जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'मुंबई'साठी कायपण! शार्दुल ठाकूरचा कार घेऊन 700 किमीचा प्रवास

'मुंबई'साठी कायपण! शार्दुल ठाकूरचा कार घेऊन 700 किमीचा प्रवास

'मुंबई'साठी कायपण! शार्दुल ठाकूरचा कार घेऊन 700 किमीचा प्रवास

कोरोना व्हायरसच्या काळात खेळाडूंना मैदानात पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं, याचा नेम नाही. भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) लाही अशाच अनुभवाचा सामना करावा लागला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसच्या काळात खेळाडूंना मैदानात पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं, याचा नेम नाही. भारताचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) लाही अशाच अनुभवाचा सामना करावा लागला. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी शार्दुलला अहमदाबादवरून जयपूरला 700 किमी प्रवास कारने करावा लागला आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आणि बायो बबलमध्ये जाण्यासाठी शार्दुल ठाकूरने कारने प्रवास केला. विमानाने प्रवास केला असता तर मुंबईच्या टीममध्ये सामील होण्याआधी त्याला काही दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, त्यामुळे शार्दुलने कारने जायचं ठरवलं. विमानाने अहमदाबादवरून शार्दुल दीड तासात जयपूरला पोहोचला असता, पण क्वारंटाईनच्या नियमांमुळे त्याने विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी 10 तासांचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी शार्दुलची टीम इंडियामध्ये निवड झाली होती. पण उमेश यादव फिट झाल्यामुळे तिसऱ्या टेस्टआधी 22 फेब्रुवारीला शार्दुलला भारतीय टीममधून रिलीज करण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिन संजय नाईक यांनी सांगितलं, ‘शार्दुल 22 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता कारने जयपूरला निघाला. विमानाने तो जयपूरला आला असता तर त्याला मुंबईच्या टीममध्ये यायच्याआधी तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. तो कारने जयपूरला आल्यामुळे त्याच दिवशी टीमशी जोडला गेला आणि त्याच दिवशी त्याच्या सरावालाही सुरूवात झाली. तो खेळासाठी आणि टीमसाठी किती समर्पित आहे, हे यातून दिसतं.’ विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी मुंबईची टीम जयपूरमध्ये आहे. स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा 7 विकेटने पराभव केला, तर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा 6 विकेटने विजय झाला. आता 25 फेब्रुवारीला पुदुच्चेरीविरुद्ध आणि 27 फेब्रुवारीला राजस्थानविरुद्ध मुंबई खेळणार आहे. या दोन्ही मॅचमध्ये शार्दुल खेळू शकेल. पण 1 मार्चला त्याला पुन्हा जयपूरवरून अहमदाबादला परतावं लागेल. कारण इंग्लंडविरुद्ध 12 मार्च पासून सुरू होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी शार्दुलची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियात शार्दुलची ऐतिहासिक कामगिरी शार्दुलने भारतासाठी मागची टेस्ट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळली होती. खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे ब्रिस्बेनमधल्या शेवटच्या टेस्टमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. या मॅचमध्ये ऑल राऊंड कामगिरी करत शार्दुलने भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाची भूमिका बजावली. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 3 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या, तर पहिल्या इनिंगमध्ये त्याने 67 रनची खेळी केली. लोकल ट्रेनने प्रवास करायचा शार्दुल अशाप्रकारे प्रवास करण्याची शार्दुलची पहिलीच वेळ नाही, याआधी 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारतात परतलेल्या शार्दुलने पालघरला आपल्या घरी जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास केला. लहान असताना क्रिकेट खेळण्यासाठीही शार्दुल पालघरवरून बोरिवलीला ट्रेननेच प्रवास करायचा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात