कुरुक्षेत्र, 2 जून : कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा देशभर तापत आहे. या आंदोलनात आता शेतकरी संघटनेनेही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणात शुक्रवारी पंचायतीची पुन्हा एकदा बैठक झाली. दरम्यान, कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या खापमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना 9 जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा करत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर ब्रिजभूषण यांना अटक झाली नाही तर आम्ही खेळाडूंना पुन्हा जंतरमंतरवर आणून सोडू, असं राकेश टिकैत म्हणाले. काय घडलं खाप पंचायतीत? राकेश टिकैत म्हणाले की, ब्रिजभूषण यांना 9 जूनपर्यंत अटक झाली नाही, तर त्यानंतर देशभरात आंदोलन छेडले जाईल. तत्पूर्वी शुक्रवारी, हरियाणातील कुरुक्षेत्र येथील जाट धर्मशाळेत कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खापांची सर्व-जातीय सर्व खाप महापंचायत झाली. या महापंचायतीत खाप पैलवानांच्या समर्थनार्थ मोठा निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात होते. सोनीपतच्या राठधाना गावात झालेल्या सरोहा खापच्या 12 गावांच्या पंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. या खापमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बृजभूषण शरण सिंहवर गंभीर आरोप असल्याचे सरोहा खाप यांचे म्हणणे आहे. त्यांना लवकर अटक करून मुलींना लवकर न्याय देण्याची त्यांनी मागणी केली आहे. वाचा - Pritam Munde : कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन प्रीतम मुंडेंचा सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या ‘हे खेदजनक..’ जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल या घटनेची दखल आता थेट सर्वोच्च कुस्ती महासंघाने घेतली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने मंगळवारी राजधानी दिल्लीत आंदोलनादरम्यान कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. 45 दिवसात निवडणुका न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनावर लक्ष ठेवून असल्याचे UWW ने सांगितले. “अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यूडब्ल्यूडब्ल्यूने सांगितले की, “गेल्या काही दिवसातील घडामोडी अधिक चिंताजनक आहेत. कारण आंदोलनामुळे कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. त्यांच्या आंदोलनाचे ठिकाणही रिकामे करण्यात आले. पैलवानांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. याशिवाय तपासाचे निकाल अद्याप न आल्याने त्यांनी निराशाही व्यक्त केली. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची विनंती करतो.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.