मुंबई, 22 जून : एमर्जिंग आशिया कप 2023 या स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये फायनल सामना पारपडला. या सामन्यात भारतीय महिला अ संघाने बांगलादेशवर विजय मिळवून एमर्जिंग आशिया कपवर नाव कोरले. एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केलेल्या श्रेयांका पवार हिला प्लेयर ऑफ टूर्नामेंटचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पारपडलेल्या फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 127 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार श्वेता सहरावत आणि उमा चेत्री ही जोडी सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरली. पण यावेळी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि केवळ 28 धावांची भागीदारी केल्यानंतर टीम इंडियाची पहिली विकेट पडली. त्यानंतर उर्वरित फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 127 धावा केल्या. बांगलादेशकडून सुल्ताना खातून आणि नाहिदा अख्तर या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाने बांगलादेशच्या महिला संघाला 128 धावांचे आव्हान दिले होते. परंतु बांगलादेशची टीम 96 धावात सर्वबाद झाली. बांगलादेशच्या केवळ तीन फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली. श्रेयांका पाटील हिने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या, तर गोलंदाज मन्नत कश्यप हिने 3 आणि कनिका अहूजा हिने 2 विकेट घेतल्या.