ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभवाची धूळ चारत भारताने एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सामन्यांचा आनंद लुटला.
सचिन तेंडुलकरचा मित्र आणि टेनिस जगतात निर्विवादपणे वर्चस्व गाजवणाऱ्या रॉजर फेडररची भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनीही भेट घेतली.
टेनिसच्या कोर्टवर अधिराज्य गाजवणाऱ्या रॉजर फेडररची आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मैत्री जगजाहीर आहे. गेल्या वर्षी सचिनने फेडररचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
सचिनने ट्विटमध्ये फेडररला म्हटलं होतं की नजर आणि हालचालीचा जबरदस्त समन्वय साधत खेळला आहेस. विंम्बल्डन जिंकल्यावर आपण एकमेकांसोबत यावर चर्चा करू.
सचिनच्या या ट्विटवर फेडररने वेळ कशाला घालवायचा मी चर्चा करायला तयार आहे असं म्हटलं होतं. यावर सचिननेदेखील पुन्हा ट्विट करून उत्तर दिलं होतं.
भारतीय खेळाडू सामने पाहण्यासाठी आल्याचे फोटो ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
भारतीय कर्णधार विराट कोहली याच्याशिवाय हिटमॅन रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनीही ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावलेल्या फेडररने यावेळी चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिटजला हरवून अंतिम 16 मध्ये स्थान पक्के केले.
जागतिक क्रमवारीत 50 व्या स्थानावर असलेल्या फ्रिटजला 20 वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या फेडररसमोर फारसा प्रभावी खेळ करता आला नाही. ८८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात विजय मिळवत फेडररने 63 वेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पोहचण्याचा विक्रम केला.