• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : सचिन तेंडुलकर ते राहुल गांधी, मोहम्मद शमीसाठी दिग्गजांची बॅटिंग!

T20 World Cup : सचिन तेंडुलकर ते राहुल गांधी, मोहम्मद शमीसाठी दिग्गजांची बॅटिंग!

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) दारूण पराभव केला. यानंतर काही ट्रोलर्सनी मोहम्मद शमीने (Mohammad Shami) मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप केले, तसंच त्याच्यावर धर्मावरूनही टीका केली.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) दारूण पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासातला पाकिस्तानचा भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. टीम इंडियाच्या पराभवानंतर काही ट्रोलर्सनी मोहम्मद शमीने (Mohammad Shami) मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप केले, तसंच त्याच्यावर धर्मावरूनही टीका केली. मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. मोहम्मद शमीवर असे गलिच्छ आरोप झाल्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे. 'जेव्हा आम्ही टीम इंडियाला पाठिंबा देतो तेव्हा, आम्ही प्रत्येक व्यक्तीला पाठिंबा देतो जो भारताचं प्रतिनिधीत्व करतो. मोहम्मद शमी प्रतिबद्ध खेळाडू आहे आणि जागतिक दर्जाचा बॉलर आहे. त्याचा एक दिवस खराब गेला, खेळामध्ये कोणत्याही खेळाडूसोबत असं होऊ शकतं. मी पूर्णपणे शमी आणि टीम इंडियासोबत उभा आहे,' असं सचिन (Sachin Tendulkar) म्हणाला. राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे. आम्ही सगळे मोहम्मद शमीसोबत आहोत. त्यांच्यावर कोणीच प्रेम करत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये एवढा द्वेष भरला आहे, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं. वीरेंद्र सेहवागनेही या वादानंतर मोहम्मद शमीची बाजू घेतली. 'मोहम्मद शमीवर होत असलेल्या टीकेमुळे मला धक्का बसला आहे. आम्ही त्याच्या बाजूने उभे आहोत. तो चॅम्पियन खेळाडू आहे. जो कोणी भारताची टोपी घालतो, त्याच्या हृदयात ऑनलाईन जमावापेक्षा जास्त भारत आहे, शमी तुझ्यासोबत आहे. पुढच्या मॅचला जलवा दाखव,' अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. लोकप्रिय समालोचक हर्षा भोगले यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. 'जे मोहम्मद शमीविषयी घाण बोलत आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. तुम्ही क्रिकेट बघू नका. तुमची कमतरता आम्हाला जाणवणारही नाही,' अशी प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी दिली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनीही या मुद्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री पराभूत झालेला शमी हा एकमेव प्लेयर नाही. याची आठवण त्यांनी करुन दिली आहे. तसंच टीम इंडियाला त्याच्या सहकाऱ्याच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. टीम इंडियानं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. आता टीम इंडियाची पुढील लढत 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारताला टी20 वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.
  Published by:Shreyas
  First published: