मुंबई, 13 फेब्रुवारी : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई येथे ही लिलाव प्रक्रिया पारपडत असून यात भारताची क्रिकेटर रेणुका सिंह हिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केलं. रेणुका सिंहला खरेदी करण्यासाठी महिला प्रीमिअर लीग मध्ये समाविष्ट असलेल्या पाचही संघांमध्ये चुरस होती. परंतु अखेर रेणुकाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या गोटात घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये पाच फ्रँचाइजी आहेत. यामध्ये अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, बंगलोर आणि दिल्लीच्या संघांचा समावेश आहे. गुजरात जायंट्स, युपी वॉरिअर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावे आहेत. बीसीसीआयने पाच संघांना किमान 15 खेळाडू घेण्याचं आणि किमान खर्च 9 कोटी रुपये असायला हवा असं सांगितलं आहे. तर सर्व संघांकडे 12 कोटी रुपये असतील. यामध्ये ते फक्त 6 परदेशी खेळाडू घेऊ शकतात. लिलावात 409 खेळाडूंवर बोली लागणार असून यात 246 भारतीय तर 163 परदेशी खेळाडू असतील. या खेळाडुंना अष्टपैलू, यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू, बॅटर यानुसार विभागण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.