कोलकाता, 2 मे : पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसने (TMC) बहूमत मिळवलं आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या क्रिकेटपटू मनोज तिवारीने (Manoj Tiwary) विजय मिळवला आहे. मनोज तिवारी तृणमूल काँग्रेसकडून शिवपूर विधानसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवत होता. त्याने भाजपच्या (BJP) डॉ. रतिन चक्रवर्ती यांचा पराभव केला. निवडणुकीआधी चक्रवर्ती तृणमूलमधून भाजपमध्ये गेले होते. ते काही काळ हावड्याचे महापौरही होते. तृणमूलने हावडाच्या शिवपूर मतदारसंघातून मनोज तिवारीला तिकीट दिलं होतं. भाजप आणि तृणमूलविरुद्ध डाव्या आघाडीच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अनुभवी नेते डॉ.जगन्नाथ भट्टाचार्यही निवडणूक लढवत होते, पण त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
शिवपूर मतदारसंघातून तृणमूलचे तीनवेळचे आमदार जातू लाहिडी यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 84 वर्षांचे लाहिडी 1991 आणि 1996 साली काँग्रेसकडून निवडणूक जिंकले होते. मनोज तिवारीला तृणमूलच्या अंतर्गत मतभेदांचाही सामना करावा लागला होता. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नाराज होते.
मनोज तिवारी भारताकडून 12 वनडे आणि तीन टी-20 सामने खेळला. वनडे करियरमध्ये तिवारीने एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने 287 रन केले. तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याला फक्त 15 रन करता आल्या. आयपीएलमध्ये (IPL) मनोज तिवारी केकेआरकडून खेळला. मनोज तिवारीने 125 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8,965 रन केले यामध्ये 27 शतकं आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तो बंगालच्या टीमचा कर्णधारही होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cricket, Manoj tiwari, TMC, West Bengal Election