टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या आधी उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. टीम निवडीत दखल दिल्यामुळे नाराज झालेल्या जाफरने पद सोडलं आहे. उत्तराखंड क्रिकेट संघाने वसीम जाफरचा राजीनामा स्वीकारला आहे.
उत्तराखंड क्रिकेट संघाला लिहिलेल्या ई-मेलमध्ये वसीम जाफर म्हणाला, 'मी खेळाडूंसाठी दु:खी आहे, कारण त्यांच्याकडे खूप साऱ्या शक्यता आहेत, आणि माझ्याकडून ते बरंच शिकू शकतात, पण अयोग्य खेळाडूंच्या निवडीसाठी निवड समिती आणि सचिवांचा हस्तक्षेप होत असल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही.'
दुसरीकडे उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांनी वसीम जाफर यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. वसीम जाफरला प्रशिक्षक म्हणून त्याने मागितलेल्या सगळ्या गोष्टी देण्यात आल्या. एक महिन्याच्या सत्राआधी शिबीर भरवण्याशिवाय आम्ही त्याला बाहेरचे खेळाडू, प्रशिक्षक आणि बॉलिंग प्रशिक्षकाची निवड करून दिली. पण टीम निवडीमध्ये त्याचा हस्तक्षेप वाढत चालला होता, असा आरोप माहिम वर्मा यांनी केला आहे.
जाफर प्रशिक्षक असताना उत्तराखंडच्या टीमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीवर क्रिकेट संघ नाराज आहे. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टीमची कामगिरी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यानंतर निवड समितीला अन्य खेळाडूंना संधी द्यायची होती, पण वसीम जाफर त्याची टीम निवडण्यावर जोर देत होता, हे निवड समितीला पटलं नसल्याचं माहिम वर्मा म्हणाले.
वसीम जाफर मागच्यावर्षी उत्तराखंड क्रिकेट टीमचा प्रशिक्षक झाला होता. आपला राजीनामा देताना जाफर म्हणाला, 'उत्तराखंड टीमच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना, मला दु:ख होत आहे. उत्तराखंड क्रिकेट संघाचे मानद सचिव जर या प्रकारचं वातावरण तयार करणार असतील, ज्यात मला टीम कल्याण आणि कामगिरी संबंधित निर्णय घेता येत नसतील, तर प्रशिक्षकपदावर कायम राहण्यात काहीच अर्थ नाही.'