नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून इतिहास रचला. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अंतिम सामन्यात बांगलादेशने तीन गडी राखून पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार अकबर अली. त्याने नाबाद 43 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
बांगलादेशच्या संघाने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या पूर्ण संघाला त्यांनी 177 धावांत गुंडाळलं. दरम्यान, सामन्यात पावसाने अडथळा आला. अखेर डकवर्थ लुईस नियमाने बांगलादेशनं तीन गडी राखून विजय साजरा केला. आता त्यांच्या विजयात भारताचा क्रिकेटपटू वासिम जाफरचे योगदान असल्याचं वृत्त टेलिग्राफने दिलं आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वासिम जाफरला त्यांच्या हाय परफॉर्मन्स अकॅडमीच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्याने त्याच्या कार्यकाळात वासिम जाफरने अंडर 19 क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अली आणि शहादत हुसैन यांनाही प्रशिक्षण दिलं. जाफरने बांगलादेशला चॅम्पियन होण्यासाठीही शुभेच्छा दिल्या होता.
वासिम जाफर म्हणाला की, अकबर अली भारताविरुद्ध फलंदाजी करताना आक्रमक होता. त्याने अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व कुशलतेनं केलं. अकबर अंडर 14 आणि अंडर 16 संघाचाही कर्णधार होता.
बांगलादेशच्या अंडर 19 संघाच्या अनेक खेळाडूंनी वासिम जाफरच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेतलं. प्रतिभासंपन्न असलेले हे खेळाडू एकमेकांना चागलं समजून घेतात. भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार होता पण बांगलादेशनं कमाल केल्याचं वासिम जाफरने म्हटलं.
वासिम जाफरने भारताकडून 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1954 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून त्यानं दोन द्विशतकंही केली आहेत. त्याने प्रथम श्रेणीत 260 सामन्यात 57 शतकं आणि 91 अर्धशतकं केली आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 19 हजार 410 धावा केल्या आहेत. रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणूनही त्याचं नाव घेतलं जातं.