे तीन हजार 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे.
शुक्रवारी, कंपनीनं आपल्या 50 टक्के कर्मचार्यांना कामावरून काढून टाकलं. ट्विटरचे बॉस एलॉन मस्क यांनी कंपनीतील या कर्मचारी कपातीचं समर्थन केलं. ते म्हणाले, "अनेक जाहिरातदारांनी माघार घेतल्यानं कंपनीच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसत आहे. या शिवाय, कर्मचाऱ्यांच्या विविध अॅक्टिव्हिटीजमुळे अमेरिकेत भाषणस्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.
एलन मस्कने Twitter बोर्डवरील सर्व डायरेक्टर्स हटवले, स्वतःच्या हाती घेतली सूत्रे
3) कंटेंट मॉडरेशन: एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, कंपनी विविध दृष्टिकोनांशी संबंधित कंटेंट नियंत्रित करण्यासाठी एक परिषद स्थापन करेल. हे कंटेंट मॉडरेशन काउन्सिल कंटेंटशी संबंधित सर्व विषयांसाठी मुख्य जबाबदार असेल. या काउन्सिलच्या परवानगीशिवाय कोणतंही अकाउंट पुनर्स्थापित केलं जाणार नाही. कंपनीची सुरक्षा आणि अखंडतेची जबाबदारी असलेले मस्क म्हणाले की, कंपनीकडे कंटेंट मॉडरेशनची क्षमता कायम आहे. कंपनीचे सेफ्टी आणि इंटिग्रिटी हेड योएल रूथ यांनीही याबाबत एक ट्विट करून युजर्स आणि जाहिरातदारांना आश्वस्त केलं आहे.
4) जाहिरातदार: कॉर्पोरेट जाहिरातदारांच्या एका मोठ्या समूहानं ट्विटरला रामराम ठोकला आहे. जनरल मोटर्स, जनरल मिल्स, ऑडी ऑफ अमेरिका, ओरिओ निर्माता माँडेलेझ इंटरनॅशनल, फायझर इंक आणि फोर्ड अशा मोठ्या नावांचा यामध्ये समावेश आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरला सर्वांत प्रतिष्ठित जाहिरात प्लॅटफॉर्म बनवण्याचा आपला मानस असल्याचं ट्विट मस्क यांनी जाहिरातदारांना उद्देशून केलं होतं. अनेक जाहिरातदारांनी ट्विटरवरील जाहिराती काढून घेतल्या आहेत. मस्क यांनी गेल्या आठवड्यात कंपनीचा ताबा घेतल्यानंतर आणि कंटेंट मॉडरेशनसह इतर अनेक बदल केले. त्यामुळे ट्विटरवर जाहिरात खर्च चालू ठेवायचा की नाही हे ठरवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढत आहे.
5) होमपेज: ‘द व्हर्ज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरच्या होमपेजला भेट देणाऱ्या लॉग-आउट युजर्सना एक्सप्लोर पेजकडे पुनर्निर्देशित केलं जावं, अशी सोय करण्याची योजना मस्क यांनी केली आहे. एक्सप्लोर पेजवर ट्रेंडिंग ट्विट आणि बातम्या दिसतात.
6) पे पर व्ह्यु: ‘द वॉशिंग्टन पोस्ट’नं दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क ट्विटर युजर्सना पेवॉलच्या मागे व्हिडिओ कंटेंट पोस्ट करण्याची परवानगी देण्याचा पर्याय शोधत आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ट्विटर सध्या अशा एका व्हिडिओ फीचरवर काम करत आहे जे वापरून युजर्सना व्हिडिओ पोस्ट करता येईल. हा व्हिडिओ बघण्यासाठी इतर युजर्सना शुल्क आकारलं जाईल.
7) वाईन रिबूट: ट्विटरवर वाईन रिबूट (Vine Reboot) परत आणायचं का? याबाबत मस्क यांनी एक पोल म्हणजेच एक कलचाचणी घेतली आहे. या पोलमध्ये सहभागी झालेल्या सुमारे पाच दशलक्ष युजर्सपैकी 70 टक्के लोकांनी वाईन रिबूटसाठी होकार दिला आहे. त्यानंतर, मस्क यांनी ट्विटर अभियंत्यांना वाईन रिबूटवर काम करण्यास सांगितलं आहे. Axiosनं दिलेल्या वृत्तानुसार हे काम वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. युजर्सला सहा-सेकंदाची लूपिंग व्हिडिओ क्लिप कॅप्चर आणि शेअर करता यावी यासाठी वाईन डिझाइन केलं गेलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.