मुंबई, 11 सप्टेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपांसून अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत आहे. अशातच उर्वशी रौतेला पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीन शाहमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. उर्वशी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी आली होती. तेव्हापासून उर्वशीचे नाव नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी रोमँटिक रीलशेअर केला होता, ज्यानंतर उर्वशी आणि नसीमच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. मात्र पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहने उर्वशीला ओळखण्यास नकार दिला. आता या व्हायरल व्हिडिओवर उर्वशीनं प्रतिक्रिया दिली आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत सांगितलं की, ‘दोन दिवसांपूर्वी माझ्या टीमने एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता, जो चाहत्यांनी तयार केला होता. टीमने इतर लोकांच्या माहितीशिवाय ते शेअर केले होते. प्रसारमाध्यमांना विनंती आहे की, यावर कोणतीही बातमी करू नये. तुम्हा सर्वांचे आभार आणि खूप प्रेम’.उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नसीम शाहचे नाव घेतलेले नाही. मात्र नसीम शाह यांच्या वक्तव्यानंतर अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
उर्वशीसोबतच्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना नसीम म्हणाला कोण उर्वशी तिला मी ओळखत नाही. लोक असे व्हिडीओ का बनवतात ते मला कळत नाही. माझं हसणं जर कोणाला आवडत असेल तर तो त्याचा प्रश्न. माझं सध्या लक्ष सगळं क्रिकेटकडे आहे. मला खेळायचं आहे. नसीमने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, भारत पाकिस्तान संघातल्या पहिल्या सामन्यातही उर्वशी स्टेडियममध्ये दिसली होती. त्यानंतरही तिनं स्टेडिअममध्ये हजेरी लावलेली पहायला मिळाली. मात्र यावरुन ती मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.