कोलकाता, 6 मार्च : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यावरून अनेक उमेदवारांमध्ये चूरस आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) मात्र ममता बॅनर्जींच्या (Mamta Banerjee) तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwari) याला तिकीट दिलं आहे. हावडा जिल्ह्याच्या शिबपूर विधानसभा मतदारसंघातून मनोज तिवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मागच्याच महिन्यात मनोज तिवारीने ममता बॅनर्जींच्या पक्षात प्रवेश केला होता. मनोज तिवारीशिवाय फूटबॉलपटू बिदेश बोस उलुबेरियामधून निवडणूक लढवेल.
हावडामध्ये जन्म झालेल्या मनोज तिवारीने 2008 साली टीम इंडियामध्ये पदार्पण केलं होतं. त्याने भारतासाठी शेवटची वनडे जुलै 2015 साली खेळली. भारताकडून मनोज तिवारीने 12 वनडे आणि तीन टी-20 खेळल्या. 35 वर्षांच्या तिवारीने वनडेमध्ये 287 रन केले. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि लिस्ट एमध्ये तो यशस्वी ठरला. 125 प्रथम श्रेणी मॅचमध्ये त्याने 27 शतकं आणि 37 अर्धशतकं करत 8965 रन केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर त्रिशतकही आहे. तसंच त्याची सरासरीही 50 च्या वर आहे. तर 163 लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 42 च्या सरासरीने 5,466 रन केले. यात 6 शतकं आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.
114 नव्या चेहऱ्यांना संधी
तिकीट वाटपात तृणमूल काँग्रेसने तरुण, अल्पसंख्याक, महिला आणि दलित-आदिवासींना प्राधान्य दिलं आहे. तृणमूलने जाहीर केलेल्या यादीत 114 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ही यादी जाहीर होताच ममता बॅनर्जी यांनी आपण नंदीग्राममधून निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने पाच मंत्र्यांसह 28 आमदारांना तिकीट दिलं नाही. आमदारांचं वाढतं वय आणि तब्येतीचं कारण यासाठी देण्यात आलं.
बंगालमध्ये 8 टप्प्यांमध्ये निवडणुका
पश्चिम बंगालच्या 294 विधानसभेच्या जागांपैकी 30 जागांवर 27 मार्चला निवडणुका होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 30 जागांवर 1 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी 6 एप्रिलला, चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिलला, पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिलला, सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिलला आणि आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.