मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs PAK : 4,4,4,4,4,6, तुळजापूरच्या राजवर्धनने पाकिस्तानला धुतलं!

IND vs PAK : 4,4,4,4,4,6, तुळजापूरच्या राजवर्धनने पाकिस्तानला धुतलं!

Photo- Rajvardhan Hangargekar Facebook

Photo- Rajvardhan Hangargekar Facebook

अंडर-19 आशिया कपमध्ये (U-19 Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs Pakistan) बॅटिंगने निराशा केली, पण तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar) भारताच्या मदतीला धावला.

मुंबई, 25 डिसेंबर : अंडर-19 आशिया कपमध्ये (U-19 Asia Cup) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (India vs Pakistan) बॅटिंगने निराशा केली, पण तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर (Rajvardhan Hangargekar) भारताच्या मदतीला धावला आणि त्याने टीमची लाज राखली. 10व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या राजवर्धनने 20 बॉलमध्ये 165 च्या स्ट्राईक रेटने 33 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. राजवर्धनच्या या खेळीमुळे भारताला 237 रनपर्यंत मजल मारता आली. 49 ओव्हरमध्येच टीम इंडियाचा ऑल आऊट झाला.

याआधी युएईविरुद्धच्या सामन्यात हंगर्गेकरने 23 बॉलमध्ये 48 रन केले, याशिवाय त्याने तीन विकेटही घेतल्या. हंगर्गेकरच्या या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताने युएईचा पराभव केला.

कोण आहे राजवर्धन?

महाराष्ट्राच्या तुळजापूरचा असलेल्या राजवर्धनचा प्रवास संघर्षमय आहे. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये राजवर्धनचे वडील सुभाष यांचं कोरोनामुळे निधन झालं. 'माझ्या वडिलांनी कायमच मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मला भारताकडून खेळताना बघणं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्याशिवाय जगणं खूपच कठीण आहे, पण आता ते आपल्यात नाहीत, हे मी मान्य केलं आहे. त्यामुळे मला खेळावर लक्ष केंद्रीत करायला मदत झाली,' असं राजवर्धन मिड-डेशी बोलताना म्हणाला. युएईला अंडर-19 आशिया कपला जाण्याआधी राजवर्धन बँगलोरच्या एनसीएमध्ये ट्रेनिंगसाठी आला होता.

हंगर्गेकरने अंडर-19 विनू मंकड ट्रॉफीमध्ये (U-19 Vinoo Mankad Trophy) 8 सामन्यात 19 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 216 रनही केले. याशिवाय इंडिया-सी कडून खेळताना त्याने अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये त्याने 4 आणि अंडर-19 ट्रॅन्ग्युलर सीरिजमध्ये 3 विकेट मिळवल्या.

हंगर्गेकर जलदगती बॉलरही अपघातानेच झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या अंडर-14 टीममध्ये तो ऑफ स्पिन बॉलिंग करायचा, पण टीम फास्ट बॉलिंगमध्ये संघर्ष करत असल्यामुळे त्याने हंगर्गेकरने फास्ट बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात प्रशिक्षक मोहन जाधव आणि ट्रेनर तसंच मेंटर तेजस मटापूरकर यांच्या वीरांगण क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली.

'माझा बॉलिंगचा वेग नीट होता, पण अचूकता आणि व्हेरियेशनमध्ये कमतरता होती. मोहन सरांनी मला ही कमतरता दूर करण्यात मदत केली. मी फारच भावुक होऊन फक्त फास्ट बॉलिंग टाकण्यावर लक्ष केंद्रीत करायचो, पण प्रशिक्षकांनी माझी मानसिकता बदलली. त्यांनी माझ्या रन अपवर काम केलं, ज्यामुळे मी 140 किमी प्रती तासाच्या वेगाने सातत्याने बॉलिंग करायला लागलो,' असं हंगर्गेकरने सांगितलं.

दुसरीकडे हंगर्गेकरचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. 'तो सुरुवातीला धावपटूसारखा धावायचा, पण मग आम्ही त्याच्या रन अपवर काम केलं. त्याच्याकडे चांगला इन स्विंग, यॉर्कर आणि बाऊन्सर आहे. मागच्या 6 महिन्यांमध्ये त्याने बॅटिंगमध्येही सुधारणा केली आहे,' अशी प्रतिक्रिया मोहन जाधव यांनी दिली आहे.

वेगासोबतच राजवर्धनला दुखापतीही आल्या, पण आम्ही त्याच्या फिटनेस, ट्रेनिंग आणि बॉलिंग वेळापत्रकाचीही योजना आखली. मागच्या दोन वर्षात त्याने नेटमध्ये जवळपास 800 ओव्हर व्यवस्थित वेगाने टाकल्या आहेत, असं राजवर्धनचे ट्रेनर मटापूरकर म्हणाले. 'सुरुवातीला या गोष्टींचा खूप त्रास झाला, पण तेजस सरांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांनी माझ्या फिटनेसवर आणि मानसिक शक्तींवर काम केलं,' असं राजवर्धन हंगर्गेकरने सांगितलं.

First published:
top videos

    Tags: India vs Pakistan