नवी दिल्ली, 11 मार्च : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) मुंबईची दमदार कामगिरी सुरूच आहे. सेमी फायनलमध्ये कर्नाटकचा (Mumbai vs Karnataka) 72 रननी पराभव करत मुंबईने विजय हजारे ट्रॉफीची फायनल गाठली आहे. आता फायनलमध्ये मुंबईचा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. सेमी फायनलमध्ये कर्नाटकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने या स्पर्धेतलं आणखी एक शतक केलं. पृथ्वीने 122 बॉलमध्ये 165 रनची खेळी केली. तर शम्स मुलानीने 45, शिवम दुबेने 27 आणि अमन हकीम खानने 25 रन केले. पृथ्वीच्या या शतकामुळे मुंबईचा 49.2 ओव्हरमध्ये 322 रनवर ऑल आऊट झाला.
मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकची सुरूवात खराब झाली. कर्णधार रवीकुमार समर्थ स्वस्तात आऊट झाला, पण या मोसमात तुफान फॉर्ममध्ये असलेल्या देवदत्त पडिक्कलने 64 रन केले, पण कर्नाटकला वारंवार धक्के बसत होते. शरथ बीआरने 61 रनची खेळी केली, तर करु नायरने 29, श्रेयस गोपाळने 33 आणि कृष्णप्पा गौतमने 28 रन केले, तरीही कर्नाटकची टीम मुंबईच्या आव्हानापासून मागे पडली. मुंबईकडून तुषार देशपांडे, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शम्स मुलानी यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर धवल कुलकर्णी आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
यंदाच्या मोसमात विजय हजारे ट्रॉफीच्या सलग 7 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने दिल्लीचा 7 विकेटने, महाराष्ट्राचा 6 विकेटने, पुदुच्चेरीचा 233 रननी, राजस्थानचा 67 रननी आणि हिमाचल प्रदेशचा 9 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर सौराष्ट्राविरुद्ध 9 विकेट्स विजय मिळवत मुंबईने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
आता फायनलमध्ये मुंबईचा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. रविवार 14 मार्चला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. गुजरातविरुद्धच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये उत्तर प्रदेशचा 5 विकेटने विजय झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Mumbai, Prithvi Shaw, Vijay hazare trophy