मुंबई, 14 फेब्रुवारी : महिला आयपीएलचा लिलाव सोमवारी मुंबईत पार पडला. महिला आयपीएलचा हा पहिलाच लिलाव होता. या लिलावात पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटपटूंवरही पैशांचा पाऊस पडला. मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला 1.8 कोटी रुपयांना विकत घेतलं. हरमनप्रीत कौरवर मुंबई इंडियन्सने यशस्वी बोली लावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी खूश झाल्या आहेत. नीता अंबानी या महिला आयपीएलसाठीच्या लिलावात सहभागी झाल्या होत्या. हा दिवस महिला क्रिकेटसाठी खास असल्याचं नीता अंबानी यांनी म्हणलं आहे. आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलचा संघही विकत घेतला आहे. ‘खेळासाठी लिलाव नेहमीच चांगला असतो, पण आजचा दिवस खास होता. वूमन्स आयपीएलसाठीचा हा पहिलाच लिलाव होता, त्यामुळे हा ऐतिहासिक दिवस ठरला. नावं आणि आकड्यांपेक्षा प्रत्येक जण महिला क्रिकेटपटूंच्या कौशल्याबद्दल जल्लोष करत होता,’ असं नीता अंबानी म्हणाल्या. महिला आयपीएलच्या लिलावात आकाश अंबानी यांच्यासह नीता अंबानी, महेला जयवर्धने, महिला संघाच्या प्रशिक्षक शार्लोट एडवर्ड्स (मुख्य प्रशिक्षक), झुलन गोस्वामी (संघ मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक) आणि देविका पळशीकर (फलंदाजी प्रशिक्षक) सहभागी झाल्या होत्या. खेळाबद्दल कायमच आवड असणाऱ्या तसंच महिला आणि मुलींना खेळण्यासाठी कायमच प्रोत्साहन देणाऱ्या नीता अंबानी लिलावातल्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर समाधानी आहेत. ‘टीम म्हणून आम्ही लिलावाबद्दल आनंदी आहोत. भारतीय टीमच्या कर्णधाराला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घेतल्यामुळे खूश आहोत. भारताच्या पुरुष टीमचा कर्णधारही आमच्याकडे आहे. नॅट, पूजा तसंच सगळ्या महिला क्रिकेटपटूंना खेळताना बघण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत,’ असं नीता अंबानी म्हणाल्या. आयपीएलचा यंदाचा मोसम रोहित शर्माचा मुंबईचा कर्णधार म्हणून 10 वा मोसम असेल. भारताचे दोन्ही कर्णधार मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात असल्यामुळे आपण उत्साही आहोत, अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली. ‘रोहितला खेळाडू ते कर्णधार होताना मी पाहिलं आहे. यावर्षी रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 10 वर्ष पूर्ण करत आहे. आता आम्ही हरमनप्रीतचं मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात स्वागत करत आहोत,’ असं नीता अंबानी म्हणाल्या. नीता अंबानी यांनी टी-20 इतिहासातल्या दोन्ही यशस्वी कर्णधारांबाबतच्या समानताही सांगितल्या. ‘दोघांमध्येही बराच अनुभव, व्यावसायिकपणा आणि जिंकण्याची मानसिकता आहे. तसंच दोघंही तरुण खेळाडूंना प्रेरणा देतात, त्यामुळे हे दोघंही टीममध्ये आल्यामुळे आम्ही उत्साहित आहोत,’ असं नीता अंबानी यांनी सांगितलं. नीता अंबानी यांनी भारताच्या अंडर-19 आणि सीनियर महिला टीमच्या कामगिरीचंही कौतुक केलं. ‘आपल्या अंडर-19 महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला, ज्यामुळे देश आनंदी झाला. मी त्यांचं अभिनंदन करते. याशिवाय महिला टीमने टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली,’ असं वक्तव्य नीता अंबानी यांनी केलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या नीता अंबानी यांना महिला आयपीएलमध्ये भविष्य दिसत आहे. भारतामध्ये महिलांसाठी क्रीडा क्षेत्र वेगळ्या वळणावर आहे. आपल्या तरुण मुली उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, त्यांना पाहून मला अभिमान वाटतो, असं नीता अंबानी म्हणाल्या. मागच्या अनेक वर्षांपासून रिलायन्स फाऊंडेशन महिला खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहे. त्यांना पाठिंबा देणं अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली. ‘या तरुण मुलींना आणखी ताकद मिळो. आम्हाला क्रीडा आणि क्रिकेटमधल्या महिला खेळाडूंना पाठिंबा द्यायची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळत आहे, फक्त भारतातच नाही, तर जगभरात. आमच्यासाठी हे अभिमानास्पद आहे,’ असं विधान नीता अंबानी यांनी केलं आहे. मुंबई इंडियन्सचा महिला संघ हरमनप्रीत कौर, नॅट स्कीव्हर-ब्रण्ट, अमेलिया केर, पूजा वस्रकार, यास्तिका भाटिया, हीथर ग्रॅहम, इसी वॉन्ग, अमनज्योत कौर, धारा गुज्जर, साईका इशाक्यू, हेली मॅथ्यूज, चोले ट्रायन, प्रियंका बाला, हुमाईरा काझी, नीलम बिष्ट, जिंतामणी कलिता, सोनम यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.