जयपूर, 26 डिसेंबर : हिमाचल प्रदेशने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) पटकावली आहे. फायनलमध्ये हिमाचलने तामिळनाडूचा (Himachal Pradesh vs Tamil Nadu) पराभव केला. या मॅचआधी तामिळनाडूला विजायचा दावेदार मानलं जात होतं, पण हिमाचलला तीन खेळाडूंनीच ट्रॉफी जिंकवून दिली. फायनलमध्ये युवा ओपनर शुभम अरोराने नाबाद 136 रन केले. याशिवाय कर्णधार ऋषी धवन आणि प्रशांत चोप्रा यांनीही चांगली कामगिरी केली. या खेळाडूंनी आता टीम इंडियासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
ऋषी धवनने (Rishi Dhawan) विजय हजारे ट्रॉफीमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे तो हार्दिक पांड्यासाठीचा पर्याय होऊ शकतो. धवनने 8 मॅचच्या 8 इनिंगमध्ये 76 च्या सरासरीने 458 रन केले, यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे, त्याने 127 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. ऋषी धवन मधल्या फळीमध्ये बॅटिंग करतो. याशिवाय 31 वर्षांच्या धवनने 23 च्या सरासरीने 17 विकेटही मिळवल्या. 27 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. फायनलमध्येही त्याने 23 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले, यात त्याने 5 फोर आणि 1 फोर मारली. याशिवाय त्याने 3 विकेटही घेतल्या.
करियरचं पहिलं शतक फायनलमध्ये
24 वर्षांचा युवा खेळाडू शुभम अरोराने (Shubham Arora) फायनलमध्ये शतक झळकावलं. क्रिकेट करियरमधलं त्याचं हे पहिलंच शतक होतं. 131 बॉलमध्ये 136 रन वर तो नाबाद राहिला. त्याने 13 फोर आणि एक सिक्स लगावली. या स्पर्धेत त्याने 8 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 313 रन केले, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक होतं. हा मोसम त्याचा लिस्ट ए करियरचा पहिलाच आहे. आपल्या पहिल्याच सिझनमध्ये त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.
8 इनिंगमध्ये 5 अर्धशतकं
हिमाचल प्रदेशचा आणखी एक ओपनर प्रशांत चोप्रानेही (Prashant Chopra) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 29 वर्षांच्या या बॅटरने 8 इनिंगमध्ये 57 च्या सरासरीने 456 रन केले, यात 5 अर्धशतकं आहेत. 99 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. प्रशांतने त्याच्या लिस्ट ए करियरमध्ये 6 शतकं आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने 3200 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vijay hazare trophy