नवी दिल्ली, 26 जून : मागील पाच महिन्यांपासून दिल्ली येथील जंतरमंतरवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे सुरु असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत या संबंधित माहिती दिली आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ब्रिजभूषण सिंह यांनी देखील एका न्यूज चॅनलशी आंदोलन मागे घेण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिला कुस्तीपटूंनी कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत कुस्तीपटूंनी दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन करत होते. या आंदोलनात ऑलंपिक पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सहित अनेक कुस्तीपटूंचा सहभाग होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रविवारी रात्री ट्विट करत म्हंटले, " कुस्तीपटूंची 7 जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत 15 जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहिल. कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची 11 जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असेही साक्षी मलिकने ट्विटमध्ये म्हंटले.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 25, 2023
कुस्तीपटूंनी त्यांचे रस्त्यावरील आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी एका न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हंटले, “हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी मला कोणतीही टिप्पणी आता करायची नाही. न्यायालय याप्रकरणी योग्य काम करेल”.