मुंबई, 6 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याच्या मृत्यूबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी 52 वर्षांच्या शेन वॉर्नचं थायलंडमध्ये निधन झालं होतं. थायलंडच्या एका प्रायव्हेट व्हिलामध्ये वॉर्न बेशुद्ध पडल्याचं त्याच्या मित्रांनी पाहिलं होतं. यानंतर वॉर्नच्या मॅनेजमेंटने हृदयविकाराच्या धक्क्याच्या संशयाने वॉर्नचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. याप्रकरणी आता थायलंड पोलिसांनी (Tahiland Police) अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नच्या मृत्यूनंतर जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राजकीय सन्मानासह वॉर्नवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत्यूआधी शेन वॉर्नच्या छातीत दुखत होतं. व्हिलामध्ये शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, तसंच त्याच्या शरिरात कोणतंही अमली औषध किंवा पदार्थ मिळालेला नाही, असं थायलंडचे पोलीस अधिकारी युताना सिरिसोम्बत यांनी सांगितलं. वॉर्नला आधीपासूनच अस्थमा आणि हृदयविकाराचा त्रास होता. बँकॉक पोस्टच्या एका रिपोर्टनुसार शेन वॉर्न ज्या रूममध्ये होता तिकडे लादीवर, आंघोळीच्या टॉवेलवर आणि उशीवर रक्ताचे डाग पडले होते. सीपीआर सुरू झाल्यानंतर रक्त आणि कफ पडत होता, असं पोलीस कमांडर पोल मेजर जनरल सतीत पोलपिनट यांनी थाय वृत्तपत्र मटिचोनला सांगितलं. रुग्णालयात नेण्याआधी वॉर्नच्या 4 मित्रांनी 20 मिनिटं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. शेन वॉर्नच्या 3 महिन्यांच्या सुट्टीची ही सुरूवात होती. एक रात्र आधीच तो इकडे आला होता. 5 वाजता तो बाहेर येणार होता. सव्वा पाचनंतर त्याच्या रूमचं दार वाजवण्यात आलं, पण कोणीही दार उघडलं नाही, त्यानंतर वॉर्नच्या मित्रांना संशय आला. रविवारी शेन वॉर्नच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.