KKR वर पश्चातापाची वेळ, 9.6 कोटी मोजलेल्या खेळाडूला संघाबाहेर काढलं आणि...

KKR वर पश्चातापाची वेळ, 9.6 कोटी मोजलेल्या खेळाडूला संघाबाहेर काढलं आणि...

तब्बल 9.6 कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूला बाहेर काढल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सवर पश्चातापाची वेळ आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लिनने अबुधाबीत सुरु असलेल्या टी10 लीगमध्ये सोमवारी वादळी फलंदाजी केली. मराठा अरेबियन्सकडून खेळताना त्याने 30 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 91 धावा केल्या. टी10 लीगमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्याने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला मागे टाकलं. ख्रिसच्या खेळीच्या जोरावर मराठा अरेबियन्सने अबुधाबीविरुद्ध 2 बाद 138 धावा केल्या. लिनशिवाय अॅडम लाइथने 18 चेंडूत 4 षटाकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी केली.

लिन मैदानात उतरताच त्याने अबुधाबीविरुद्ध चौकार षटकारांची आतषबाजी केली. त्याने दूसऱ्याच चेंडूवर चौकार लगावला. त्याचा सहकारी हजरतुल्लाह जजाईला 9 चेंडूत फक्त 12 धावा करता आल्या. त्यानंतर लिनने त्याची फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने फक्त 18 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक केलं.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पुढच्या एका षटकात ख्रिस लिनने 24 धावा वसूल केल्या. हॅरि गर्नीच्या त्या षटकात 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्यावेळी 26 चेंडूत 82 धावा झाल्या होत्या. लिनला शतक करण्याची संधी होती पण नंतर त्याला फक्त पाच चेंडू खेळायला मिळाले.

दरम्यान, लिनच्या या खेळीने कोलकाता नाइट रायडर्सवर पश्चातापाची वेळ आली आहे. आयपीएल 2020 च्या लिलाव प्रक्रियेआधी लिनला रिलिज केलं आहे. ख्रिस लिनला केकेआरने 9.6 कोटी इतक्या किमतीत खरेदी केलं होतं. त्याने गेल्या हंगामात 13 सामन्यात 405 आणि 2018 मध्ये 16 सामन्यात 491 धावा केल्या होत्या.

Published by: Suraj Yadav
First published: November 19, 2019, 9:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading