Home /News /sport /

'भारतात बोलावून कोकेन दिलं, फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केलं', क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

'भारतात बोलावून कोकेन दिलं, फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केलं', क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

भारतामध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगच्या प्रकरणाने (Spot Fixing) डोकं वर काढलं आहे. झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेन्डन टेलर (Brendon Taylor) याने खळबळजनक आरोप केले आहेत.

    मुंबई, 24 जानेवारी : भारतामध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगच्या प्रकरणाने (Spot Fixing) डोकं वर काढलं आहे. झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेन्डन टेलर (Brendon Taylor) याने खळबळजनक आरोप केले आहेत. भारतात बोलावून आपल्याला कोकेन देण्यात आलं, याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं. यानंतर आपल्याला स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, असा दावा ब्रेण्डन टेलरने केला आहे. याबाबतचं सविस्तर ट्वीट टेलरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेयर केलं आहे. आयसीसी (ICC) लवकरच माझ्यावर कारवाई करणार असल्याचंही टेलर म्हणाला. काय म्हणाला टेलर? 'ऑक्टोबर 2019 साली भारतीय उद्योगपतीने मला स्पॉन्सरशीप आणि झिम्बाब्वेमध्ये T20 स्पर्धा लॉन्च करण्यावर चर्चेसाठी बोलावलं. भारतात प्रवासासाठी मला 15 हजार अमेरिकन डॉलर दिले जातील, असंही सांगितलं गेलं. मी या ऑफरला नकार देऊ शकत नव्हतो, पण मनात भीती होतीच. 6 महिने मला झिम्बाब्वे क्रिकेटकडून पैसे मिळाले नव्हते. तसंच भविष्यात झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल का नाही, हेदेखील माहिती नव्हतं, त्यामुळे मी भारतात प्रवास करण्याचं ठरवलं.' 'भारतात पोहोचल्यानंतर चर्चा झाली, यानंतर उद्योगपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मला रात्री जेवणासाठी नेलं. जेवणामध्ये आम्ही मद्यपान केलं आणि तेव्हाच त्यांनी मला कोकेन ऑफर केलं. तेदेखील तिकडे कोकेनचं सेवन करत होते. मीदेखील मूर्खपणा केला आणि कोकेनचं सेवन केलं.' 'दुसऱ्या दिवशी सकाळी तीच माणसं माझ्या हॉटेल रूमवर आली आणि रात्री कोकेन घेतल्याचा व्हिडिओ त्यांनी मला दाखवला. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग केलं नाही, तर हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी मला दिली. मला भीती वाटत होती, कारण 6 जण माझ्या हॉटेल रूमवर आले होते. मला माझ्या जीवाची काळजी होती.' 'मला 15 हजार अमेरिकन डॉलर देण्यात आले, तसंच हे डिपॉझिट आहे. उरलेले 20 हजार डॉलर स्पॉट फिक्सिंग केल्यावर पूर्ण होईल, असं त्यांनी मला सांगितलं. तिकडून सुटण्यासाठी मी पैसे घेतले आणि विमानाने भारत सोडला. त्यावेळी मला पैसे घ्यावे लागले, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिकडून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग होता.' 'घरी परतल्यानंतर या घटनेचा माझ्यावर प्रचंड मानसिक आणि शारिरिक ताण आला. त्या उद्योगपतीला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा हवा होता. हे प्रकरण आयसीसीला मी 4 महिन्यांनी सांगितलं. हा काळ जास्त आहे हे मला माहिती आहे, पण मला स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित करायचं होतं. घडलेला सगळा प्रकार मी आयसीसीला सांगितला. मी कधीच कोणत्याही प्रकारचं मॅच फिक्सिंग केलेलं नाही. आयसीसी माझ्यावर काही वर्षांची बंदी घालणार आहे. मी या कारवाईचा स्वीकार करतो. तसंच भविष्यात इतर खेळाडूंच्या बाबतीत असं काही झालं तर त्यांनी लगेच आयसीसीकडे याची तक्रार करावी,' असं टेलर त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Zimbabwe

    पुढील बातम्या