नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2021 (T-20 World Cup) स्पर्धेत भारत अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. संपूर्ण स्पर्धेतच टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब होती. नंतर या पराभवामागच्या अनेक कारणांवर चर्चा झाली. टीममध्ये कोणत्या खेळाडूंची कमतरता प्रामुख्याने जाणवली यावरही चर्चा झाली. त्यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) नसल्याचं त्याच्या फॅन्सना तर जाणवलंच, पण खुद्द त्यालाही याबद्दल अत्यंत वाईट वाटलं. याबद्दला त्याने आपले मत व्यक्त केले आहे.
खरं तर आयपीएलमध्ये (IPL) धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या युजवेंद्रचा समावेश टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये केला गेला नाही तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता. युजवेंद्रला कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) ट्रम्प कार्ड मानलं जाते पण या स्पर्धेत मात्र त्याला निवडलं गेलं नाही. सिलेक्टर्सच्या या हट्टामुळे टीम इंडियाचे एकामागोमाग एक लाजिरवाणे पराभव झाले अशी टीका झाली. आता या सगळ्यावर युजवेंद्रनं स्वत:चं मौन सोडलं आहे.
“गेल्या चार वर्षांमध्ये टीममधून एकदाही मला वगळण्यात आलं नव्हतं. पण आता मात्र एकदम इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मॅचेसपासून मला दूर ठेवण्यात आलं. अर्थातच मला खूप वाईट वाटलं. दोन-तीन दिवस मी एकदम डाऊन होतो. मला काहीच सुचत नव्हतं; पण लवकरच आयपीएलची दुसरी लीगही येणार हेही मला माहिती होतं. मी माझ्या कोचकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा कोली. तसंच माझी पत्नी आणि कुटुंबानं मला सतत हिंमत दिली. माझे फॅन्स सतत माझ्यासोबत होते. मी माझ्या ताकदीवर परत येईन आणि या सगळ्या ताणातून बाहेर पडेन असा विश्वास मला होता. माझ्या आयपीएलमधल्या फॉर्मवर परिणाम झाला असता. त्यामुळे असं जास्त काळ निराश होणं मला परवडण्यासारखं नव्हतं, ” असं युजवेंद्रनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
टी-20मध्ये भारत हा सुपरपॉवर मानला जातो. या वेळच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये यूएईच्या पीचवर वरुण चक्रवर्तीच्या स्पिनची जादू चालली नाही. रविचंद्रन अश्विनही टीमला मदत करू शकला नाही. राहुल चहरला तर संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि युजवेंद्रला तर संधीच मिळाली नाही. गेल्या चार वर्षांत एकदाही ड्रॉप न मिळालेल्या, चांगलं खेळणाऱ्या खेळाडूला फक्त स्वत:च्या हट्टापायी टीममधून वगळलं तर त्याचे परिणाम काय होतात हे आता सिलेक्टर्सना चांगलंच समजलं असेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या लीगमध्ये युजवेंद्रची कामगिरी अत्यंत सरस झाली होती. त्यानं 8 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमला प्ले ऑफपर्यंत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला टीमबाहेर ठेवल्यानंतर आता पुन्हा युजवेंद्रचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार असलेल्या तीन मॅचच्या टी-20 सीरिजसाठी त्याची निवड झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या टी-20 टीमचा कॅप्टन असेल, तर कोच म्हणून राहुल द्रविडची (Rahul Dravid) कारकीर्दही या सीरिजपासून सुरू होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Yuzvendra Chahal