मुंबई, 17 ऑक्टोबर : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात ओमानने पपुआ न्यू गिनीचा (Oman vs Papua New Guinea) 10 विकेटने पराभव केला. पहिल्या राऊंडच्या ग्रुप बी मुकाबल्यात ओमानचा कर्णधार झिशान मसूदने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टॉसनंतर दोन्ही टीम राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मैदानात उतरल्या. राष्ट्रगीत सुरू असताना पपुआ न्यू गिनी टीमच्या सपोर्ट स्टाफच्या डोळ्यात अश्रू आले. राष्ट्रगीत ऐकून पपुआ न्यू गिनी टीमचा सदस्य ढसाढसा रडायलाच लागला. पपुआ न्यू गिनीच्या टीमचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. याआधी दोनवेळा त्यांची टीम वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय व्हायच्या जवळ आली होती, पण ही संधी थोडक्यात हुकली होती. पहिल्यांदाच वर्ल्ड कपला क्वालिफाय झाल्यानंतर कानावर पडलेलं राष्ट्रगीत ऐकून पपुआ न्यू गिनीच्या सपोर्ट स्टाफला अश्रू अनावर झाले. जवळपास 2 वर्ष पपुआ न्यू गिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होतं. कठोर मेहनत घेऊन आणि असंख्य आव्हानांचा सामना करत त्यांनी वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळवला. कोरोना व्हायरसमुळे पपुआ न्यू गिनी कठीण काळातून जात आहे. यामध्ये काही खेळाडूंनी आपल्या कुटुंबातले सदस्यही गमावले. दोन वर्ष क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर खेळाडू, कोच आणि सपोर्ट स्टाफनी बरीच मेहनत केली. स्पर्धेआधी टीमला लागोपाठ 12 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.