हरियाणा, 4 मार्च : माजी क्रिकेटपटू युवराजसिंग, टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ बबिता जी, बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी यांच्याविरुद्ध हरियाणातील हिस्सारमधील हांसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, या प्रकरणाला दोन वर्षे उलटूनही अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. हिस्सारमधील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेक सिंघल यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. कारवाईमध्ये दिरंगाई का होत आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पोलीस यंत्रणांकडे मागितलं आहे. तक्रारदार रजत कलसन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हिस्सार विशेष न्यायालयानं पंचकुलामधील गुन्हे विभागाच्या पोलीस अधीक्षकांना 5 मे रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच अद्याप आरोपपत्र दाखल न करण्याचं कारणही स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. त्या पूर्वी, तक्रारदार वकील रजत कलसन यांनी विशेष न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, एससी-एसटी कायद्यांतर्गत तिन्ही सेलिब्रिटींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तपास करण्याची कमाल मुदत दोन महिन्यांची असते. सध्याच्या प्रकरणांमध्ये मात्र, दोन वर्षं उलटून गेली आहेत तरी अद्याप आरोपपत्रं दाखल करण्यात आलेली नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दिला संदर्भ सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांचा संदर्भ देत तक्रारदारानं न्यायालयाला सांगितलं की, विशेष न्यायालय तपास यंत्रणेला नोंदवलेल्या प्रकरणांचा प्रामाणिकपणे तपास करण्यास सांगू शकते. न्यायालय तपासावर लक्षही ठेवू शकते. इतकेच नाही तर या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचनाही न्यायालय तपास यंत्रणेला देऊ शकते. शेन वॉर्नच्या आठवणीत सचिन झाला भावुक, शेअर केला खास फोटो जामिनावर आहेत तिन्ही सेलिब्रिटी वकील कलसन यांनी युवराज सिंग, मुनमुन दत्ता आणि युविका चौधरी यांच्या विरोधात एससी-एसटी कायद्याअंतर्गत हांसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ज्याचा या पूर्वी हांसी पोलिसांनी तपास केला होता. मुनमुन दत्तानं एफआयआर रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती. यानंतर युवराज सिंगनं एफआयआर रद्द करण्यासाठी केलेली याचिकाही पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार तिन्ही सेलिब्रिटी सध्या अंतरिम जामिनावर आहेत. या प्रकरणाचा तपास हांसी पोलिसांकडून काढून घेऊन राज्य गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर ही तिन्ही प्रकरणांचा तपास रखडलेला आहे.