नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने केल्यामुळे भारतीय क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे. खुद्द वसीम जाफरने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण यावरून वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या वादामध्ये आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) उडी घेतली आहे. मागच्या काही वर्षात द्वेष इतका सामान्य झाला आहे, की आता आपलं आवडतं क्रिकेटही यात अडकलं आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. तसंच भारत आपल्या सगळ्यांचा आहे, त्यांना आपली एकात्मता भंग करून देऊ नका, असं आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे. वसीम जाफरवर आरोप झाल्यानंतर अनिल कुंबळे, इरफान पठाण, मनोज तिवारी आणि मुंबईचे माजी क्रिकेटपटू शिशीर हट्टंगडी यांनी वसीम जाफरला पाठिंबा दिला आहे.
काय झाला वाद? भारताकडून 31 टेस्ट खेळणारा वसीम जाफर म्हणाला, ‘उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या आरोपांमुळे मला त्रास झाला आहे.’ टीम निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे, तसंच निवड समिती आणि उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप करत वसीम जाफरने मंगळवारी त्याच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. ‘या प्रकरणाला जो काही धार्मिक रंग दिला जात आहे, ते खूप दु:खद आहे. मी इक्बाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो, हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे,’ असं जाफर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला. उत्तराखंड टीमच्या सराव सत्रात मौलवींना आणल्याचा आरोपही जाफरने फेटाळून लावला आहे. ‘बायो बबलमध्ये मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मौलवी, मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले, पण त्यांना मी बोलावलं नव्हतं,’ असं स्पष्टीकरण जाफरने दिलं. ‘इक्बाल अब्दुल्लाने नमाजासाठी माझी आणि मॅनेजरची परवानगी मागितली होती. आम्ही रोज खोलीतच नमाज पठण करायचो, पण शुक्रवारचा नमाज एकत्र व्हायचा. नेट प्रॅक्टिसनंतर आम्ही पाच मिनिटं ड्रेसिंग रूममध्ये नमाज पठण केलं. जर हे सांप्रदायिक असतं, तर नमाजासाठी मी सरावाची वेळ बदलली असती, पण मी तसं केलं नाही. यात काय मोठी गोष्ट आहे, मला समजलं नाही,’ अशी प्रतिक्रिया जाफरने दिली.